मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नेहमी हटके आणि वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट करण्यासाठी ओळखले जाणारे महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट या वादासाठी कारणीभूत ठरला आहे. ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे सध्या चांगलीच चर्चा सुरु असून यावरुन विरोध दर्शवला जात आहे. केंद्रीय तसंच राज्य महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे. महत्वाचं म्हणजे चित्रपटाचा ट्रेलरही युट्यूबवरुन हटवण्यात आला आहे.
दरम्यान महेश मांजरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना या वादावर भाष्य केलं आहे. “माझा चित्रपटच टीकाकारांच्या टीकेवर बोलेल. ट्रेलर बघून टीका करणाऱ्यांना मी काय उत्तर देऊ? नटसम्राट, भाईसारख्या माझ्या चित्रपटांनाही विरोध झाला होता. स्लमडॉगसारख्या चित्रपटालाही विरोध झाला होता. पण नंतर तो चित्रपट ऑस्करच्या रेसमध्ये होता,” असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत.
महेश मांजरेकरांच्या ‘नाय वरनभात लोन्चा..’ चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबवरुन हटवला
राज्य महिला आयोगाने मागितला खुलासा
महेश मांजरेकर यांचा या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. दोन मित्रांवर आधारित असलेल्या या क्राइम थ्रिलर चित्रपटात अनेक बोल्ड दृश्य आहेत. चित्रपटात अल्पवयीन मुलं असल्याने अनेक पालकांना यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाकडून पत्र पाठवत खुलासा मागवण्यात आला आहे.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या आहेत –
“महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला असून हे दृश्य या चित्रपटातून वगळण्यात यावे अशी मागणी होत आहे. याबाबतीत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांची या निर्मितीमागची संकल्पना,कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाकडून त्यांना लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविले आहे,” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत दिली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली दखल
दरम्यान चित्रपटामधील आक्षेपार्ह दृश्यांमुळे राष्ट्रीय महिला आयोगानेही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य असून ती काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. तसेच, हा ट्रेलर तातडीने यूट्यूबवरून काढण्याची देखील मागणी केली आहे.
ट्रेलर युट्यूबवरुन हटवला –
चित्रपटाचे निर्माते श्रेयांश हिरावत यांनी हा ट्रेलर हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी ‘ई टाइम्स’ला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “सोशल मीडियावर व इतर प्लॅटफॉर्मवर शेअर होत असलेला हा ट्रेलर आम्ही सेन्सॉर केला होता. युट्यूबवर १८ वर्षावरील प्रेक्षकांना तो पाहता येईल, याची काळजी आम्ही घेतली होती. युट्यूबवर जरी वयाची मर्यादा असली तरी इतर प्लॅटफॉर्मवर आमचे नियंत्रण नाही. अनेकांनी तो ट्रेलर डाऊनलोड करुन शेअर केला आहे. या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणे आमच्यासाठी शक्य नव्हते.”
“दरम्यान आम्ही महिला आयोगाने उपस्थित केलेल्या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे. आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. तसेच यावर कोणत्याही प्रकारचे बंडही नको आहे, म्हणूनच आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवरून ट्रेलर हटवला आहे,” असे ते म्हणाले.