कलाक्षेत्रातील कलाकार मंडळींना त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीबाबत नावाजलेल्या पुरस्कारांनी गौरवण्यात येतं. त्याचबरोबरीने दिग्दर्शक, गायक, संगीतकारांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. पण या सगळ्यामध्ये लेखक व गीतकाराला फारसं विचारलं जात नसल्याची खंत मराठीमधील सुप्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धनने व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या मुख्य कलाकाराची मालिकेमधून एक्झिट, अभिनेत्री नंदिता पाटकर म्हणते, “आगाऊ माणूस…”
नाटककार, चित्रपट पटकथा-संवाद लेखक, गीतकार, जाहिरातींसाठी कॉपी रायटर, दिग्दर्शक, विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी संहिता लेखन अशा विविध भूमिकांमधून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारा चेहरा म्हणून क्षितिजची ओळख आहे. पण आता क्षितिजच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टद्वारे त्याने कलाक्षेत्रातील लेखक व गीतकार यांच्याबाबत भाष्य केलं आहे. क्षितिजने ही पोस्ट शेअर करताच कलाक्षेत्रातील अनेक मंडळींनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
क्षितीज म्हणाला, “महाराष्ट्राल फेवरेट गायक आहे, गायिका आहे, संगीतकार आहे, गीतकार नाही. महाराष्ट्राला फेवरेट चित्रपट आहे, दिग्दर्शक आहे, अभिनेता आहे, लेखक नाही. गाण्यातून शब्द काढून बघा, सिनेमातून संवाद काढून बघा, आणि सांगा ते फेवरेट होतील का? लेखक आणि गीतकार तुमचेच फेवरेट नसतील तर महाराष्ट्राचे कसे होणार?”
पुढे तो म्हणाला, “काय वाटतं तुम्हाला? अजून दोन कॅटेगरी वाढवून लेखक आणि गीतकार यांनाही तितकंच मानाचं स्थान दिलं तर…” हेमंत ढोमे, ईशा केसकर, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर यांसारख्या कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान झी टॉकीजचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२२’चा नामांकन सोहळा नुकताच पार पडला. त्यामुळे क्षितिजचा रोक नेमका या नामांकन सोहळ्याकडेच आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे.