रवींद्र पाथरे

सध्या मराठी रंगभूमीवर संपूर्ण शुकशुकाट आहे. ना कुठे नाटकाच्या तालमी होत, ना प्रयोग! नाटय़गृहे ओस पडली आहेत. गेल्या २२ मार्चपासून करोना संसर्गाच्या दहशतीपायी सगळ्या जगाबरोबरच मराठी रंगभूमीही स्वाभाविकपणेच ठप्प झालेली आहे. ती कधी पुन्हा सक्रीय होणार हे तो करोनाच जाणे! मात्र, करोनाची भीषण साथ येण्याआधीच शनिवार-रविवारपुरता आक्रसत गेलेला मराठी नाटय़व्यवहार करोनाच्या चक्रीवादळाने पार उद्ध्वस्त होण्याचीच भीती अनेकांना ग्रासून राहिली आहे. या आवर्तातून मार्ग कसा काढायचा, याबद्दल सगळेच चिंताक्रांत आहेत. (या काळातही नव्या नाटकाची घोषणा करणारे ‘सब कुछ’ संजय मोने आणि निर्माते संतोष काणेकर यांचा अपवाद करता) नव्या नाटकाचा विचार करणेही सध्या अशक्य आहे. भवितव्याच्या चिंतेचे काळे ढग सर्वदूर रंगभूमी व्यापून आहेत. उसने अवसान आणून किंवा ‘शो मस्ट गो ऑन’ची सवय अंगी बाणल्याने असेल, पण काहींना यातूनही आपण लवकरच बाहेर पडू अशी जबरदस्त आशा आहे. अर्थात ती बाळगायलाच हवी. मात्र, जी नाटके लॉकडाऊनपूर्वी चांगली चालली होती त्यांचे काय, असा प्रश्न काहींना पडला आहे. समजा, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सारे काही (किमान) नॉर्मल झाले तर ही नाटके मधल्या इतक्या मोठय़ा खंडानंतर पुन्हा प्रेक्षक खेचतील का, अशी रास्त शंका त्यांना वाटते आहे. कदाचित तसे झाले नाही तर अनेकांचे मोठेच नुकसान होणार आहे. (आजच्या घडीलाही रंगभूमीचे कधीही न भरून निघणारे नुकसान झालेले आहे.. होते आहे.) सहसा कुठलेही नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस पडणे आधीच मुश्कील झालेले असण्याच्या या काळात चांगले चाललेले नाटक असे अचानक बंद पडणे म्हणजे हाती-तोंडी आलेला घास मातीत जाण्यासारखेच आहे. यावर काहींनी उपाय सुचवला आहे की, ही नाटके चित्रित करून ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावीत! त्यातून निर्मात्यांचे झालेले काहीएक नुकसान तरी भरून येईल. परंतु या ओटीटी प्रदर्शनात अनेक खाचखळगे आहेत. त्याकडे मात्र ही सूचना करणाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झालेले दिसते.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
game changer ramcharan movie collection fraud
रामचरणच्या ‘गेम चेंजर’ सिनेमाची आकडेवारी खोटी? प्रसिद्ध दिग्दर्शकाने उपस्थित केली शंका, पोस्ट करत म्हणाले…
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?

मुळात नाटक ही एक जिवंत कला आहे. करणारे आणि पाहणारे यांच्या संयुक्त कृतीतून तिला आकार प्राप्त होतो. आणि यातच नाटय़कलेचे मोठेपण आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाटके प्रदर्शित करण्याने त्यांचा हा मूळ जैवबंधच हरवेल हे संबंधितांच्या लक्षात येत नाही का? मग नाटक आणि चित्रपट यांत काय फरक उरला? दस्तावेजीकरणासाठी नाटके चित्रित करणे वेगळे आणि रंगभूमीवर ऐन भरात असलेले नाटक केवळ नाइलाज म्हणून पैसे कमावण्यासाठी चित्रित करून प्रदर्शित करणे वेगळे! या दोन हेतूंमध्येच मूलत: फरक आहे. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातले थेट जैव नाते हेच तर रंगभूमीचे सामर्थ्य आहे. अन्यथा चित्रपट आल्यावर रंगभूमी संपलीच असती ना!

दुसरी गोष्ट म्हणजे नाटक आणि चित्रपट ही सर्वस्वी दोन भिन्न माध्यमे आहेत. तंत्रदृष्टय़ाही ती वेगवेगळी आहेत. त्यामुळे जो परिणाम चित्रपट घडवू शकतो, तोच परिणाम चित्रित केलेले नाटक घडवून आणू शकत नाही. याचा प्रत्यक्ष अनुभव दिल्लीतील राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) भारतीय रंगमहोत्सवासाठी नाटके निवडताना प्रत्यही येतो. मराठी नाटकांची तिथे मोठय़ा प्रमाणात निवड होत नाही, याचे कारण तिथे प्रवेशिका म्हणून पाठविल्या गेलेल्या बहुतेक मराठी नाटकांचे व्हिडीओ चित्रण हे वन कॅमेरा सेटअपमध्ये केलेले असते. त्यामुळे ते नाटक आशयदृष्टय़ा कितीही सशक्त असले तरीही ते नीट चित्रित न केले गेल्याने त्याचा परिणाम खूपच उणावतो. इतका, की ते कित्येकदा बघवतदेखील नाही. मग अशा नाटकांचे व्हिडीओज् पाहून ती कशी काय राष्ट्रीय महोत्सवांतून निवडली जाणार? याउलट, अनेक बंगाली आणि दक्षिण भारतीय भाषांमधील नाटके आशयदृष्टय़ा मराठी नाटकांपेक्षा काहीशी डावी असूनही ती चित्रपटीय तंत्राने उत्तमरीत्या चित्रित केलेली असल्याने अशा महोत्सवांतून त्यांची सहजी वर्णी लागते. अर्थात यामुळे नाटय़महोत्सवाच्या मूळ हेतूलाच तडा जातो, ही गोष्ट अलाहिदा. तथापि ही वस्तुस्थिती आहे.

नाटक आणि चित्रपट या दोन माध्यमांत अभिनयापासून तांत्रिक अंगांपर्यंत सगळ्याच बाबतीत भिन्नता आहे. उभयतांची तुलना होऊच शकत नाही. नाटकातील प्रकाशयोजना ही चित्रपटात बिलकूलच चालणार नाही. नाटकातला किंचित वरच्या पट्टीतला अभिनय (नाटय़गृहातील शेवटच्या रांगेतील प्रेक्षकांपर्यंत नाटक पोहोचण्यासाठी नाइलाजाने करावा लागणारा!) चित्रपट माध्यमात बटबटीत ठरण्याचीच शक्यता अधिक. अशा तऱ्हेने अनेक बाबतींत भिन्न असलेले नाटक ओटीटी प्लॅटफॉर्मवर कसे काय प्रदर्शित करता येईल? ओटीटी माध्यमाची मागणी त्याकरता पूर्ण करावी लागेल. मग ते नाटक राहील का? नाटकात मल्टिमीडियाचा वापर करायलाही याच कारणाने काही निष्ठावान रंगकर्मीचा विरोध असतो. रंगभूमीचे अस्सल रूप त्याने डागाळते अशी या मंडळींची प्रामाणिक धारणा असते. जिथे नाटकात मल्टिमीडियाच्या वापरालाही विरोध होतो, तिथे ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाटक चित्रित करून दाखवण्याला बहुसंख्यांचा विरोध असला तर नवल नाही.

अलीकडच्या काळात झी मराठीने अनेक नाटकांना साहाय्य करून त्यांचे नंतर प्रक्षेपणाचे हक्क घेतले आहेत असे कळते. मात्र, या व्यवहारात संबंधित नाटकांचे प्रयोग बंद झाल्यानंतरच ती नाटके चित्रित करून प्रदर्शित केली जाणार आहेत. म्हणजे एका अर्थी ते दस्तावेजीकरणही असेल; जरी त्यामागचा झी मराठीचा हेतू व्यावसायिक असला, तरीही!

सबब ‘ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी नाटके’ ही सध्या तरी अशक्यकोटीतली गोष्ट वाटते. अर्थात धंदेवाईक निर्माते सद्य:काळात कसा विचार करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे एखाद् दुसरे नाटक ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईलही. पण ते अपवाद असेल. नियम नव्हे.

Story img Loader