रवींद्र पाथरे

पु. ल. देशपांडे या सर्वगुणसंपन्न व्यक्तीने हात घातला नाही अशी या कला-सांस्कृतिक जगतात एकही गोष्ट नाही याचा रोकडा प्रत्यय त्यांचं सारं साहित्य, ‘खेळिया’ रूप आणि त्यांचं आनंदयात्री जगणं यांतून स्पष्ट होते. जगण्याबद्दलचं आणि एकूणच माणसांबद्दलचं कुतूहल व जिज्ञासा हा त्यांचा स्थायीभाव. त्यातूनच त्यांचं सगळं लिखाण प्रसवलेलं आहे. नाटककार म्हणून त्यांची स्वतंत्र नाटकं जरी संख्येनं कमी असली तरी जी नाटकं त्यांनी लिहिलीत त्यातून त्यांचं नाटककार म्हणून वादातीत कौशल्य सिद्ध होतं. कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित, पु. ल. देशपांडे लिखित ‘सं. तुका म्हणे आता’चा प्रयोग पाहण्याची संधी नुकतीच मिळाली आणि याची पुष्टीच झाली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

तुकाराम महाराज हे संवेदनशील कलाकारांसाठी तसंच विद्वज्जनांसाठीही नेहमीच कुतूहलाचा विषय ठरले आहेत. त्यामागे त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या प्रत्ययकारी अभंगांचा, त्यांच्या ठायी असलेल्या उत्कट माणुसकीच्या स्पर्शाचा मोठाच वाटा आहे. तुकाराम महाराजांच्या शिवाजीमहाराजांशी झालेल्या भेटीची गोष्ट, त्यांनी तब्बल बारा वर्षे पडलेल्या दुष्काळाशी सामना करताना आपली सावकारी बंद करून अन्नान्नदशा झालेल्या लोकांना केलेली मदत, स्वत:ला वैदिक धर्माचा तारणहार म्हणवून घेणाऱ्या मंबाजीच्या कारवायांमुळे त्यांच्यावर आपल्या गाथा इंद्रायणीत बुडवण्याचा आलेला भयंकर प्रसंग आणि त्या लोकमानसात रुजलेल्या असल्याने त्या तरण्याचा झालेला चमत्कार, त्यांचं सदेह वैकुंठाला जाणं, त्यांची पत्नी आवली हिचं विठुरायाशी असलेलं भांडण अशा अनेकानेक गोष्टींमुळे तुकोबा जनसामान्यांसह अभिजनांचेही औत्सुक्यविषय न ठरते तरच नवल. पु. लं.नीही बहुधा त्याच उत्सुकतेपायी तुकाराम महाराजांवर ‘सं. तुका म्हणे आता’ हे नाटक लिहिलं असावं. तुकाराम संत म्हणून थोर होतेच; त्याचबरोबर ते ‘माणूस’ म्हणूनही संतपदाला पोहोचले होते यात शंकाच नाही. म्हणूनच त्यांची भुरळ गेली चारशे वर्ष जनताजनार्दनाला पडत आलेली आहे. असो.

आचरेकर प्रतिष्ठान निर्मित, पुलं देशपांडे लिखित आणि रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘सं. तुका म्हणे आता’ पाहताना पुलंचा तुकोबांचा सखोल अभ्यास तर जाणवतोच, त्याचबरोबर या नाटकाची मोहिनी आजच्या रंगकर्मीनाही का पडावी याचं उत्तरही मिळतं. तुकोबारायांचा ब्रह्मवृंदांनी केलेला छळ, त्याची तमा न बाळगता तुकोबांनी संतू तेली, गेन्या, पिऱ्या रामोशी अशा समाजातील शूद्रातिशूद्रांवर भक्तीचे, माणुसकीचे संस्कार करून त्यांना दिलेलं चोख उत्तर, मंबाजीच्या कुटिल कारवाया आणि त्यातून त्यांनी तुकोबांना ब्राह्मणांचा निसर्गदत्त अधिकार तेल्यातांबोळ्यांना दिल्याबद्दल न्यायासनासमोर उभं करणं, वैदिक धर्म प्रमाण मानणाऱ्या न्यायनिष्ठुर रामेश्वरशास्त्र्यांनी तुकोबारायांना दिलेली गाथा बुडवण्याची कठोर शिक्षा, नंतर आपल्या या ‘अन्याय्य’ शिक्षेची जाणीव होताच दारोदारी हिंडून रामेश्वरशास्त्री आणि त्यांच्या पत्नी जानकी यांनी लोकगंगेच्या तोंडी प्रचलित असलेले तुकोबारायांचे अभंग जातीनं गोळा करणं आणि त्याद्वारे तुकोबांपाशी क्षमायाचना करणं.. असा सगळा पट ‘सं. तुका म्हणे आता’ या नाटकात पुलंनी साकारला आहे. नाटय़पूर्ण प्रसंग, तुकोबारायांच्या अभंगांच्या लडीतून ते सलग उलगडत जाणं, आणि नाटकाच्या चरमबिंदूशी तुकोबांसह सारेच विठुचरणी नतमस्तक होणं.. हा प्रवास भक्तीरसपूर्णतेनं पुलंनी घडवला आहे.

दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी आशयाच्या मागणीनुसार कलाकारांची निवड करून अर्धीअधिक लढाई जिंकली आहे. विशेषत: यातले संगीताचं अंग असलेले कलाकार तयारीचे आहेत; जेणेकरून संगीत नाटकाचं हे शिवधनुष्य ते लीलया पेलू शकले आहेत. केवळ संगीताचं अंग हीच या कलाकारांची खासियत नाहीए, तर अभिनयाचं अंगही तितक्याच सहजतेनं त्यांना वश आहे. त्यामुळे प्रयोग उत्तरोत्तर रंगत जातो. बऱ्याच दिवसांनी रंगवलेल्या पडद्यांचं नेपथ्य नाटकात बघायला मिळालं. त्याचं श्रेय नेपथ्यकार अंकुश कांबळी यांना द्यायला हवं. मंगेश कदम आणि वैभव मांजरेकर यांचं भावानुकूल संगीत आणि संजय तोडणकर यांची प्रसंग ठळक करणारी प्रकाशयोजना नाटकाचं अविभाज्य अंग आहेत. रंगभूषा आणि वेशभूषेची जबाबदारी तारक कांबळी यांनी उत्तम सांभाळली आहे. कुणाल आंगणे यांनी साकारलेला तुकाराम संतांचे सारे गुण, त्यांची लीनता, माणुसकीचा गहिवर, समाजातील अन्यायानं पेटून उठणं, तळागाळातील माणसांबद्दलची अपार कणव दर्शविणारा आहे. त्यांची दयाद्र्र देहबोली बरंच काही करून गेली आहे. दीक्षा पुरळकर यांची आवली ठसकेबाज. श्याम नाडकर्णी कावेबाज मंबाजी म्हणून शोभलेत. शरद सावंत यांनी शिवाजी महाराज आणि न्यायाधीश रामेश्वरशास्त्री अशा दोन्ही भूमिकांचा उचित आब राखला आहे. प्रियांका भुसळे यांनी रामेश्वरशास्त्र्यांची पत्नी जानकी हिची भूमिका वास्तवदर्शी वठवली आहे. त्यांचं गाणं अत्यंत श्रवणीय आहे. सुधीर तांबे (संतू), विकास कदम (गेन्या) आणि राजेंद्र कदम (पिऱ्या) यांनीही आपापली कामं चोख केली आहेत.

Story img Loader