गायत्री हसबनीस

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आपले असे काही तरी वेगळे देणारे लोकप्रिय अभिनेते गिरीश कुलकर्णी पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आले आहेत. ‘भिरकीट’ हा त्यांचा नवाकोरा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्ताने बोलताना चित्रपटसृष्टीतील बदल, अभिनय आणि लेखन याविषयी त्यांनी सविस्तर गप्पा मारल्या.

‘‘हिंदी-मराठी चित्रपट अशी स्पर्धा कधीच नव्हती आणि ती आजही नाही. त्याउलट मराठीची मराठीशी स्पर्धा आहे. देशभरच काय.. जगामध्ये आपले स्थान आपण कसे प्रस्थापित करून दाखवू, अशी ती स्पर्धा आहे. कोरियासारख्या देशातून आलेला आशय ओटीटीवरून, चित्रपटांच्या माध्यमांतून जगभर पाहिला जातो आहे. आपल्याला येथे कोरियन भाषा येत नाही, पण आशयाच्या जोरावर त्यांनी जगात त्यांचे स्थान निर्माण केले तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीनेही अशा पद्धतीने स्वत:शीच स्पर्धा करून जागतिक दर्जाचा आशय कसा निर्माण करता येईल, यावर चिंतन करावे,’’ असा  मुद्दा अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी गप्पांच्या सुरुवातीलाच मांडला. गेल्या काही वर्षांत मराठी-हिंदी चित्रपट, वेबमालिका अशा विविध माध्यमांमधून आणि भाषेतून काम केलेल्या गिरीश कुलकर्णी यांचे अनुभवी बोल त्यामुळेच महत्त्वाचे ठरतात.

गेल्या काही महिन्यांपासून प्रादेशिक चित्रपटांची लाट जोरात वाहू लागली आहे. हिंदीतील मोठय़ा चित्रपटांनाही प्रादेशिक चित्रपटांनी मागे टाकले आहे. मराठी चित्रपटांनीही यात बाजी मारली; पण त्यामुळे मुळात ती हिंदी-मराठी स्पर्धा होती का? या मुद्दय़ावर बोलताना ते विस्तृतपणे आपले मत मांडतात. ‘‘चित्रपटसृष्टीतील तरतमभाव, सततची स्पर्धा आणि त्याविषयीची चर्चा ही माध्यमांतून अधिक केली जाते. मुळात हा उपस्थित करायचा विषयच नाही. चित्रपट हा एक व्यवसाय आहे. आज पुरणपोळी बनवून त्याची दुसऱ्या राज्यात विक्री केली तर त्याला मर्यादा येईल. त्यामुळे या दृष्टीने विचार केला तर आवाका हा मर्यादित आहे; परंतु तो वाढवण्याचे प्रयत्न सध्या मराठी चित्रपटसृष्टीत व्हायला हवेत,’’ असे ते म्हणतात. ‘‘मराठी चित्रपट हा आसाम, मणिपूर येथेही त्याच्या शैली आणि आशयासाठी पाहिला जात असेल तर त्याने हिंदीला टक्कर दिली, असे आपण नक्की म्हणू शकतो, मात्र व्यवसायाच्या दृष्टीने पाहता मराठी चित्रपटांना अनेक मर्यादा असल्याने ती तुलना करता येणे अवघड आहे. हिंदीत चित्रपटांसाठी होणारी गुंतवणूक, मराठीत होणारी गुंतवणूक त्यातून विपणन, वितरण यात तफावत आहे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.     

अभिनयातही सतत प्रयोग करावेत आणि ती व्यक्तिरेखा खुलवावी यासाठी आग्रही असणाऱ्या गिरीश कुलकर्णी यांनी ‘भिरकीट’ या चित्रपटात तात्या ही अफलातून व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याबद्दल बोलताना ग्रामीण बाजाच्या या चित्रपटात खूप वेगळय़ा प्रकारे व्यक्तिरेखा पाहायला मिळतात, असे त्यांनी सांगितले.  ‘‘कलाकाराच्या मनात प्रत्येक भूमिकेत वेगळं काय देता येईल हा विचार असतो. गिरीश कुलकर्णीपेक्षा निराळं, परकाया प्रवेश करून वेगळय़ा अर्थी पात्र आपल्याला कसं निभावता येईल, याचा विचार माझ्या मनात सातत्याने असतो. मुळात एकाच धाटणीच्या व्यक्तिरेखांमधूनही अभिनेता म्हणून तुम्ही काय वेगळेपण देणार हे महत्त्वाचे ठरते,’’ असे ते म्हणतात.

‘भिरकीट’ चित्रपटाचा बाज फार वेगळा आहे. त्यातून ग्रामीण वातावरण, त्या गावात राहणारे रहिवासी आणि त्यांच्यातील नातेसंबंध या अशा पार्श्वभूमीवर रंगलेली कथा आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. शहरी भागातील चित्रपट जसे प्रेक्षक पाहतो त्याप्रमाणेच ग्रामीण बाज असलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षक आवर्जून गर्दी करतो, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण धाटणीचे चित्रपट मी यापूर्वीही केले आहेत. ‘भिरकीट’चा वेगळा विषय, वेगळय़ा पद्धतीने लिहिलेले पात्र आणि दिग्दर्शक अनुप जगदाळेसारख्या छान माणसामुळे हे धाडस केल्याचे त्यांनी सांगितले.

लेखन-दिग्दर्शनात वेगळय़ा गोष्टींचा धुंडाळा करत एक अप्रतिम कलाकृती देण्याचा अट्टहास गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांचा राहिला आहे, सध्या असा कुठला विषय त्यांना खुणावतोय याबद्दल ते सांगतात, ‘‘आपल्या जगण्यातील एक गोष्ट रुपेरी पडद्यावर साकारायची असते. तेव्हा त्यातही अनेक प्रयोग केले पाहिजेत. व्यापारयुगाच्या या काळात, जागतिकीकरणानंतर सगळय़ांचे जगणे हे एकसारखे झाले आहे. खाणे, पिणे, बोलणे, अभिव्यक्ती यात सामान्यपणा आला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर तयार होणारी कथा प्रेक्षकांपर्यंत नव्याने पोहोचवण्यासाठी तुम्हाला जगून पाहावी लागेल. वेगवेगळय़ा वाटा त्यानिमित्ताने धुंडाळाव्या लागतील, वेगळा प्रवास करावा लागेल, माणसांना भेटावे लागेल. तेव्हा नुसत्या वाचनाने काही होईल असे वाटत नाही. या सगळय़ाचा अनुभव घेणे आणि त्यावर काम करत राहणे हे सुरूच असते. यातून लवकरात लवकरच गोष्ट आकाराला येवो, अशी इच्छा आहे आणि ती येणार आहे.’’

एकाच पद्धतीचे चित्रपट चालले की तो ट्रेण्ड आहे असा समज निर्माण होतो. प्रस्थापित ट्रेण्डचा कानोसा घेत व्यवसाय करावा हे मला आणि उमेशलाही रुचणारे नाही. स्वत:चा शोध घेत समकालीन लोकजीवन कसे बदलत जाते आहे, त्याचबरोबर पर्यावरणाचे, शिक्षणाचे प्रश्न आहेत. राजकारण फार बदलते आहे. जगण्याच्या दृष्टीने होणारे बदल यातले काही तरी चित्रपटातून प्रेक्षकांपुढे आणण्याचा आमचा प्रयत्न असतो.

– गिरीश कुलकर्णी

Story img Loader