प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांनी ऐंशी ते नव्वदच्या दशकादरम्यान लिहिलेली नाटय़त्रयी म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’. एकाच कुटुंबातील तीन पिढय़ांचे भावनिक स्थित्यंतर दाखवताना एकूणच समाजव्यवस्थेवर, कुटुंबव्यवस्था-मूल्ये या सगळ्यावर अचूक बोट ठेवणाऱ्या या नाटय़त्रयीचे संदर्भ आज अठ्ठावीस वर्षांनीही तितकेच चपखल लागू पडतात. हीच या नाटय़विचारांची ताकद आहे. दिग्दर्शक-निर्माता म्हणून पुन्हा रंगभूमीवर या त्रिनाटय़धारेला जिवंत करताना यातील दोन नाटकांचे सलग प्रयोग करण्याचा आणि प्रेक्षकांना ते पाहायला लावण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रकांत कुलकर्णी यांनी केला आहे. एलकुंचवारांचे विचार आणि चंद्रकांत कुलकर्णीसारख्या नव्या दमाच्या दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून सादर झालेल्या या अनोख्या प्रयोगाविषयी लोकांच्या मनात कुतूहल दाटले नसते तरच नवल. यानिमित्ताने, नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते-अभिनेत्री यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात येऊन या नाटकाचे उद्दिष्ट व स्वानुभव, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’ या त्रिनाटय़धारेचा वेगळा प्रयोग आदींबाबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित व ‘अष्टविनायक’ आणि ‘जिगिषा’ निर्मित या नाटकाचा प्रयोग करणाऱ्या दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, निर्माते श्रीपाद पद्माकर व दिलीप जाधव, अभिनेता प्रसाद ओक, वैभव मांगले, सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री प्रतिमा जोशी, नेहा जोशी, भारती पाटील आदींबरोबर ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात हे गप्पाष्टक रंगले होते. या नटसंचाला या वेळी ‘लोकसत्ता’चे रवींद्र पाथरे यांनी बोलते केले.
‘वाडा चिरेबंदी’ हे अभिजात नाटक समकालीन मूल्य जपणारे नाटक असून, सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर हे नाटक टोचणारे ठरेल. जितका या नाटकाला उशीर होईल तितकी त्याची ‘शेल्फ व्हॅल्यू’ वाढत जाणार आहे. नाटककार महेश एलकुंचवारांनी या नाटकात संपूर्ण महाराष्ट्राचा ‘लसावि’ मांडला आहे, असे मत ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी या नाटकाबाबत बोलताना व्यक्त केले.
‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाच्या निर्मितीमागचा उद्देश मांडताना कुलकर्णी म्हणाले की, ‘माणसाचं जगणं म्हणून जगताना हे नाटक खूप टोचतं. गांधींनी सांगितले की खेडय़ाकडे चला, मात्र आपण विकास झाल्यावर शहरांकडे आलो. ऐंशीच्या शहरांच्या विकासाच्या काळात हे नाटक लिहिले गेले. त्या काळाचा प्रभाव या नाटकावर आहे. आपल्या मुळांकडचा प्रवास, नातेसंबंधांमधील गुंतागुंत हे नाटकात प्रकर्षांने दिसतं. मूल्य, सरंजामशाही ही सोडवत नसण्याची मनाची कुतरओढ या नाटकात आहे. गेल्या ३० – ४० वर्षांचा ‘लसावि’ या नाटकात एलकुंचवारांनी काढला आहे. या नाटकाकडे आम्ही चळवळ म्हणून पाहतो.’
पुढे या नाटकाच्या प्रयोगाबद्दल ते म्हणाले, महेश एलकुंचवारांमुळे या नाटकाला उत्तम निर्मिती मूल्ये मिळाली. त्याच बळावर २०१४ साली या नाटकाचा प्रयोग केला. यात सहकारी प्रतिमा जोशी यांनी मोलाचे सहकार्य केले. यात मला नटसंच खूप चांगला मिळाला. नाटकासाठी आम्ही नव्या-जुन्या पिढीचा संगम घडवून आणला. ही फार मोठी कसरत असून त्याचा आम्हाला विलक्षण अनुभव मिळाला. नटांनी रंगभूमीला प्रथम प्राधान्य दिले. मध्यंतरी कोणत्याही नटाकडून असे होत नव्हते कारण, ते रंगभूमीला प्राधान्य देणारे नव्हते. या नाटकाला उत्तरोत्तर चांगला प्रतिसाद मिळू लागला. पुण्यात बालगंधर्वमध्ये या नाटकाचा पन्नासावा प्रयोग चालू असताना प्रेक्षकांनी विचारले की ‘मग्न तळ्याकाठी’ कधी येणार?, ही फार रोमांचकारी घटना होती. प्रेक्षकांकडून अशी विचारणा झाल्यावर आमचा उत्साह दुणावला’, असे कुलकर्णी यांनी सांगितले. ‘वाडा चिरेबंदी’चे १२५ प्रयोग झाल्यानंतर आम्ही सलग प्रयोगात ‘मग्न तळ्याकाठी’ केले. यातील नटांनी त्यांची कामे सोडली, मात्र या सलग नाटकांचा त्यांनी अनुभव घेतला. याच वर्षी सलग ६ तास नाटक बघायला लोक येतात ही समाधानाची बाब आहे. यातही प्रेक्षक विचारू लागले की, ‘युगान्त’ कधी येणार?, त्यामुळे ही त्रिनाटय़धारा केली तर रंगभूमीवरची ती फार मोठी गोष्ट ठरेल. महाराष्ट्रात सवाई गंधर्वची मैफिल रात्रभर चालते. त्यामुळे अजूनही अशा प्रयोगांना साथ देणारे लोक आहेत. त्रिनाटय़धारा केल्याने एक वर्तुळ पूर्ण होईल. कारण, ही नाटके कालातीत आहेत, ती वारंवार केली पाहिजेत, त्यांची कालसुंसगतता तपासली पाहिजे, असे आग्रही मत त्यांनी व्यक्त केले.
नाटकातील अनुभवाबाबत अभिनेता वैभव मांगले म्हणाले की, ‘मला माझी विनोदी अभिनेत्याची प्रतिमा तोडायची होती. प्रतिमा बनवणं कठीण असतं, ती बनल्यानंतर मात्र त्याच त्याचपणाचा कंटाळा येतो. मला यातून प्रसिद्धी मिळवायची नसून कीर्ती मिळवायची आहे. मला चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले होते की, तुला एक उत्तम भूमिका एक दिवस देईन. विनोदापेक्षा सशक्त भूमिका तू करशील असा माझा विश्वास आहे. ती भूमिका मला ‘वाडा’मधून मिळाली.’
तर याच नाटकात धरणगावकर देशपांडे कुटुंबातील सुधीरची भूमिका करणाऱ्या प्रसाद ओक यांनी प्रायोगिक रंगभूमीवर साकारलेल्या या त्रिनाटय़धारेच्या आठवणींना उजाळा दिला. ‘प्रायोगिक नाटय़भूमीवर कुलकर्णीनी त्रिनाटय़धारा आणली तेव्हा मी प्रत्येक प्रयोग पाहिला होता. अशा नाटकात आपल्याला काम करता आले पाहिजे असे वाटत होते. या नाटकात प्रवेश मिळून ते माझ्या आयुष्यातले ‘टर्निग पॉइंट’ ठरले. ही तिन्ही नाटके मला तोंडपाठ आहेत. नव्या-जुन्या पिढीचा उत्तम मेळ या नाटकात दिग्दर्शक कुलकर्णीनी घडवून आणला आहे’, असे प्रसाद ओक यांनी या वेळी बोलताना सांगितले.
अभिनेत्री प्रतिमा जोशी म्हणाल्या की, ‘९४ साली या नाटकात मी प्रथम साहाय्यक म्हणून काम पाहत होते. प्रयोग चालू असताना नाटकातील एक अभिनेत्री ऐनवेळी न आल्याने मी ‘मग्न तळ्याकाठी’मध्ये काम केले. त्यामुळे या २२ वर्षांत माझी समज खूपच वाढली. नाटकातील भावभावना सगळ्यांपर्यंत पोहोचवता आल्या’.
या नाटकामुळे माणूस म्हणून समृद्ध झाल्याचे भारती पाटील यांनी सांगितले. ‘या नाटकासाठी मला कुलकर्णीनी विचारल्यावर मी तात्काळ होकार कळवला. मला नागपुरी लहेजा येत होता. ‘वाडा चिरेबंदी’ ते ‘मग्न तळ्याकाठी’ करतानाच्या प्रवासात मला ‘वाडा चिरेबंदी’ नीट उमगले आणि त्यामुळे जगणे समृद्ध झाले, असे त्या म्हणाल्या.
नाटकात बहिणीची रंजूची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री नेहा जोशीने हे नाटक आपल्यासाठी एक अद्भुत अनुभव असल्याचे सांगितले. ‘एका अंधाऱ्या खोलीत आपण स्वतला बघतो. दिग्दर्शकाने उभे केलेले विश्व आपण फिरत असतो हे अवर्णनीय आहे. ‘ललित कला’मध्ये मी या नाटकातील अंजलीची भूमिका केली होती. सध्या मी रंजूची भूमिका करत असून हे काम खूप कठीण होते. या नाटकात उत्तम संहिता, उत्तम दिग्दर्शन, उत्तम नट या सगळ्याच गोष्टी जळून आल्या’, असे नेहाने सांगितले.
तर अमेरिके तून शिकून आल्यानंतरही मूळ स्वभाव न गेलेला, काहीसा अनुभवाने शहाणा होत जाणारा आजच्या पिढीतील अभयची भूमिका रंगवणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने या नाटकात काम करण्याची अनेक वर्षांची इच्छा होती, असे सांगितले. ‘या नाटकातून दिग्दर्शकाकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. खरे म्हणजे या नाटकात प्रवेश केल्यावर विद्यापीठात प्रवेश घेतल्याची अनुभूती मला मिळाली. ‘मग्न तळ्याकाठी’मधील अभयची भूमिका हा माझ्याही आयुष्यातील ‘टर्निग पॉइंट’ आहे’, असे सिद्धार्थ म्हणाला.
ज्या वेळी या नाटकाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा याला ‘बॉक्स ऑफिस’वर कसा प्रतिसाद मिळेल याची चिंता होती. शुभारंभ झाला तेव्हा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, असे निर्माते श्रीपाद पद्माकर यांनी सांगितले. तर दुसरे निर्माते दिलीप जाधव म्हणाले की, गेल्या पाच वर्षांतील ‘अष्टविनायक’ व ‘जिगिषा’ यांचे हे चौथे नाटक आहे. पैसे कसे मिळतील याचा विचार मी करत नाही. अनेक चांगली नाटकं पैसे कमवू शकली नाहीत. पण या नाटकाने समाधान मिळते. ‘वाडा चिरेबंदी’ला प्रतिसाद मिळेल की नाही याची शंका होती. पण, कुलकर्णीवर माझा विश्वास आहे व तो सार्थ ठरला’, असे दिलीप जाधव यांनी सांगितले.
प्रेरणा ‘लोकसत्ता’ने दिली..
या नाटकाचे प्रेरणास्थान हे खऱ्या अर्थाने ‘लोकसत्ता’च आहे असे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, २०१४ च्या सप्टेंबरमध्ये ‘लोकसत्ता’च्या संपादकांचा मला फोन आला की, एलकुंचवारांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्याविषयी लेख लिहाल का? मीही लेख लिहिण्यास तयार झालो. एलकुंचवारांवर लिहिताना ‘वाडा चिरेबंदी’च्या कामाकडे त्रयस्थपणे बघता आले. या नाटकाचे डॉ. श्रीराम लागूंकडे वाचन झाले होते. या लेखानंतर हे नाटक करण्याचा विचार सुरू झाला आणि त्यातूनच हे नाटक पडद्यावर आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा