नशीब कुणीही बदलू शकत नाही. एखादी गोष्ट जी तुमच्या नशिबात असेल तर ती तुम्हाला मिळतेच. आज प्रयोगांचे शतक झळकवणाऱ्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचीही गोष्ट अशीच काहीशी. लेखक शेखर ढवळीकर यांनी हे नाटक दिग्दर्शक मंगेश कदम यांना ऐकवलं. त्यांना ते आवडलं. हे नाटक आपण पत्नी लीना भागवतसह करायचं असं मंगेश यांनी ठरवलंही. पण काही दिवसांत ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले यांनीही ही संहिता ऐकली. त्यांनाही ती आवडली. आणि हे नाटक आपण करावं, असं त्यांना वाटलं. त्यांनी आपली ही इच्छा मंगेश यांना बोलून दाखवली. कुठेही हिरमोड न करता मंगेश विक्रम गोखलेंबरोबर हे नाटक करायला तयार झाले. विक्रम गोखले यांच्याबरोबर रिमा यांच्या अभिनयाने नटलेलं हे नाटक रंगभूमीवर आलं. काही प्रयोगांनंतर विक्रम गोखले यांना आवाजाचा त्रास जाणवायला लागला आणि यापुढे नाटक न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण नाटक एवढं दर्जेदार होतं की, ते बंद पडू नये अशी त्यांचीही इच्छा होती. त्यांनी मंगेश यांना बोलावलं आणि सांगितलं की, ‘मी तर आता हे नाटक करू शकत नाही, पण नाटक बंद पडू नये, असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही आणि तुमची पत्नी लीना यांनी नाटकातील मुख्य भूमिका कराव्यात’. आणि अशा पद्धतीने हे नाटक अखेर या जोडीच्या आयुष्यात आलं.

दिग्दर्शक म्हणून मंगेश कदम यांची कारकीर्द साऱ्यांनाच माहीत आहे. पण एक नट म्हणूनही त्यांनी काही भूमिका गाजवल्या आहेत. त्याचबरोबर ऐनवेळी कराव्या लागलेल्या काही बदली भूमिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘वस्त्रहरण’ नाटकाच्या गाजलेल्या परदेश दौऱ्यात मंगेश यांनी दिलीप कांबळींनी वठवलेली ‘गोप्या’ची भूमिका केली होती. ‘कबड्डी-कबड्डी’ नाटकाचा अमेरिका दौरा ठरला असताना विनय आपटे यांना व्हिसा मिळाला नव्हता, तेव्हा त्यांची भूमिकाही मंगेश यांनीच केली होती. त्याचबरोबर ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ने पुनरागमन करायचं ठरवलं तेव्हा ‘भय्या हातपाय पसरी’ या नाटकात त्यांनी मच्छिंद्र कांबळी यांनी केलेली भूमिका केली होती. आता या नाटकात चौथ्यांदा ते अशी ‘बदली’ भूमिका करताना दिसत आहेत.

भूमिका कोणी केली होती, हे मी लक्षात घेत नाही. त्यापेक्षा ती व्यक्तिरेखा काय म्हणते, काय विचार करते, तिची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती काय आहे, याचा विचार केल्यावर मला ती भूमिका वेगळ्या पद्धतीने दिसायला लागते. हे नाटक करताना मी विक्रम गोखले यांची नक्कल केली नाही, तर त्या व्यक्तिरेखेच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला. बदली नट म्हणून कधीही काम करताना मी त्या नटाची नक्कल करत नाही, असं मंगेश या नाटकाबद्दल सांगत होते.

विशेष बाब म्हणजे विक्रम गोखलेंनी मंगेश आणि लीना यांनी केलेले नाटक पाहिले आणि त्यांना ते आवडले. नाटक पाहिल्यावर ते रंगमंचावर आले आणि ‘माझी आणि रिमाची नक्कल न करता या दोघांनी वेगळ्याच पद्धतीने हे नाटक सादर केलं’, अशी पोचपावतीही दिली.

नाटकामध्ये जेव्हा आपली गोष्ट येते तेव्हा ते नाटक रसिकांच्या काळजाला भिडतं. हे नाटक प्रत्येक सर्वसामान्याचं आहे. आयुष्यात दोन वेळची जेवणाची भ्रांत पडू नये म्हणून माणूस धावपळ करत असतो. पण ते कमावताना त्याचा उपभोगही आपण एकत्रित कुटुंबासोबत घ्यायला हवा, हे तो विसरतो. आधी कमवून घेऊ आणि निवृत्तीनंतर एकत्र बसून त्याचा आनंद लुटू, असं प्रत्येकाला वाटतं, पण तसं होत नाही. त्यामुळे जे कमावलं आहे त्याचा आनंदही त्याच वेळी घ्यायला शिका, हे या नाटकात दाखवण्यात आलं आहे. आयुष्यात काही चुका झाल्या तर त्यावरही मार्ग हे नाटक दाखवतं. माणूस आयुष्याच्या धावपळीत आर्थिक गुंतवणूक करतो, पण त्याला भावनिक गुंतवणूक करता येत नाही, हा या नाटकाचा गाभा आहे. त्यामुळे आत्ताच्या युवा पिढीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत साऱ्यांनाच हे नाटक आपलंसं वाटू शकतं, असं ते म्हणतात.लीना भागवत यांनी आतापर्यंत बरीच प्रायोगिक आणि व्यावसायिक दर्जेदार नाटकं केली. पण प्रयोगांचे शतक फार कमी वेळा त्यांच्या वाटय़ाला आले. यापूर्वी ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाचे ३५० प्रयोग झाले आणि आता त्यानंतर या नाटकाचा शंभरावा प्रयोग होत असताना त्या उत्सुक आहेत. या नाटकातील भूमिकेकडे त्या ‘रिप्लेसमेंट’ म्हणून बघत नाही, तर हे एक आव्हान असल्याचं त्यांना वाटतं.

भूमिका करायचे ठरवल्यावर ती मी कशी करेन, याचा विचार करायला हवा. या पद्धतीने विचार केला तर ती भूमिका वेगळी दिसायला लागते, त्याचा अनुभव घ्यायला हवा. मला वाटतं की ही भूमिका पहिल्यापासून आमच्याकडे होती. ती काही कारणांसाठी आम्ही बँकेत ठेवली होती आणि आता ती व्याजासकट आम्हाला मिळत आहे. ही भूमिका दिग्दर्शक आणि रिमाताई यांच्याकडून माझ्याकडे आली, त्यामुळे त्यामध्ये नक्कीच भर पडलेली आहे. रिमाताईंनी माझं नाव सुचवावं हा माझ्यासाठी सन्मान आहे. रिमाताईंनी रेखाटलेल्या चित्राला कुठेही धक्का न लावता, त्यामध्ये मी अजून काही दागिने वाढवू शकते का, हाच विचार मी केला. रिमाताईंनी हे नाटक पाहून कधी पावती देतात, याच्याच मी प्रतीक्षेत आहे, असं लीना भागवत सांगत होत्या. आज शंभरावा प्रयोग साजरं करणारं हे नाटक, यापुढे किती जणांना जगण्याची प्रेरणा देऊन जाईल, हे पाहणं कलाकार आणि रसिकांसाठी उत्सुकतेचं असेल. पण जे स्वप्न पाहिलं होतं ते फिरून आपल्याकडे यावं आणि त्याने शतकी यश साजरं करावं असं भाग्य फारच कमी वेळा वाटय़ाला येतं. हे भाग्य या नाटकाच्या निमित्ताने मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या या नाटकाला आले आहे. या नाटकाची शतकी वाटचाल पूर्ण होऊनही रसिक अजूनही ‘के दिल अभी भरा नही..’ म्हणताहेत हेच विशेष!

Story img Loader