सध्या ‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवरुन वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर झी स्टुडिओजने भाष्य केले आहे.
‘झी स्टुडिओ’ने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक पत्र शेअर केले आहे. यात पत्रात त्यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल सुरु असलेल्या वादाप्रकरणी खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “गुळगुळीत चेहऱ्याचा मावळा…” जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका
झी स्टुडिओने दिलेल्या पत्रात नेमकं काय?
“छत्रपती शिवाजी महाराजा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता!
त्यांची मूल्ये हृदयाशी बाळगूनच आपण वाटचाल केली आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी, त्यांचा इतिहास गैरपद्धतीने प्रेक्षकांसमोर पोहोचणार नाही, याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली आहे. तज्ज्ञ इतिहासकारांचा सल्ला घेऊन आणि इतिहासाच्या अनेक प्रवाहांचा/ विचारांचा अभ्यास करुन, संदर्भ घेऊन आम्ही हर हर महादेवची निर्मिती केली आहे.
आम्हाला विश्वास आहे, छत्रपती शिवराय आणि त्यांच्या वीर योद्धांप्रती आम्हाला असलेला आदर सिनेमा पाहणाऱ्यांना नक्कीच पटेल.
या चित्रपटाच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा शुद्ध हेतू आहे. सामान्य प्रेक्षकांवर झालेला हल्ला हा निर्षधार्ह आहे. आमच्या राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था प्रणालीवर संपूर्णपणे विश्वास आहे.”
—– झी स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्म्स
आणखी वाचा : ‘हर हर महादेव’ चित्रपटातील ‘त्या’ वादग्रस्त घटनेबद्दल दिग्दर्शकाचे स्पष्टीकरण; म्हणाले…
दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी याबद्दल भाष्य केले होते. आजवर आपल्याला जो इतिहास शिकवला गेला आहे, तो तेवढाच मर्यादित नाही. विविध बखरी, दस्तऐवज, यांचा जेव्हा अभ्यास केला जातो, वेगवेगळ्या इतिहासकारांशी याबद्दल चर्चा केली जाते तेव्हा या सगळ्या अभ्यासातूनच हे संदर्भ आपल्याला सापडतात. बाजीप्रभू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील या प्रसंगाबद्दल आम्हालाही सेन्सॉर बोर्डने शंका विचारली होती. यावर आम्ही योग्य पुरावेदेखील सादर केले आहेत., असे ते म्हणाले होते.