‘सावित्री’ ही पु. शि. रेगे यांची गाजलेली पत्रात्मक कादंबरी. १९६२ सालातली. (तब्बल ५५ वर्षांपूर्वीची!) पण आजही वाचकांवरील तिचं गारुड ओसरलेलं नाही. ही कादंबरी गाजण्याची कारणं अनेक. एकतर तिचं पत्रात्मक स्वरूप. ही पत्रंही कादंबरीची नायिका सावित्री हिनं आपल्या प्रियकराला लिहिलेली. एकतर्फीच. तरीही त्यांत जराही तुटकपणा जाणवत नाही. या कादंबरीतली सगळी पात्रं सावित्रीच्याच नजरेतून आपल्याला कळतात. मग ते ‘ते’ (सावित्रीला ज्यांची ओढ वाटते आहे ते- ‘ते’!) असोत, की तिचे प्रकांड पंडित वडील आप्पा; आईपश्चात साऊला मातेची ममता देऊन तिला वाढवणारी गोष्टीवेल्हाळ राजम्मा असो वा आप्पांचे ऑक्सफर्डमधले सहाध्यायी (आणि आता कुर्गमध्ये स्थायिक झालेले) व सुहृद एजवर्थ असोत; जपानमधील आनंद मिशनचे संचालक प्रो. नामुरा असोत वा तिथे सावित्रीला भेटलेली जीवश्चकंठश्च स्वीडिश मैत्रीण ल्योरे असो; प्रत्येक पात्र आपल्याला आकळतं ते सावित्रीच्या निखळ, निर्मळ, पारदर्शी दृष्टिकोनातूनच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एप्रिल १९३९ ते जून १९४७ अशा आठ वर्षांतला हा पत्रव्यवहार आहे. सावित्रीचं शेवटचं पत्र (१५ ऑगस्ट १९४७ ला) कुर्गमध्ये एजवर्थ यांच्या स्मृत्यर्थ साकारलेल्या ‘खेळघरा’त होऊ घातलेल्या लच्छी आणि मोराच्या नाटय़प्रयोगाची घोषणा करून संपतं.  एका अर्थी हा सावित्रीचा ‘स्वतंत्र’ व्यक्ती म्हणून आयुष्यातले चढउतार अनुभवत, प्रगल्भतेची एकेक पायरी चढत झालेला हा प्रवास आहे. अनेक रूपककथाही यादरम्यान आपल्याला भेटतात. सावित्रीच्या पत्रांतून तिचं जीवनविषयक तत्त्वज्ञानही उद्धृत होतं. म्हटलं तर ही एका नवथर प्रेयसीनं आपल्या प्रियकराला लिहिलेली पत्रं आहेत. पण त्यांचा कॅनव्हास मोठा आहे. ही कुणा सामान्य प्रेमिकेची प्रेमातुर पत्रं नाहीत, तर भोवतीचं जीवन समजून घेऊ पाहणारी.. नव्हे, ते उत्कटपणे जगणाऱ्या एका आनंदभाविनीची ही पत्ररूप रोजनिशी आहे. तिचं उन्नत, विशाल भावविश्व त्यातून अलवारपणे उलगडत जातं.

योगायोगानं रेल्वेच्या एका प्रवासात भेटलेल्या आणि सहज ओळख झालेल्या ‘त्यांना’(‘ते’ मुद्दाम अनामिक ठेवलेत.) सावित्री कुठल्या अंत:प्रेरणेनं पत्रं पाठवायला सुरुवात करते, कुणास ठाऊक. पण ‘ते’ही तिच्या पत्रांना प्रतिसाद देतात. आणि मग हा पत्रांचा सिलसिला सुरूच राहतो. ‘त्यांची’ पत्रं जरी या कादंबरीत नसली तरी त्यांच्या पत्रांतला आशय आपल्यापर्यंत पोचतो तो सावित्रीच्या पत्रोत्तरातून. सावित्रीचं विश्रब्ध मन झोपाळ्यावाचून झुलण्याच्या या बावऱ्या वयात कुठं कुठं आणि कसं कसं विहरत जातं याचं नितळ प्रतिबिंब तिच्या या पत्रांतून उमटलं आहे. सुरुवातीची नवथर ओळख पुढं पत्रापत्रीतून अधिक घट्ट होत जाते. या आठ वर्षांत सावित्री आणि ‘त्यांची’ केवळ दोनदाच प्रत्यक्ष भेट होते. पहिल्यांदा रेल्वेगाडीत. चुटपुटती. अनोळखी असतानाची. आणि दुसऱ्यांदा ते तिला भेटायला तिच्या गावी- तिरुपेटला (कुर्ग) येतात तेव्हाची. या प्रत्यक्ष भेटींचे फारसे तपशील मात्र पत्रांतून येत नाहीत. त्यांच्यात जी काही भावनिक, मानसिक आणि वैचारिक देवाणघेवाण होते ती केवळ पत्रांतूनच. या पत्रांत व्यक्तिगत संदर्भ तसे अभावानंच आढळतात. पण जेव्हा येतात तेव्हा त्यातून सावित्रीची त्यांच्याप्रतीची अनावर ओढ व्यक्त होते.

सावित्रीचे प्रकांड विद्वान वडील आप्पा ‘एक्सपीरिअन्स अ‍ॅण्ड ग्रोथ’ हा तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ लिहीत असतात. त्यांचे ब्रिटिश सुहृद एजवर्थ (कुर्गमध्ये स्थायिक झालेले!) हे त्यांच्या लेखनाचे पहिले चिकित्सक श्रोते. आईविना वाढणाऱ्या साऊबद्दल एजवर्थना लेकीगत लळा आहे. फुलपाखरी आयुष्य वाटय़ाला आलेली सावित्री बंगरुळूमध्ये कॉलेजशिक्षण घेते आहे. सध्या सुट्टीसाठी ती तिरुपेटला आलीय. या प्रवासातच तिची ‘त्यांच्या’शी भेट झालीय.

‘ते’सावित्रीच्याच कॉलेजात पदव्युत्तर पीएच. डी. करणारे बुद्धिमान तरुण आहेत.  पण त्या दोघांची कॉलेजात कधीच गाठ पडली नाही. ते प्रवासात पहिल्यांदा एकमेकांना भेटतात. आणि या भेटीतच त्यांच्यात आपसूक आपलेपणाची भावना अंकुरते. त्यातून मग उभयतांत पत्रव्यवहार सुरू होतो. ‘त्यांनी’ आपल्या गावी यावं म्हणून ती गळ घालते. तेही यायचं कबूल करतात. त्यांच्या येण्याच्या कल्पनेनंच ती मोहरते. त्यांच्याकरता अनेक बेत आखते. पण ऐनवेळी त्यांचं येणं रद्द होतं. कारण त्यांना ऑक्सफर्डला जाण्याची संधी मिळालेली असते. त्यांच्या न येण्यानं सावित्री हिरमुसली होते. पण लगेचच स्वत:ला सावरतेही. ‘त्यांच्या’कडून आपण खूप अवाजवी अपेक्षा तर करत नाही आहोत ना, याचं भान येऊन ती पुन्हा ‘नॉर्मल’ होते. त्यांच्यातला पत्रव्यवहार सुरूच राहतो. दरम्यान, आप्पांना जपानमधील आनंद मिशनचे प्रो. नामुरा त्यांच्या अभ्यासविषयावर व्याख्यानमाला गुंफण्यासाठी निमंत्रित करतात. त्यांच्या सोबत सावित्रीलाही जावं लागतं. तिथल्या विद्याभ्यासाच्या सात्त्विक वातावरणात दोघं सहज सामावून जातात. इथं सावित्रीला ल्योरे ही जीवश्चकंठश्च स्वीडिश मैत्रीण मिळते. त्यांचे लगेच सूर जुळतात. ल्योरेला भारतीय कलेचा अभ्यास करायचा असतो.

‘ते’ही उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना होतात. आणि त्याचवेळी दुसऱ्या महायुद्धाचे काळे ढग आसमंत व्यापतात. युरोपात युद्धाला तोंड फुटतं. ‘ते’ युद्धाच्या धुमश्चक्रीत सापडतात.

इकडे जपानही युद्धात ओढला जातो. आप्पांच्या आनंद मिशनमधील व्याख्यानांनी प्रभावित होऊन क्योटो विद्यापीठ त्यांना वर्षभर मानद व्याख्याते म्हणून तिथं वास्तव्याची विनंती करतं. आप्पाही ती स्वीकारतात. साहजिकच सावित्रीचाही जपानमधील मुक्काम वाढतो.

पुढं बऱ्याच उलथापालथी होतात. आप्पा जपानमध्ये आजारी पडतात आणि त्यातच त्यांचं निधन होतं. युद्धामुळे सावित्रीला भारतात परत येणं शक्य नसतं. ती तिथंच नर्सची नोकरी पत्करते. तिथे आझाद हिंद सेनेतील डॉ. सेन यांच्याशी तिची भेट होते. त्यांची जपानी पत्नी गर्भवती असते. गोदीतील बॉम्बहल्ल्यात डॉ. सेन यांचा मृत्यू ओढवतो. त्या धक्क्य़ाने त्यांची पत्नी अकाली बाळंत होते आणि त्यातच ती जाते. सावित्री तिच्या पोरक्या मुलीला- बीनाला घेऊन भारतात परतते.. स्वत:ची मुलगी म्हणून!

कुर्गमध्ये तिचं आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू होतं. पण आता पूर्वीचं काही उरलेलं नसतं. एजवर्थही निवर्तलेले असतात. त्यांनी त्यांची कुर्गमधील प्रॉपर्टी सावित्रीच्या नावे केलेली असते. सावित्री त्यांच्या घराचं ‘खेळघर’ बनवते; ज्यात सगळ्या कलांची उपासना व्हावी अशी तिची इच्छा असते. युद्ध संपल्यावर इंग्लंडमध्ये अर्धवट राहिलेलं आपलं  शिक्षण ‘ते’ पुढं सुरू करतात. उभयतांतला पत्रव्यवहार सुरूच असतो. आता त्यात बीनाच्या पत्रांची नवीन भर पडलेली असते..

पु. शि. रेगे यांच्या या जगावेगळ्या पत्ररूप प्रेमकहाणीचं रंगाविष्कारात रूपांतर करणं खचितच सोपी गोष्ट नाही. पण ‘मिती-चार’, कल्याण आणि ‘अस्तित्व’, मुंबई या संस्थांनी ती मनावर घेतली आणि त्यांनी ‘सावित्री’ हा एकपात्री रंगाविष्कार सादर केला. रवींद्र लाखे यांनी त्याची रंगावृत्ती, नेपथ्य आणि दिग्दर्शन केलं आहे. हे पत्ररूप सादरीकरण असल्यानं ‘तुम्हारी अमृता’प्रमाणे बैठय़ा स्वरूपात हा रंगाविष्कार सादर करणं सहज शक्य होतं. परंतु दिग्दर्शक रवींद्र लाखे यांनी ‘सावित्री’तील नादमय आशय आविष्कारित करताना त्यातील अनाहत नाद, लयींचं गारुड आणि ध्वनींचं रूप रंगमंचावर पेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुरूप सादरकर्त्यां कलावंताला एका जागी स्थिर बैठक न देता कथाशयानुसार तिला नृत्यबद्ध हालचाली त्यांनी दिल्या आहेत. कधी बसून, कधी येरझारा घालत,  कधी गाण्याच्या लकेरीवर नृत्यवत तालबद्ध पावलं टाकत अशा विविध व्यवहारांतून कथ्य विषयाला सुयोग्य दृश्यात्मकता लाभेल हे त्यांनी पाहिलं आहे. नेपथ्याचं अवडंबर न माजवता टेबल, खुर्ची आणि घराच्या उंबरठय़ाच्या पायऱ्या एवढय़ाच सीमित अवकाशात त्यांनी सगळा प्रयोग बांधला आहे. या प्रयोगात सर्वात महत्त्व होतं ते सावित्रीच्या संवादोच्चारांना. यात संवादांतले आरोह-अवरोह, भावनिक आंदोलनं, मानसिक-वैचारिक हिंदोळे ताकदीनं व्यक्त होणं गरजेचं होतं. त्याला शारीरभाषेची जोडही महत्त्वाची होती. प्रिया जामकर या बुद्धिमान कलावतीच्या निवडीतच दिग्दर्शक लाखे यांनी अर्धीअधिक बाजी मारली. त्यांचा विलक्षण बोलका चेहरा, उत्फुल्ल, उत्कट अन् बुद्धिमान संवादफेक, सावित्रीच्या चौफेर वावरात ओसंडून वाहणारं अल्लड निरागसपण.. अन् पुढे परिस्थितीवश तिच्या देहबोलीतून प्रक्षेपित होणारी प्रगल्भ परिपक्वता हे सारं प्रिया जामकरांनी अक्षरश: सजीव केलं आहे. रेग्यांची ‘सावित्री’ जणू त्यांच्या रूपानं सशरीर प्रकटली आहे असं वाटतं. प्रेमात आपल्या आवडत्या व्यक्तीला समर्पणभावानं शरण जाणं अपेक्षिलं जात असलं तरी ही प्रणयिनी त्यातली नव्हे. तिला तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. आणि त्याचं पुरेसं भानही. ती फार क्वचित भावविवश होते. पण तेही तात्कालिक. त्यात ती वाहवत जात नाही. माणूस म्हणून ती उत्तरोत्तर कशी प्रगल्भ होत जाते याचं प्रत्ययकारी दर्शन ‘सावित्री’त घडतं. कौशल इनामदार यांच्या संगीतानं हा रंगाविष्कार तरल, कलात्मक पातळीवर जातो. मकरंद मुकुंद यांच्या प्रकाशयोजनेनं या भावनाटय़ातली कोमलता गहिरी होते. मनीष पाठकांच्या नृत्यआरेखनानं या आविष्काराला नाद व लयीचं परिमाण लाभलं आहे. प्रीतीश खंडागळे (ध्वनीसंयोजन), महेंद्र झगडे (रंगभूषा) आणि शुभा गोखले- शीतल ओक (वेशभूषा) यांचाही या संस्मरणीय प्रयोगात मोलाचा वाटा आहे.

हा अविस्मरणीय रंगाविष्कार जाणकार रसिकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहील यात काहीच शंका नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi drama savitri review
Show comments