भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत… ही प्रतिज्ञा अगदी बालपणापासूनच आपल्या मनावर कोरली गेली आहे. अनेकांच्या भावना या प्रतिज्ञेशी जोडल्या गेल्या आहेत. या भावनेशी जोडलेली अशीच एक संवेदनशील कथा आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शक पांडुरंग कृष्णा जाधव यांनी ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटातून केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.
ज्या वेळी सीमेवर सैनिक लढत असतात, जेव्हा टीव्हीवर युद्धाची ब्रेकिंग न्यूज येते तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांच्या मनाची घालमेल, आपला माणूस तिथे सुखरूप आहे का, ही सतत सतवणारी चिंता, एकंदरच सैनिकांच्या कुटुंबियांवर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आहे. विषय जरी अतिशय संवेदनशील असला तरी खूप हलक्याफुलक्या पद्धतीने तो चित्रपटात मांडण्यात आला आहे.
ट्रेलरमध्ये आपला मुलगा परत यावा याकरता सोनूचा खास मित्र असलेल्या नाऱ्याचा बळी देण्याचा नवस सोनूची आजी बोलते. आता नाऱ्याचा बळी जाणार का आणि सोनूचे बाबा परत येणार का, हे चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे. येत्या ६ मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘भारत माता की जय’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. राजवीरसिंहराजे गायकवाड आणि देवांशी सावंत यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांची कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात या दोन बालकलाकारांसोबत शशांक शेंडे, मंगेश देसाई, छाया कदम, हेमांगी कवी, नम्रता साळोखे यांच्यासह अन्य कलाकार आहेत.