मराठी चित्रपटांची सुरुवात यंदा रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या चित्रपटाच्या विक्रमी कमाईने झाली होती. हा चित्रपट ३० डिसेंबर २०२२ ला प्रदर्शित झाला होता. त्यानंतरच्या सहा महिन्यांत मराठी चित्रपटांना फार काही उत्तम कामगिरी करता आलेली नाही. आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या ४० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये मोजून दोन-तीन चित्रपटांना घवघवीत यश मिळाले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटाला मिळालेल्या विक्रमी कमाईमुळे मराठी चित्रपटांच्या अपयशाने आलेली मरगळ कमी झाली आहे. दहा दिवसांत वीस कोटींचा टप्पा या चित्रपटाने गाठला आहे.
करोनामुळे रखडलेले अनेक मराठी चित्रपट एका आठवडय़ात दोन – तीन या संख्येने प्रदर्शित होत आहेत. हिंदीबरोबरच दाक्षिणात्य आणि हॉलीवूडपटांचा वाढता आकडा, ‘द केरल स्टोरी’सारख्या चित्रपटांच्या यशामुळे महिनाभर चित्रपटगृहात न मिळालेले स्थान अशा अनेक कारणांमुळे मराठीत यंदा अनेक चांगले मराठी चित्रपट प्रदर्शित होऊनही हवे तसे यश साधता आले नव्हते. याआधी रितेश देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाने तिकीटखिडकीवर ७५ कोटी रुपयांची दणदणीत विक्रमी कमाई करत वर्षांची आनंदी सुरुवात केली होती. १५ कोटींच्या निर्मितीखर्चात बनलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणले. मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये तिसरा चित्रपट म्हणून ‘वेड’ची नोंद झाली आहे. त्यानंतर झी स्टुडिओच्या ‘वाळवी’ या चित्रपटानेही प्रेक्षकांची पसंती मिळवली. ३ कोटी रुपये निर्मितीखर्चात बनवलेल्या या चित्रपटाने सात कोटींहून अधिक कमाई केली. त्यानंतर आता ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने तेरा कोटींच्या आसपास कमाई करत या वर्षांतील पुढच्या सहामाहीची झकास सुरुवात करून दिली आहे.
जानेवारी ते जून दरम्यान मराठीत ४० हून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातल्या तीन चित्रपटांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबरोबरच ‘चौक’, ‘रावरंभा’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ या तीन चित्रपटांनी प्रेक्षकपसंती आणि काही प्रमाणात आर्थिक यशही मिळवले. ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘फुलराणी’, ‘जग्गू अॅण्ड ज्युलिएट’, ‘र्ती’, ‘बलोच’ असे कितीतरी मोठे चित्रपट प्रदर्शित झाले मात्र ते तिकीट खिडकीवर यशस्वी ठरले नाहीत. या सगळय़ा पार्श्वभूमीवर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला मिळालेले घवघवीत यश सुखावणारे आहे. स्त्रीकेंद्री व्यक्तिरेखांवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. दुसऱ्या आठवडय़ातही चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचतो आहे. याआधी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या नायिकाप्रधान चित्रपटानेही विक्रमी कमाई केली होती. करोना आणि टाळेबंदी उठल्यानंतर लगेचच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ने १४ कोटींहून अधिक कमाई केली होती. स्त्रियांच्या गोष्टी, त्यांना रोजच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या, त्यातून बाहेर पडण्यासाठीचा संघर्ष बोलका करणारा ‘झिम्मा’ पाहायला पहिल्यांदा स्त्रिया आपापल्या चमूबरोबर एकत्र बाहेर पडल्या होत्या. हेच चित्र ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या बाबतीतही पाहायला मिळते आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवडय़ातही मुंबई-पुण्याबरोबरच लातूर, जळगाव, नागपूर, औरंगाबाद अशा राज्यातील विविध भागांत या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते जिओ स्टुडिओजचे मराठी आशयप्रमुख निखिल साने यांनी दिली.
प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या दहा दिवसांत २० कोटी कमाई करणारा ‘बाईपण भारी देवा’ हा या वर्षांतला पहिला विक्रमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. स्त्रियांची ताकद काय असते हे या चित्रपटाने दाखवून दिलं आहे. सुरुवातीला स्त्रिया आपापल्या ग्रुपबरोबर चित्रपट पाहायला आल्या होत्या. सगळय़ा नायिकाच असलेल्या या चित्रपटातून प्रत्येकीला आपल्याशी जोडून घेणारं काही गवसतं आहे. आता दुसऱ्या आठवडय़ात सगळय़ा वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचला असून कमाईचे आकडे हे त्या गर्दीचेच प्रतिबिंब आहे. – निखिल साने