महाराष्ट्राला नाटकांची समृद्ध परंपरा आहेच, पण त्या नाटकांमधून वेळोवेळी समाजात घडत जाणाऱ्या बदलांचे प्रतिबिंबही दिसून आले आहेत. बदलत्या समाजानुसार मानवी नात्यांमध्ये आलेले बदलही नाटककारांनी वेळोवेळी अचूकपणे टिपले आहेत. पण नाटकाच्या जन्माची गोष्ट आणि ते नाटक प्रत्यक्ष रंगमंचापर्यंत येण्यापर्यंतचा काळाचा दस्तावेज मात्र नोंदीच्या स्वरूपात करण्याचा प्रयत्न मराठी नाटकांमध्ये तुरळकच झाला. त्यामुळे पुढच्या पिढय़ांना गाजलेल्या नाटकासंदर्भातील कथा केवळ मुखोद्दगत गोष्टींमुळे कळतात.
मराठी नाटकांबद्दलचा हाच मुद्दा लक्षात घेऊन ‘नांदी’ नाटकाचे लेखक-दिग्दर्शक हृषीकेश जोशी यांनी नाटकाच्या जन्मापासून ते त्याच्या जडणघडणीचा प्रवास सांगणारे ‘नांदी आणि मी..’ हे पुस्तक लिहिले आहे. मराठी नाटकांमध्ये भाषेचा असलेला प्रभाव लक्षात घेऊन ‘मराठी नाटकांचा भाषिक प्रभाव: १८४३ ते २०००’ या विषयावर संशोधन करण्यासाठी हृषीकेश यांना शासनाची शिष्यवृत्ती मिळाली होती. या विषयावर अभ्यास करत असताना या नाटकाची कल्पना सुचली.
संशोधनावेळी आपल्याकडे नाटकांच्या घडणजडणीचे दस्तावेजीकरण कुठेच करण्यात आले नसल्याचे हृषीकेश यांना लक्षात आले. पण नाटकाच्या लिखाणानंतर त्याला रंगमंचावर आणण्यापर्यंत अनेक खाटाटोप त्यांना करावे लागतात.
रंगभूषाकार, नेपथ्य, संगीत अशा विविध विभागांवर तज्ज्ञ काम करतात. ती प्रक्रिया मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या नोंदींची गरज एक अभ्यासक म्हणून त्यांना सतत जाणवत होती. त्यातून अशा प्रकारचे पुस्तक लिहिण्याची त्यांना कल्पना आली.
मराठी नाटकांमधील ‘प्रेम’ या समान सूत्राला पकडून नाटकांमधून उलगडलेल्या स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा प्रवास ‘नांदी’ नाटकात आहे. शरद पोंक्षे, अविनाश नारकर, चिन्मय मांडलेकर अशा दहा कलाकारांसोबत या नाटकाचे ठरवून १०० प्रयोग करण्यात आले.
या नाटकानिमित्ताने नोंदीचे पुस्तक आणण्याच्या निर्णयात हृषीकेश यांनी पुढाकार घेतला. नाटक पडद्याआड गेलं, तरी अशा दस्तावेजांमुळे वाचकाला सतत ते नाटक जगता येतं आणि अभ्यासकाला नाटककाराची विचारप्रक्रिया समजून घेण्यास मदत होत असल्याचे ते सांगतात. यामध्ये नाटकाच्या कथेच्या सुरुवातीपासून कलाकारांची निवड, रंगमंचावर नाटक आणण्यापर्यंतची धडपड अशा सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ लेखक जब्बार पटेल, दिग्दर्शक राजदत्त, गायिका उषा मंगेशकर, लेखक राजन खान आणि शास्त्रीय गायिका किशोरी अमोणकर यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. या नाटकाचे प्रक्षेपणही ‘स्टार प्रवाह’वर ३० मेला संध्याकाळी ७ वाजता दाखविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा