ऑस्करच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि न झालेल्या चित्रपटांच्या पटकथा, या पुरस्काराबाबत छापून आलेल्या बातम्या, जगभरातील वर्तमानपत्रांतील लेख, तब्बल शंभर वर्षांहून अधिक काळातील दर्जेदार चित्रपटांचा संग्रह असा बहुमोल ऐवज असलेल्या ऑस्कर पुरस्कारांच्या संग्रहालयात आता एका मराठी चित्रपटाच्या पटकथेची निवड झाली आहे. या संग्रहालयात एखाद्या पटकथेची निवड होण्यासाठी असलेले निकष पार करत ‘होऊ दे जरासा उशीर’ या देविशा फिल्म्सच्या चित्रपटाने हा बहुमान मिळवला आहे. असा बहुमान मिळवणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, म्हणजेच ऑस्करतर्फे जॉर्जी वॉल्श यांनी रविवारीच आमच्याशी संपर्क साधून आमच्या चित्रपटाची पटकथा ऑस्करच्या संग्रहालयात समाविष्ट करून घेण्यासाठी परवानगीबाबत विचारले. या संग्रहालयात कोणत्याही चित्रपटाची पटकथा समाविष्ट करून घेण्यासाठी काही निकष असतात. या संग्रहालयात केवळ मूळ पटकथांची निवड होते. या पटकथांची निवड काही परीक्षक एकत्र येऊन करतात. आमच्यासाठी हा खूप मोठा सन्मान असल्याचे देविशा फिल्म्सच्या अभिजीत घोलप यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
या पटकथा ऑस्करच्या संकेतस्थळावर किंवा इंटरनेटवर उपलब्ध होत नाहीत. त्या केवळ संशोधनासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी ऑस्करच्या या संग्रहालयाला भेट द्यावी लागते. तसेच तेथेही या पटकथांची छायाप्रत काढता येत नाही. त्यामुळे आमची पटकथा आता किमान १०० वर्षे अबाधित राहील, असा विश्वासही घोलप यांनी व्यक्त केला. ‘होऊ दे जरासा उशीर’ हा चित्रपट ऑस्करच्या मुख्य गटात सवरेत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासाठी लढत देणार आहे. या गटातून स्पर्धेत उतरणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तसेच या चित्रपटाच्या पटकथेची निवड आता संग्रहालयात झाल्याने आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे घोलप म्हणाले.
चौकट
‘होऊ दे जरासा उशीर’ हा चित्रपट परदेशी चित्रपटांच्या वर्गातून ऑस्करसाठी जात नसून ‘मुख्य प्रवाहातील चित्रपट’ या प्रवर्गातून तो ऑस्करच्या शर्यतीत उतरत आहे. ज्या चित्रपटांच्या पटकथा ऑस्कर संग्रहालयात ठेवण्यासाठी निवडल्या जातात त्या चित्रपटांना ऑस्कर मिळण्याची शक्यताही अधिक असते. ऑस्कर संग्रहालयात एखाद्या चित्रपटाची पटकथा ठेवली जाणे हा मोठाच सन्मान समजला जातो.

Story img Loader