नाटक हे मनोरंजनासाठी असावं की समाजाला संदेश देणारं, याबाबत मतमतांतरे आहेत. काही नाटकं ही निव्वळ मनोरंजनासाठीच रंगभूमीवर आणली जातात, गल्ला भरण्यासाठी. तर काही नाटकं ही फक्त आपला विचार मांडण्यासाठी आणली जातात, या नाटकांना प्रत्येक वेळी व्यावसायिक यश मिळतेच, असे नाही. तर काही व्यक्ती यामधला सुवर्णमध्य शोधून काढतात. आपल्याला जे समाजाला सांगायचं आहे, ते वेगळ्या पद्धतीने मांडतात. सध्याच्या घडीला मराठी रंगभूमीवरील काही नाटकं ही याच प्रकारात मोडणारी आहेत. समाजाला डोळे उघडण्यासाठी भाग पाडणारी आहेत, यामध्ये तीन नाटकांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ती तीन नाटकं म्हणजे ‘अनन्या’, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ आणि ‘अंदाज अपना अपना’.

काही गोष्टी या योगायोगाने घडत असतात. गोपाळ अलगेरी या निर्मात्याला एका व्यवहारात नुकसान झाले होते. यामधून बाहेर पडण्यासाठी ते ज्योतिषाकडे गेले. परिस्थितीत काहीही फरक पडला नाही. त्यानंतर ते वास्तुशास्त्रज्ञांकडेही गेले, परिस्थिती जैसे थे. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्यापासून त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्यापर्यंत साऱ्यांचे विचार ऐकले आणि अन्य कोणावरही विश्वास न ठेवता स्वत:नुसार काम करायला सुरुवात केली आणि ते या नुकसानीतून बाहेर पडले. काही वर्षांनी त्यांच्या वाचनात अशाच आशयाचे एक नाटक आले. त्यामध्ये लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांनी आपल्या शैलीनुसार काही बदल केले. ‘अंदाज अपना अपना’ हे ते नाटक. आतापर्यंतच्या नऊ प्रयोगांमध्ये या नाटकाला युवा पिढीबरोबरच व्यावसायिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही वाईट अनुभवही या नाटकाला आले आहेत. दामोदर हॉल येथे झालेल्या प्रयोगादरम्यान एका ज्योतिषाने हे नाटक पुढे चालू देणार नाही, अशी धमकीही दिली होती. पण समाजातील बऱ्याच लोकांचा या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

सध्याच्या घडीला रंगभूमीवर समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे नाटक म्हणजे ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गावीही नसताना त्यांचे अनुयायी कसे मिरवत राहतात, याचे उत्तम वर्णन या नाटकात करण्यात आले आहे. या नाटकाला वर्षभरात सर्वात जास्त विरोध झाला आहे. शिवाजी मंदिर येथील प्रयोगादरम्यान ध्वनिक्षेपक बंद करण्यात आले. पनवेलमधील प्रयोगाच्या वेळी तर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकीही देण्यात आली. दामोदर हॉलमधील प्रयोगाचा दुसरा अंक मुजोर व्यवस्थापकामुळे अंधारात झाला. पण हे सारे अडथळे पार करत ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या नाटकाने आपले विचार बिनधास्तपणे मांडले आहेत.

सर्वसाधारण मुलीची असाधारण कहाणी म्हणजे ‘अनन्या’. नऊ वर्षांपूर्वी ही एकांकिका फार गाजली होती. स्पृहा जोशी याच एकांकिकेमधून सुपरिचित झाली. सारे काही आलबेल सुरू असताना अनन्या आपले दोन्ही हात गमावते. या अपघातामुळे तिचे ठरलेले लग्न मोडते. घरातील मंडळीही तिला हवा तसा पाठिंबा देत नाहीत. पण अनन्या हार मानत नाही. आपल्या जिद्दीच्या जोरावर ती साऱ्यांना आपली दखल घ्यायला भाग पाडते, अशी ही प्रेरणास्रोत ठरणारी अनन्याची गोष्ट. अनन्या ही एकांकिका लोकांना चांगलीच भावली होती. पण एकांकिकेचं झालेले नाटकही आज समाजमनावर आपली छाप उमटवत आहे.

नाटक हे फक्त मनोरंजनापुरतं केलं तर त्याची ताकद जास्त काळ राहणार नाही. विचारांची सातत्याने होणारी घुसळण हे मराठी नाटकाचं वैशिष्टय़ आहे आणि त्यामुळेच मराठी रंगभूमी तग धरून आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे अधिकार आहेत, असं आपण म्हणतो. पण जेव्हा एखादा विषय आपल्याला काहीतरी सांगून जातो, शिकवतो तेव्हा त्याला विरोध का केला जातो? एकीकडे आपण स्वत:ला पुरोगामी म्हणवतो तर दुसरीकडे ही कद्रू मानसिकता दाखवली जाते. काही वर्षांपासून प्रेक्षकांचा दर्जा घसरल्याचे म्हटले जात होते. तो आता प्रयोग थांबवण्यापर्यंत मजल मारू लागला आहे. यासाठी वेळीच सांस्कृतिक मंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. पण स्वत:च्याच आश्वासनांच्या गर्तेत अडकलेल्या सांस्कृतिक मंत्र्यांना या साऱ्या गोष्टी माहिती आहेत का? जर माहिती असतील तर त्यांनी नेमके कोणते पाऊल उचलले, हे कुणाच्याही गावी नाही. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ आणि ‘अंदाज अपना अपना’ या दोन्ही नाटकांच्या निर्मात्यांना ज्या काही धमक्या मिळत आहेत, त्यावर कोणती कारवाई केली, याचे उत्तरही मिळायला हवे.

Story img Loader