मराठी चित्रपटांमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी म्हणता येईल अशी स्वप्निल जोशी-सई ताम्हणकर ही जोडी असलेला आणि दिग्दर्शक संजय जाधव अशा चमूचा चित्रपट म्हटला की प्रेक्षकांना हमखास करमणुकीची अपेक्षा असते. ‘तू ही रे’ हा भरजरी, श्रीमंत दिसणारा चित्रपट मध्यंतरानंतर किंचित प्रमाणात ही अपेक्षा पूर्ण करतो; परंतु मध्यंतरापूर्वीचा चित्रपट कंटाळवाणा झाला आहे. रूढार्थाने प्रेमकथा प्रकारातील चित्रपट असूनही प्रेक्षकांची करमणूक करण्यात हा चित्रपट अपयशी ठरतो.
सिद्धार्थ-नंदिनी हे आजच्या काळातील लग्न झालेले तरुण दाम्पत्य आणि त्यांची पाच-सहा वर्षांची पिऊ ही मुलगी असे सुखवस्तू कुटुंब चित्रपटात आहे. या कुटुंबात सिद्धार्थच्या पूर्वायुष्याविषयी काही गुपित सांगणारे पाकीट नंदिनीला मिळते. त्या पाकिटातील गोष्टींवरून नंदिनी स्वत:च काही ठरविते आणि ते गुपित प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न चित्रपट करतो असे सरळ कथानक आहे. भरपूर गाणी, संगीत आणि श्रीमंतीचे दर्शन घडविणाऱ्या अनेक गोष्टींचा भडिमार, एका उत्पादनाची कथानकबाह्य़ जाहिरात अशा सगळ्या गोष्टी या चित्रपटात आहेत. तेजस्विनी पंडित, स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर यांना अभिनय करण्याची संधी मध्यंतरानंतर चित्रपटकर्त्यांनी थोडीबहुत दिली आहे. मध्यंतरापूर्वीचे कथानक सई ताम्हणकरची व्यक्तिरेखा सांगण्यासाठी खर्ची घातले असून त्यासाठी गाण्यांची जोड दिली आहे. नंदिनी ही ‘गाव की छोरी’ दाखवली आहे. शरीर प्रदर्शनातूनच फक्त ‘बोल्डनेस’ दाखविण्याचा प्रयत्नही चित्रपटात करण्यात आला आहे.चित्रपटाच्या प्रसिद्धीवरून प्रेक्षकांना अपेक्षित असलेला प्रेमत्रिकोण यात नाही, दुहेरी भूमिकाही नाहीत. एका गाजलेल्या हिंदी चित्रपटाच्या कथेचा वापरही यात नाही. मध्यंतरानंतर एक निराळाच ‘ट्विस्ट’ दाखविण्याचा थोडा धाडसी प्रयत्न करून दिग्दर्शकाने काही नैतिक-सामाजिक स्वरूपाचे मुद्दे उपस्थित करण्याचा निश्चित प्रयत्न केला आहे. परंतु मध्यंतरानंतरच चित्रपट वेग घेत असल्यामुळे तोपर्यंत वाट पाहण्याची वेळ प्रेक्षकांवर येते. चित्रपटाच्या शीर्षकानुसार ही प्रेमकथा नक्कीच आहे. आजच्या काळातील तरुण जोडप्याची ही प्रेमकथा असल्यामुळे सुरुवातीला सगळे छान छान नातेसंबंध, सिद्धार्थ-नंदिनी-पिऊ यांचे गोड गोड प्रेमळ नाते, गाण्यांतून भरजरी श्रीमंतीचे दर्शन या सगळ्या गोष्टी असूनही चित्रपट मध्यंतरापूर्वी कंटाळा आणल्याशिवाय राहत नाही.मध्यंतरानंतर तेजस्विनी पंडित, स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर यांनी आपली कामगिरी चांगली बजावली आहे. चित्रपटाच्या कथेचा जीव लहान आहे. त्यामुळे सुरुवातीचा अर्धा वेळ कथानक थोडेसेच पुढे सरकते. लिखाणातील कच्चे दुवे यामुळे पहिला अर्धा भाग रंगविता आलेला नाही, असेच म्हणावे लागेल. जो काही चित्रपट मध्यंतरानंतर आहे त्यातून दिग्दर्शकाने काही मुद्दे उपस्थित केले आहेत इतकेच. मात्र अखंड एकामागून एक  गाण्यांचा भडिमार आणि भडक पाश्र्वसंगीत ऐकत प्रेक्षकाला चित्रपट पाहावा लागतो. ‘दुनियादारी’च्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शकाकडून असलेल्या अपेक्षा हा चित्रपट मात्र पूर्ण करू शकत नाही. बॉलीवूडप्रमाणे बडी कलावंत मंडळी असल्याने पडद्यावरती भरजरी रंग आणि श्रीमंतीचे दर्शन घडविण्यापलीकडे जाऊन आशय मांडण्याची प्रेक्षकांची अपेक्षा फोल ठरली आहे. अनेक ‘फिल्मी’ संवाद आणि अनावश्यक प्रसंगांना कात्री लावून चित्रपटाची लांबी कमी करता आली असती तर कदाचित जीव लहान असलेले कथानक पडद्यावर चांगले रंगू शकले असते असे वाटत राहते.लग्न झालेल्या गृहिणीच्या भूमिकेत सई ताम्हणकरने चांगला अभिनय केला आहे. तेजस्विनी पंडितच्या व्यक्तिरेखेचा एखादी मॉडेल म्हणून अधिक वापर केला आहे. पिऊच्या भूमिकेतील मृणाल जाधवने काही काही प्रसंगांमध्ये रंगत आणली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तू ही रे

निर्माते – मृदुला पडवळ-ओझा, शीतल कुमार-मनेरे, आशीष वाघ, उत्पल आचार्य, दीपक राणे

दिग्दर्शक – संजय जाधव

कथा – मनस्विनी लता रवींद्र

पटकथा – संवाद – अरविंद जगताप

छायालेखक – प्रसाद भेंडे

संगीत – अमितराज, पंकज पडघन, शशांक पोवार

कलावंत – डॉ. गिरीश ओक, स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार, बालकलाकार मृणाल जाधव व अन्य.

तू ही रे

निर्माते – मृदुला पडवळ-ओझा, शीतल कुमार-मनेरे, आशीष वाघ, उत्पल आचार्य, दीपक राणे

दिग्दर्शक – संजय जाधव

कथा – मनस्विनी लता रवींद्र

पटकथा – संवाद – अरविंद जगताप

छायालेखक – प्रसाद भेंडे

संगीत – अमितराज, पंकज पडघन, शशांक पोवार

कलावंत – डॉ. गिरीश ओक, स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार, बालकलाकार मृणाल जाधव व अन्य.