रवींद्र पाथरे
भारताच्या स्वातंत्र्याला फाळणीचा मोठ्ठाच डाग लागलेला आहे. इंग्रजांची ‘फोडा आणि झोडा’ नीती त्याला कारणीभूत आहे. महाराष्ट्रात आपल्याला ही फाळणीची झळ तितकीशी जाणवली नाही, जितकी ती उत्तरेत आणि पूर्व बंगालला पोहोचली. त्यामुळे आपल्याकडे फाळणीवरच्या कथा फारशा प्रचलित नाहीत. पु. भा. भावे यांच्यासारख्या काही मोजक्या लेखकांनीच त्यावेळच्या फाळणीच्या अत्याचारांवर लेखन केलेलं आहे. फाळणीच्या जखमा अत्यंत वेदनादायी आहेत यात शंकाच नाही. त्यात उभय धर्मातले लोक भीषणरीत्या पोळले गेले. आणि ज्यांनी त्या घटनांवर मानवीय सहृदयतेनं लिहिलं त्यांनी या सगळ्याची तितक्याच उत्कटतेनं दखल घेतलेली आहे. पु. भा. भावे यांनी पूर्व बंगालमधील हिंदूधर्मीय लोकांवर झालेल्या अत्याचारांच्या कथा अतिशय पोटतिडिकीनं आपल्या लेखनातून मांडल्या आहेत. आज फाळणीला ७५ वर्षांचा काळ लोटला असला तरी त्या वेदना भोगलेल्यांचा दाह कमी झालेला नाही. ‘घायाळ’ या कथासंग्रहात पु. भा. भाव्यांनी त्यांच्या या वेदना मुखर केल्या आहेत. त्याचंच नाटय़रूप शैलेश चव्हाण लिखित आणि कविता विभावरी दिग्दर्शित ‘घायाळ’ या नाटकात पाहायला मिळतं.
पूर्व बंगालमधील धर्माध फाळणीत मुस्लिमांकडून केल्या गेलेल्या अत्याचारांत सर्वस्व गमावलेल्या चार हिंदू कुटुंबांच्या या कथा-व्यथावेदना आहेत. पहिली सोमनाथ सेन याच्या गांधीवादी कुटुंबाची. फाळणीचा ज्वर चढलेला जमाव त्या कुटुंबातील आई-वडिलांना ठार करून सोमनाथच्या बायकोला- मृणालला पळवून घेऊन जातो. या धक्क्याने हतबुद्ध झालेला सोमनाथ आपलं सर्वस्व गमावल्याने आयुष्याचा अर्थच हरवून बसतो आणि सूडाने पेटून उठून अकरा मुस्लिमांची हत्या करतो. त्याबद्दल न्यायालयात आपल्या कृत्याने आपल्याला न्याय मिळाला असे आपल्या कृत्याचे जोरदार समर्थन करतो.
दुसरी कथा एका गरीब वंगकुटुंबाची. राधाराणी या कुटुंबातील कर्ती सून. त्यांच्या घरावर हल्ला करून जमाव राधाराणी आणि तिच्या नणंदेला पळवून घेऊन जातो. त्यातला एक नराधम राधाराणीवर बलात्कार करून नंतर तिला सोडून देतो. वर तिच्या परिस्थितीवर दया दाखवून थोडे तांदूळही तिच्या ओटीत घालतो. ती भयंकर अपमान सोसून घरी परतते. तेव्हा तिची सासू तिला घरात काही नसल्याने आणलेल्या तांदळाचा भात करून आपल्याला आणि नातवाला वाढायला सांगते. पण इतकी बेइज्जती झाल्यावर त्याच नराधमाने दिलेले तांदूळ शिजवून खाण्यात पापाने बरबटलेपण आहे, तेव्हा राधाराणी त्यांच्या पुढय़ातला तो भात फेकून देते. ध्वस्ततेचा सूड स्वत:वरच उगवते.
तिसरी कथा आहे शेफालिकाची. एका जमीनदार, श्रीमंत कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या शेफालिकाच्या दोन्ही बहिणींना संतप्त जमाव पळवून नेतो. त्यांचं पुढे काय होतं ते कळत नाही. तिच्यावरही बलात्कार करून तिला आपली भोगदासी बनवली जाते. तिच्या पोटात त्या क्रूरकम्र्याचा अंकुर वाढू लागतो, तेव्हा तिला स्वत:चीच किळस येऊन ती गर्भ पाडायची जडीबुटी घेऊन आपला गर्भ पाडते आणि त्या माणसावर सूड उगवते.
चौथी कथा हिमानीची. ढाक्यात बालपण गेलेल्या हिमानीवरही फाळणीत अत्याचार झालेले असतात. तिच्या छाती, पोट, पाठ, मांडीवर अत्याचाऱ्यांनी आपल्या खुणा उमटवलेल्या असतात. पुढे एक उद्योजक तिच्या प्रेमात पडतो. तिच्याशी लग्न करण्याची इच्छा प्रकट करतो. पण आपल्या शरीरावरच्या त्या फाळणीच्या आणि अत्याचाराच्या खुणा वागवत आपण वैवाहिक आयुष्य जगू शकणार नाही याची तिला पुरेपूर कल्पना असते. ती ते आपल्या प्रियकराला सांगते आणि याचा धक्का बसून तो तिच्यापासून दुरावतो.
वंगभूमीतील फाळणीच्या या आणि अशा अनेक कथा. ज्यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे, त्या व्यक्ती ते कदापि विसरणंच शक्य नाही. त्यांचं जगणं शून्यवत झालं असेल तर नवल नाही. हे सारं नाटय़रूपानं ‘घायाळ’मध्ये प्रकटलेलं आहे. लेखक शैलेश चव्हाण यांनी अत्यंत प्रत्ययकारीतेनं, अस्सलतेनं या कथा कोलाजच्या रूपात या नाटकात आकारल्या आहेत. मात्र, आज हा इतिहास आठवायचा आणि त्याचंच भांडवल करून त्याचा सूड उगवण्याची मनिषा बाळगायची, हे उचित नाही. हे सारं लोकांसमोर यायला हवं, त्यांना ते कळायला हवं, हे मान्य. परंतु असंच सगळं अन्यधर्मीयांच्या बाबतीतही फाळणीत घडलेलं आहे. तोही इतिहास आहे. तो नाकारता येईल का? जिथे जे बहुसंख्य होते तिथे त्यांनी अल्पसंख्यांवर अत्याचार केले. धर्म ही अफूची गोळी असल्याने ती चघळावी तितकी कमीच. तिचं भांडवल करून इतिहासाची पानं पुन्हा पलटण्यात काय हशील? यातून एक सूडचक्र सुरूच राहील. हिंसेतून हिंसाच जन्म घेते, हे निर्विवाद सत्य आहे. त्यातून दुसरं काहीच निष्पन्न होत नाही. आपल्याला हे परवडणारं आहे का? आणि यातून काय साध्य होणार आहे? फक्त राजकारणी आपली पोळी त्यावर भाजून घेतील, इतकंच. असो.
दिग्दर्शक कविता विभावरी यांनी हा प्रयोग उत्तमरीत्या बांधलेला आहे. यातली पात्रयोजना, प्रसंगांची गुंफण, नाटय़ात्म परिणाम यात त्या कुठेही कमी पडलेल्या नाहीत. एक उत्कट प्रयोग आपल्यासमोर उलगडत जातो. त्यातल्या व्यथावेदना, दु:खं आपल्याला हलवून सोडतात. हा कथाकोलाज रचण्याची, त्यात संगीत, नेपथ्यादी गोष्टींनी ते परिपूर्ण करण्याची ताकद त्यांच्या दिग्दर्शनात जाणवते. त्यांनी केलेली कलाकारांची निवडही यथातथ्य आहे.
आदित्य दरवेस आणि मंगेश शिंदे यांचं सांकेतिक व सूचक नेपथ्य नाटकाची मागणी पुरवणारं आहे. मयुरेश माडगावकरांचं संगीत योग्य तो नाटय़ात्म परिणाम साधतं. श्याम चव्हाण यांची प्रकाशयोजना यथार्थ वातावरणनिर्मिती करते. उल्लेश खंदारे यांची रंगभूषा पात्रांना ‘चेहरा’ देणारी. रूपेश दुदम यांचं ध्वनिसंयोजन आपलं काम चोख करते.
यातल्या कलाकारांनी आपापल्या भूमिका समजून उमजून साकारल्या आहेत. विशेषत: प्रकाश सावळे (सोमनाथ सेन), कविता विभावरी (राधाराणी), वैदेही मुळ्ये (शेफालिका), नेहा परांजपे (हिमानी), शैलेश चव्हाण (विलायत), संजीव धुरी (यासिन), अमोघ डाके (बिपीन), नम्रता दांडेकर (सासू), योगीराज बाळ (महेंद्र) यांनी आपल्या भूमिका समरसून केल्या आहेत. अन्य कलाकारही आपापल्या भूमिकांत चपखल बसले आहेत.
एक प्रत्ययकारी प्रयोग पाहिल्याचं समाधान ‘घायाळ’ देतं, यात शंका नाही.