Kedar Shinde : सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक’ सिनेमा २५ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. केदार शिंदेंनी या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान सूरजकडून प्रचंड मेहनत करून घेतली आहे. ‘झापुक झुपूक’ प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत असंख्य प्रेक्षकांनी या सिनेमाला उदंड प्रतिसाद दिला आहे.
मात्र, काही लोकांनी सूरजला ट्रोल केलं आहे. त्याच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणावर देखील अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्याबद्दल निगेटिव्ह कमेंट्स केल्या आहेत. याबद्दल केदार शिंदेंनी स्वत: इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन घेत या ट्रोलर्सना खडेबोल सुनावले आहेत. याशिवाय ज्या युट्यूबर्सनी सिनेमाची जाणूनबुजून निगेटिव्ह प्रसिद्धी केलीये अशा सगळ्या क्रिएटर्सबद्दल दिग्दर्शक नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात…
केदार शिंदे म्हणाले, “सूरज चव्हाणबद्दल पूर्वग्रहदूषित ठेवून रिपोर्ट देऊ नका. त्याचं आधी काम पाहा आणि त्यानंतर बोला. सिनेमात त्याचे कष्ट पाहा आणि मग बोला कारण, जोवर तुम्ही त्याचं काम पाहत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच बोलू शकत नाही. एक सडका आंबा, सगळ्या आंब्यांना नासवतो. आज त्या आंब्याला बाजूला काढण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वात आधी आमची फिल्म बघून नंतर त्याच्याबद्दल बोला इतकीच माझी विनंती आहे. ही जाहिरात नाहीये कारण, आम्ही सिनेमा केला लोकांपर्यंत पोहोचलो पण, सूरजचं वाईट वाटतं. या ट्रोलर्सच्या अशा प्रवृत्तीला आपणच आळा घातला पाहिजे.”
दिग्दर्शक पुढे म्हणाले, “आता मी एक लिस्ट काढणार आहे. माझ्या टीमला सुद्धा मी लिस्ट काढायला लावली आहे. हे जे कोणी युट्यूबर्स आहेत, त्यांना पुढच्या सिनेमाला मी आठ ते दहा दिवस माझ्या स्वखर्चाने त्याठिकाणी सेटवर घेऊन जाणार आहे. तिथे आठ-दहा दिवस मी त्यांना माझ्याबरोबर ठेवणार आहे. तिथे कलाकारांकडून कसं काम करून घेतात, सगळ्या टीमची किती मेहनत असते याचे धडे त्यांना द्यायची अत्यंत गरज आहे. हे सर्व पाहिल्यावरच ते बोलू शकतात की, सिनेमा कसा आहे आणि कसा नाहीये. हे करण्याची जर तयारी असेल तर माझ्याशी संपर्क साधा मी स्वत: तुम्हाला माझ्या शूटिंगला घेऊन जाईन. पण, आठ ते दहा दिवस भर उन्हात माझ्याबरोबर शूटिंग करायचं, तेव्हा थांबायचं नाही एवढं करावं लागेल.”
“मी कष्टाला नेहमीच महत्त्व देतो. त्यामुळे यापुढची नवीन गोष्ट सादर ( पुढील सिनेमा ) करण्याअगोदर मी आपल्या महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जाणार आहे. मी स्वत: ऑडिशन घेणार आहे. त्यामुळे गाव-खेड्यातील लोक स्वत: उपस्थित राहून माझ्यासमोर ऑडिशन देऊ शकतात आणि महत्त्वाचं मी स्वत: तिथे हजर राहणार आहे. मी स्वत: असेन त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. सिनेमात काम करण्यासाठी कधीच कोणाला तुमच्या कामासाठी पैसे देऊ नका. पैसे वगैरे कोणीही घेत नाही. त्यामुळे अशा चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवून पैसे देऊ नका.” असं केदार शिंदेंनी सांगितलं.