‘बाजीराव मस्तानी’ हा दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळींचा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. श्रीमंत बाजीराव पेशवा आणि मस्तानी यांची प्रेमकथा हा कित्येकांना आकर्षित करणारा विषय आहे. पण त्यांची प्रेमकथा हा बाजीरावाच्या आयुष्यातील एक पर्व धरले तरी खुद्द त्यांचे आयुष्य हे लढाया आणि पराक्रमाने भरलेले होते. बाजीरावाची कथा लोकांपर्यंत पोहोचवायचे तर त्याच्या आयुष्यातील हे अनेक लहानसहान संदर्भ नीट मांडायला हवेत. पेशव्यांच्या इतिहासाचे तपशीलही कुठे चुकायला नकोत, यासाठी पुरेपूर काळजी भन्साळी घेत आहेत. मात्र मुळात ही कथा मराठी माणसाच्या जवळची असल्याने त्यातला मराठमोळेपणा हरवू नये यासाठी भन्साळींची धडपड सुरू आहे.
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी एका मराठमोळ्या पोवाडय़ाची रचना करण्यात आली आहे. छत्रपतींपासून पेशव्यांपर्यंतच्या इतिहासात पोवाडय़ाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे लक्षात घेऊन खुद्द भन्साळींनी पोवाडय़ाचा अभ्यास केला. बाजीरावाचा पराक्रम आणि त्याचे प्रेम या दोन्ही गोष्टी पोवाडय़ाच्या माध्यमातून लोकांपर्यंत थेट पोहोचावी, या विचाराने भन्साळी यांनी हा पोवाडा तयार करून घेतला आहे. या पोवाडय़ासाठी भन्साळींनी लोककलाकार आणि अभ्यासक गणेश चंदनशिवे यांना बोलावून घेतले. त्यांच्याकडून हा पोवाडा त्यांनी लिहून घेतला आणि चंदनशिवे यांच्याचकडून हा पोवाडा गाऊन घेण्यात आला आहे. हा पोवाडा अप्रतिम झाला असून चित्रपटातील गाण्यांमध्ये या पोवाडय़ाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठी साम्राज्याची शान चित्रपटात हुबेहूब उतरावी या ध्यासाने झपाटलेल्या भन्साळींनी ‘बाजीराव मस्तानी’साठी पेशवेकालीन इतिहासाचा अभ्यास करून अनेक गोष्टी प्रत्यक्षात करवून घेतल्या आहेत.