निर्माते अभिजित साटम यांच्या आगामी ‘सुसाट’ या नाटकात रंगभूमीवर रेल्वे फलाट आणि सुसाट जाणारी ट्रेन पाहायला मिळणार आहे. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ आणि ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस’ ही नाटके यापूर्वी साटम यांनी सादर केली आहेत. अजित देशमुख लिखित आणि प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘सुसाट’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १५ ऑगस्ट रोजी सादर होत आहे.
या नाटकाबाबत बोलताना अभिजित साटम म्हणाले, मुंबई ही स्वप्ननगरी असून येथे येण्याचे आणि नोकरी-व्यवसाय करण्याचे प्रत्येकाचे एक स्वप्न असते. नाटकातील नायकाच्या घराण्यात यापूर्वी काहीजणांनी मुंबईला जाण्याचे प्रयत्न केलेले असतात पण काही ना काही कारणाने ते कोणीच मुंबईला पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आपण तरी मुंबईला जायचेच असे मनाशी ठरवून तो मुंबईला जाणाऱ्या गाडीत बसतो. एका रेल्वे स्थानकावर गाडी थांबते तो गाडीतून खाली उतरतो आणि गाडी सुटते. त्यानंतर तो येणारी गाडी पकडण्याचा प्रयत्न करतो, पण पुढे काय होते ते तुम्ही प्रत्यक्ष नाटकातच पाहा.
नाटकाच्या निमित्ताने रंगमंचावर रेल्वे स्थानक उभे करण्यात आले असून येथून जाणारी गाडीही पाहायला मिळणार आहे. रेल्वेस्थानक म्हणजे माणसांचे वेगवेगळे नमुने आणि येणारे गमतीदार अनुभव व घडणाऱ्या गमतीजमती. या नाटकात ते सर्व काही पाहायला मिळणार आहे. प्रियदर्शन जाधव, गौरी सुखटणकर, पौर्णिमा अहिरे, सुशील इनामदार आदी प्रमुख कलाकार या नाटकात आहेत. मीरा वेलणकर यांचे नेपथ्य, आदिती मोघे यांची वेशभूषा तर ऋषिकेश कामेरकर यांचे ध्वनी संयोजन ‘सुसाट’साठी असल्याची माहितीही साटम यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा