‘बिग बॉस मराठी’च्या तुफान गाजलेल्या पाचव्या पर्वाची गेल्यावर्षी ६ ऑक्टोबर रोजी सांगता झाली. या पर्वाचा विजेता ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण ठरला होता. नुकताच सूरजचा हिरो म्हणून पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यानिमित्ताने केदार शिंदेंनी ‘जस्ट नील थिंग्स’च्या पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी ‘बिग बॉस’ आणि रितेश देशमुखच्या होस्टिंगवर भाष्य केलं.

केदार शिंदे म्हणाले, “यावेळी ‘बिग बॉसचा’ प्रत्येक एपिसोड एडिट होताना मी स्वत: त्याठिकाणी उपस्थित होतो. प्रेक्षकांना प्रत्येक एपिसोड एखाद्या चित्रपटासारखा वाटला पाहिजे यासाठी आम्ही विशेष काळजी घेतली. एपिसोडची सुरुवात कशी हवी, एपिसोड संपला कसा पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार एडिटिंग करताना आम्ही करत होतो. मुळात संपूर्ण टीम खूपच चांगली होती आणि या सगळ्यात सर्वात महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे रितेश भाऊ.”

“रितेश भाऊ म्हणजे ‘जेम ऑफ पर्सन’. त्या माणसाने यंदाचं ‘बिग बॉस’ लिलया सांभाळलं. रितेश भाऊंना मी तिसऱ्या आठवड्यात सांगितलं होतं की, मला सूरजबरोबर सिनेमा करायचा आहे. त्यांनी मला तेव्हा विचारलं होतं तुमत्याकडे गोष्ट तयार आहे का? त्यावर मी त्यांना म्हणालो होतो, ‘गोष्ट २००४ पासून आहे फक्त मला ते कॅरेक्टर सापडत नव्हतं.” असं केदार शिंदे यांनी सांगितलं.

‘झापुक झुपूक’विषयी रितेश माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, “बिग बॉस’मुळे माझी आणि सूरजची ओळख झाली. हे खरंय की केदार शिंदेंनी तिसऱ्याच आठवड्यात सूरजबरोबर चित्रपट करायचं ठरवलं होतं. मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. फक्त सूरज जिंकलाय म्हणून ते सिनेमा बनवत नाहीयेत.”

तसेच यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये केदार शिंदे रितेशबद्दल म्हणाले होते, “रितेश भाऊ कधीच पर्सनल जात नाहीत. गेमबद्दल जे वाटतंय ते बोलले. रितेशभाऊंनी यंदाच्या सीझनमध्ये त्यांची एक विशेष स्टाईल आणली होती. रितेशने स्पर्धकांना सुद्धा बोलायला दिलं ज्यामुळे त्यांची बाजू देखील सर्वांना समजली. होस्ट हा असा चुका दाखवणारा असावा, सर्वांना त्यांना सांभाळून घेणारा असावा आणि मायेनं त्यांच्या डोक्यावर हात फिरवणारा सुद्धा असावा.”