एकीकडे हिंदूी-इंग्रजी चित्रपटांच्या नावाने ओरड करतानाच एकाच दिवशी चार-पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची ‘थोर’ परंपरा कायम ठेवणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीने ‘कॅची’ वाटावे म्हणून चित्रपटाचे नावच इंग्रजी धाटणीचे असावे, असा अट्टहास केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांच्या नावांवर नजर जरी टाकली, तरी हे चित्रपट मराठी आहेत की इंग्रजी, याचा बोध होत नाही. इतक्या मोठय़ा प्रमाणात इंग्रजी नावांचा सोस मराठीत दिसून येतो आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांची नावे इंग्रजी आहेत आणि येत्या काही दिवसात हाच फंडा सुरू राहणार आहे, असे दिसते.

शुक्रवारी (२३ सप्टेंबर) ‘वन वे तिकीट’, ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’, ‘चापेकर ब्रदर्स’ हे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. येत्या शुक्रवारी (३० सप्टेंबर) ‘अ डॉट कॉम डॉट मॉम’, ऑक्टोबरमध्ये ‘फॅमिली कट्टा’, डिसेंबरमध्ये ‘बसस्टॉप’, जानेवारीत ‘व्हेंटिलेटर’ असे अनेक इंग्रजी नावांचे मराठी चित्रपट रांगेत आहेत. गेल्या काही दिवसांत ‘फोटोकॉपी’, ‘वाय झेड’, ‘हाफ तिकीट’ ‘डिस्को सन्या’, ‘लॉस्ट अँड फाउंड’, ‘फ्रेंड्स’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘वेल डन भाल्या’, ‘चीटर’, ‘युथ’, ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’, ‘टाइमपास’, ‘बी.पी’, ‘पोस्टर बॉइज’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘हॅपी जर्नी’, ‘डबलसीट’, ‘अँड जरा हट के’, ‘टाइम-बरा-वाईट’, ‘मुंबई टाइम’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘शॉर्टकट’, ‘मॅटर’, ‘शटर’, ‘अ पेइंग घोस्ट’, ‘शुगर, सॉल्ट आणि प्रेम’, ‘ऑनलाइन-बिनलाइन’, ‘ढिनच्यँक एंटरप्राइज’, ‘स्लॅमबुक’, ‘हाय वे – एक सेल्फी’, ‘बायकर्स अड्डा’, ‘राजवाडे अँड सन्स’, ‘सिटीझन्स’, ‘सिंड्रेला, ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’, ‘पोलीस लाइन’, ‘सेव्हन रोशन व्हिला’, ‘कोर्ट’ ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘यलो’, ‘हॅलो नंदन’, ‘बायोस्कोप’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘कॅरी ऑन देशपांडे’, ‘फॅन्ड्री, ‘वन रूम किचन’, ‘चेकमेट’, ‘पिकनिक’, ‘मेड इन चायना’, ‘टुरिंग टॉकीज’ अशी कितीतरी नावे देता येतील.