मृणाल दिवेकर ही लोकप्रिय मराठी सोशल मीडिया स्टार आहे. मृणालचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या मृणालने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने लहान असताना तिच्याबरोबर घडलेला एक वाईट प्रसंग सांगितला. एका ट्युशन टिचरने आपल्याला नग्न केलं होतं, असा धक्कादायक खुलासा मृणालने केला आहे.
मृणाल म्हणाली, “माझ्या एका ट्युशन टिचरने मी होमवर्क केला नव्हता म्हणून मला नग्न केलं होतं. त्यावेळी मी तिसरीत की चौथीत होते, माझं वय ९-१० वर्षे असेल. मी दोन-तीनवेळा होमवर्क केला नव्हता म्हणून असं केलं होतं.” सोबतच मृणालने ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये तिच्या शाळेतील अनुभवही सांगितला. ती कराडच्या एका शाळेत आधी शिकायची.
आईला ‘या’ नावाने हाक मारतो गश्मीर महाजनी; म्हणाला, “माझे वडील त्यांच्या आईला…”
“मी आधी कराडच्या एका शाळेत शिकत होते, तिथून नंतर इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. त्यामुळे दोन्ही शाळेतला फरक मला लवकर कळला. दोन्ही ठिकाणी दिल्या जाणाऱ्या वागणुकीतला फरक कळला. मी कराडमध्ये होते तिथे मला खूप अडचणी होत्या. ते मला खूप तुच्छतेने वागवायचे. तिथले शिक्षक मारायचे, वाचता आलं नाही, गणित सोडवता आलं नाही तर ते खूप अपमान करायचे,” असं मृणालने सांगितलं.
“तिथून मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. तिथे जी मुलं नाटक किंवा खेळात चांगली होती, त्यांचे एक वेगळे सेक्शन बनवले होते. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला जे जमतं ते करा, पण त्यात तुम्ही खूप चांगलं कराल याची खात्री करा, असं सांगायचे,” असं ती म्हणाली. कौशल्ये विकसित करण्यात दोन्ही ठिकाणी फरक होता. एखाद्या मुलाला लिहायला, वाचायला नाही येत पण त्याच्यात दुसरे गुण असतील तर त्यात त्याला एक्सप्लोर करायला लावणं यात आपले शिक्षक व शिक्षण पद्धती कमी पडत आहे, असं मत मृणालने मांडलं.
“लहान मुलांना सर्वांसमोर मारणं, त्यांचे कपडे काढणं, तोंडावर चिकटपट्टी लावणं या गोष्टींचे नंतर खूप आघात होतात. तणाव येतो, स्वतःवर शंका येते की मी चांगली आहे की नाही, मी हे चांगलं करतेय की नाही, लोक जज करतील का, असे विचार मनात येतात. शिक्षकांना तेव्हा याचे परिणाम माहीत नसतात, पण मुलांच्या मनावर या गोष्टींचे आघात बराच काळ राहतात,” असं मृणाल म्हणाली.