‘आनंदी गोपाळ’, ‘डबल सीट’, ‘वायझेड’ अशा अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आज एक ट्विट केलं आहे आणि या ट्विटमुळेच ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. यात त्यांनी राहुल गांधीचं कौतुक केलं आहे. कशाबद्दल बोलत आहेत ते? जाणून घेऊया.
राहुल गांधी यांनी देशातली करोना परिस्थिती लक्षात घेत पश्चिम बंगालमधल्या आपल्या सर्व प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी कौतुक केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “ह्या कठीण काळात राहुल गांधींनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी आणि गरजेचा आहे. जबाबदारी आणि संवेदना जपणारा आहे. जनतेप्रती असलेलं कर्तव्य ते पार पाडतायत असं जाणवून देणारा आहे. हेच बाकी सर्व पक्षांनी करायला हवं.
ह्या कठिण काळात राहूल गांधीनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी आणि गरजेचा आहे! जबाबदारी आणि संवेदना जपणारा आहे! जनतेप्रती असलेलं कर्तव्य ते पार पाडतायत असं जाणवून देणारा आहे. हेच बाकी सर्व पक्षांनी करायला हवं!
— Sameer Vidwans (@sameervidwans) April 18, 2021
पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यानंतर राहुल यांनी करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता हा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्याचबरोबर त्यांनी इतर राजकीय नेत्यांना मोठ्या गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा विचार करावा असा सल्लाही दिला आहे. राहुल गांधी यांच्या या निर्णयाचं अनेक काँग्रेस नेत्यांकडून स्वागत करण्यात येत असून ते सर्वांसमोर उदाहरण ठेवत असल्याचंही म्हटलं जात आहे.
आणखी वाचाः पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द; राहुल गांधींचा मोठा निर्णय
देशातली करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांच्या संख्येत २४ तासांतच मोठी वाढ झाली आहे. देशात १ हजार ५०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १ लाख ७७ हजार १५० वर पोहोचला आहे.