मुंबईकरांची ‘लाइफलाइन’ असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. नोकरी, व्यवसाय, शाळा-कॉलेजमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईकर या लोकल ट्रेनने प्रवास करतात. प्रचंड गर्दीतून अनेक मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास रोज सुरू असतो. मुंबई शहरात रोजगार, शिक्षणानिमित्त येणाऱ्यांमुळे तर आता मुंबई व मुंबईच्या लोकल सेवेवरील ताण आणखीनच वाढला आहे. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये नेहमीच गर्दी असल्याचे दिसते. गर्दीमुळे लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याने अनेक मुंबईकर लोकलच्या दारावर लटकून प्रवास करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकलमधील गर्दीवर अक्षय इंडीकरचा संताप

मुंबईच्या याच जीवघेण्या लोकल प्रवासाचे अनेक व्हिडीओ ‘मुंबईकर्स स्पिरिट’ म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओवर एका मराठी दिग्दर्शकाने पोस्ट शेअर केली आहे. ‘उदाहरणार्थ नेमाडे’, ‘स्थलपुराण’, ‘त्रिज्या’ अशा आशयघन कलाकृतींचे दिग्दर्शक अक्षय इंडीकरने (Akshay Indikar) लोकलच्या दरवाजात उभे राहून जीवघेणा प्रवास करणाऱ्या महिलांच्या एका व्हायरल व्हिडीओवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याशिवाय त्याने सरकारची कानउघडणी केल्याचेही या पोस्टमधून दिसत आहे. महिला दिनानिमित्त पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘पायी फुफाटा’ हे गाणे लावण्यात आले आहे.

लोकल ट्रेनच्या व्यवस्थानाबद्दल अक्षय इंडीकरचा थेट प्रश्न

त्या व्हिडीओबद्दल अक्षयने (Akshay Indikar) असे म्हटले आहे, “अशीच गाणी लावून गर्दीचं, ढिसाळ नियोजनाचं, टॅक्सच्या पैशांवर राजकारणी लोकांच्या तुंबड्या भरण्याचं, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्याविषयी नाही बोलायचं. मुंबईच्या अवाढव्य अन् हाताबाहेर गेलेल्या सार्वजनिक व्यवस्थेला प्रश्न विचारायचे सोडून त्याचे उदात्तीकरण करायचे. निव्वळ बायकाच काय पुरुषही जीवावर उदार होऊन लोंबकळत प्रवास करतात. मुद्दा सरकारला जाब विचारण्याचा आहे. बाकी गाणी लावून रील करणं ठीकच”.

अक्षय इंडीकर इन्स्टाग्राम स्टोरी

पुढे अक्षयने (Akshay Indikar) “हात सटकला की खेळ खल्लास”, असे म्हणत, “रेल्वे प्रशासनाला गर्दीच्या वेळेत ऑफिसच्या, सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेत सगळ्यांना नीट निदान गाडीत उभं राहता येईल. असल्या किड्या-मुंगीच्या जगण्यावर रेल्वेला विचारलं पाहिजे ना? की हेही लोंबकळत जाणं त्याचं उदात्तीकरण करणार? त्याला ग्रेट म्हणणार? मुंबई स्पिरिट?” असे प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत.

अक्षय इंडीकर इन्स्टाग्राम स्टोरी

दिग्दर्शक अक्षय इंडीकरबद्दल…

दरम्यान, ‘उदाहरणार्थ नेमाडे’, ‘त्रिज्या’, ‘स्थलपुराण’नंतर अक्षयने (Akshay Indikar) बॉलीवूडमधील प्रसिद्ध व लोकप्रिय निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘लव्हस्टोरीया’ वेब सीरिजपैकी एका सीरिजसाठी त्याने दिग्दर्शक म्हणून काम केले. अक्षय त्याच्या सोशल मीडियाद्वारे अनेकदा सामाजिक व राजकीय विषयांवर प्रतिक्रिया व्यक्त करीत असतो. अशातच त्याने मुंबई रेल्वेच्या व्यवस्थापनाबद्दल मत मांडले आहे.