दिग्दर्शक म्हणून ठरवून सुरू केलेला प्रवास नव्हता तरीही पहिल्याच लघुपटाला, ‘पिस्तुल्या’ला त्याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पुरस्कारांचा आनंद वेगळाच असतो आणि पहिलावहिला पुरस्कार म्हटल्यावर तो कुठे ठेवू आणि कुठे नको.. अशीच अवस्था नागराज मंजुळेची झाली होती. आपल्या घरात भिंतीवर सर्वाना दिसतील अशा दिमाखाने ठेवलेल्या या पुरस्काराच्या मूर्तीच चोरांनी गायब केल्या तेव्हा त्याच्या घरच्यांच्या मनात हताशपणाची एक खोल कळ उमटून गेली. पण, नागराजचा उत्साह आणि त्याहीपेक्षा त्याचा आत्मविश्वास दांडगा होता. आज भिंतीवरच्या त्याच जागेत पुन्हा दोन पुरस्कारांच्या मूर्ती मानाने मिरवणार आहेत.
दिग्दर्शक म्हणून नागराजवर पहिली राष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर उमटली ती त्याच्या ‘पिस्तुल्या’मुळे. ‘पिस्तुल्या’ या लघुपटासाठी त्याला उत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणि उत्कृष्ट बालकलाकार म्हणून याच लघुपटाचा नायक सूरज पवार यालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नागराजने सोलापुरातील करमाळा तालुक्यातील आपल्या घरी एका भिंतीवरच्या खणात हे दोन्ही पुरस्कार ठेवले होते.
मात्र, रेल्वेलाइनला लागून असलेल्या त्याच्या घरात अवघ्या काही दिवसांतच चोरी झाली. त्या पुरस्कारांच्या मूर्तीही चोरांनी गायब केल्या होत्या. ते पुरस्कार मिळावेत म्हणून नागराजने खूप प्रयत्न केले. जाहिराती दिल्या. ‘तुम्हाला पाहिजे तितके पैसे देतो पण माझे पुरस्कार परत करा’, असेही जाहीर करून झाले. पण, त्याचे सारे प्रयत्न व्यर्थ ठरले. भिंतीवरचा तो खण मोकळाच आहे.
नागराजचे पुरस्कार हरवल्यानंतर त्याच्या घरच्यांना फार वाईट वाटले पण, तो मात्र उदास झाला नव्हता. त्याच्या जिद्दी स्वभावाने घरच्यांना उत्तर दिले, मला परत राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असेल म्हणूनच चोरांनी ही भिंत मोकळी केली आहे बहुधा.. त्याचे हे उत्तर आज सार्थ ठरले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2014 रोजी प्रकाशित
यासाठीच चोरांनी ‘तो’ खण मोकळा केला!
दिग्दर्शक म्हणून ठरवून सुरू केलेला प्रवास नव्हता तरीही पहिल्याच लघुपटाला, ‘पिस्तुल्या’ला त्याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
First published on: 17-04-2014 at 05:56 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director nagraj manjule reaction after winning national award