मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये केदार शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केदार शिंदे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच केदार शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते जयराज नायर यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयराज नायर यांच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी विविध गोष्टींवर भाष्य केले आहे. यात त्यांनी जयराज नायर यांच्याशी असलेले नाते, करिअरमध्ये झालेली मदत, त्यांचा कलेचा प्रवास याबद्दल या पोस्टमध्ये लिहिले आहे.

केदार शिंदेंची फेसबुक पोस्ट

“जयराज नायर.. हा एक मराठी माणूस आहे. तसा तो केरळचा! पण मी त्याला भेटलो तेव्हा मी ३ वर्षांचा असेन. शाहीर साबळे आणि पार्टी मध्ये हौशी कलाकार म्हणून त्याची एन्ट्री झाली. पुढे प्रत्येक बाबांच्या मुक्तनाट्यात त्याचा सहभाग होता. ठाण्याच्या गरवारे कंपनीची नोकरी सांभाळून तो त्याचा कलेचा प्रवास करत होता. माझं कळतं वय झालं तोवर तो आमच्या घराचा मेंबर झाला होता. मी जयराज मामा म्हणतो त्याला. अजुनही!

पुढे आम्ही महाराष्ट्राची लोकधारा मधे सहभागी झालो तेव्हा तो आम्हाला सांभाळून घ्यायला होता. तो केरळचा असूनही अस्खलित मराठी बोलतो याचं अप्रूप वाटायचं. पण कालांतराने तो मामा म्हणूनच जवळचा झाला आणि आडनाव मिटलच… आम्ही लोकधारा करतानाच एकांकिका करण्याच्या भुताने आम्हाला झपाटलं. आमची धडपड पाहून त्याने सुध्दा आमच्यात सामील व्हायची इच्छा व्यक्त केली. खरतर वयाने तो खुप मोठा तरीही कुठलाही आडपडदा न ठेवता तो आमच्या गॅंग मधे सहभागी झाला. हळूहळू मी व्यावसायिक रंगभूमीवर धडपड करत असतानाच त्याची कंपनी सुटली. गरवारे बंद झाली आणि तो हतबल झाला. त्याची दोन मुलं तेव्हा शाळेत होती. त्यावेळी मी श्रीमंत दामोदर पंत नाटक लिहीत होतो. त्याने भुमिका करण्याची इच्छा व्यक्त केली पण त्यात त्याला साजेसा रोल नव्हताच. श्रुंगारपुरे हे कॅरेक्टर एका सीनसाठी येत होतं. त्याला त्यासाठी कसं विचारायचं? पण त्याने मोठेपणाने ती भुमिका स्वीकारली. आजही घराघरात तो त्याच कॅरेक्टरच्या नावाने प्रसिद्ध आहे.

सही रे सही करताना दत्तू बेवडा हे कॅरेक्टर मी खास जयराज मामासाठी लिहीलं. ते त्याने इमानदारीने सादर केलं. अगदी २२ वर्ष न थकता न कंटाळता तो भरत सोबत उभा आहे. आमच्या डोळ्यासमोर त्याची आणि विजय चव्हाण यांची दोस्ती आहे.

आज जयराज मामा तृप्त आहे. समाधानी आहे. तो आणि मामी यांनी आपल्या मुलांना शिकवलं. वाढवलं. संस्कार दिले. आज दोन्ही मुलं परदेशात सेटल आहेत आणि जयराज मामा रिटायर्ड न होता त्याचा कलेचा प्रवास करत आहे. हा जो फोटो आहे, तो खास आम्ही तिघांनी त्याला विनंती करून काढला आहे. कारण आमच्या या प्रवासात तो नसता तर आम्ही इथवर नक्कीच पोहोचलो नसतो. जयराज मामा वाढदिवस शुभेच्छा…”, असे केदार शिंदेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी या तिघांनी त्यांच्या करिअरची एकत्रितपणे सुरुवात केली. त्यांच्या सिनेसृष्टीच्या करिअरमध्ये अनेक कलाकारांनी साथ दिली. त्यातील एक महत्त्वाचे अभिनेते म्हणजे जयराज नायर. जयराज नायर यांनी सही रे सही मधील दत्तू बेवडा हे पात्र साकारलं होतं. शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा मधून जयराज नायर यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi filmmaker kedar shinde birthday wish veteran actor jayraj nair share instagram post nrp