दिलीप ठाकूर
‘जो देतो त्रास, त्याचा मी घेतो क्लास….’ ‘सिम्बा’चा संग्राम भालेराव अर्थात रणवीर सिंग अतिशय ऐटीत मराठीत बोलला आणि सिम्बाच्या सेटवरील रणवीरचा हा व्हिडिओ पाहून मराठी मन केवढे तरी आनंदले. हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर अमहाराष्ट्रीयन कलाकार जरासं जरी मराठी बोलला रे बोलला तरी मराठी स्वाभिमान विलक्षण सुखावतो. परक्या माणसाने ‘माझी भाषा’ बोलून तिला न्याय दिला असे काहीसे त्याला वाटते. पडद्यावर व पडद्याबाहेर असे मोठ्या स्टार्सनी मराठीत बोलल्याची उदाहरणे खूप. काही सांगायलाच हवीत.
‘बाजीराव मस्तानी’चे उदाहरण एकदमच योग्य ठरावे. येथेही रणवीर सिंगच. आणि तेही पेशवेकालीन अस्सल मराठमोळ्या रुपात. वृत्तीत, दिसण्यात, पाहण्यात, ऐकण्यात, जिंकण्यात, प्रेमात मराठमोळा बाजीराव. पेशवेकालीन मराठी ढब पकडण्यात रणबीर यशस्वी ठरला आणि मराठी मन आनंदले. काही छोट्या छोट्या संवादात त्याने मराठीचा वापर करून भूमिका खुलवली. याच चित्रपटात बाजीरावांची पत्नी काशीबाईची व्यक्तिरेखा प्रियांका चोप्राने रंगवली. तिने तर महाराष्ट्रीयन व्यक्तिरेखेत चक्क हॅटट्रिक साध्य केली. ‘कमिने’ आणि ‘अग्निपथ’मध्ये तिने चाळकरी महाराष्ट्रीयन युवती साकारताना आवश्यक तेथे बेधडकपणा व तिखटपणा दाखवला. बाजीरावांची काशीबाई अगदीच वेगळी रुप, सौंदर्यवती आणि शालिन. अगदी नथीपासून महाराष्ट्रीयन अस्सल बाज आणि ‘इश्श’ ती असे काही उच्चारते की छोट्या छोट्या मराठी शब्दाचा अर्थ तिला समजलाय हे जाणवते. ‘ग्लोबल स्टार’ प्रियांकाचे हे मराठीपण ‘व्हेन्टीलेटर’ इत्यादी मराठी चित्रपटाच्या निर्मितीमधून कायमच राहिलेय.
मराठीच्या या अमहाराष्ट्रीयन ठशात थोडेसे मागे वळून पाहिले तर… ‘आनंद’मधील रमेश देव व सीमाताई यांचा वाद आठवतोय? राजेश खन्ना त्या दोघांत एक मिश्किल गैरसमज निर्माण करताच चित्रपटातही महाराष्ट्रीयन असणारे हे दाम्पत्य हिंदीत बोलत असतानाच मराठीत बोलू लागतात आणि राजेश खन्ना त्याना चिडवण्यासाठी मराठीत बोलतो. संपूर्ण चित्रपटभर सहानुभूतीची गडद छाया असणार्या ‘आनंद’मधील एवढासा क्षणही मराठी रसिकांना तृप्त करणारा ठरला. राजेश खन्ना ‘आराधना’ रिलीज होईपर्यंत गिरगावातील ठाकूरव्दार नाक्यावरील सरस्वती भुवनमध्ये राह्यला असल्याने तो मराठी बोलायचा. ‘कहानी किस्मत की’मधील धर्मेंद्र रेखाची छेडछाड करीत ‘रफ्ता रफ्ता देखो….’ गाणे गात मुंबईभर फिरतो आणि अगदी शेवटी गातो, ‘अग ये जवळ ये लाजू नको…’ मराठी रसिक एवढ्यानेही खुश होई.
अनेक स्तरावर हे हिंदीवाल्यांचे मराठी स्वीकारून मराठी रसिकांनी दाद दिलीय. संगीतकार श्रीकांतजी ठाकरे यांनी मोहम्मद रफीकडून ‘शूरा मी वंदिले’ या चित्रपटासह खास ध्वनिफितीसाठी विविध प्रकारची ( गझल, कोळीगीत वगैरे) मराठी गाणी गाऊन घेतल्याचा मराठी श्रोत्यांचा आनंद अवर्णनीय. किशोरकुमारने ‘गंमत जमंत’च्या ‘अश्विनी तू ये ना…’साठी लावलेला आपला यॉडलिंग सूर मराठी मनाला कायमच भावला. रफी, किशोर, महेन्द्र कपूर (दादा कोंडकेंची गाणी) अशा आणखीनही काही अमहाराष्ट्रीयन पार्श्वगायकांच्या मराठी गाण्यात त्यांनी ‘च’ आणि ‘ळ’ असे उच्चारायला असणारे अवघड शब्द बदलून घेत गायले, याचे केवढे कौतुक.
दिलीपकुमारने ‘घाशीराम कोतवाल’, ‘तीन पैशाचा तमाशा’ इत्यादी मराठी नाटकाला प्रमुख पाहुणा म्हणून हजर राहताना उत्तम मराठीत भाषणाला सुरुवात करून मग उर्दूत दिलखुलास भाषण केले. आणि मग अधेमधे मराठीत बोलत टाळ्या वसूल केल्या. मराठी शब्दाचा नेमका अर्थ माहित असल्यागत कोणत्या शब्दावर कसा जोर द्यायचा हे त्याचे आकलन दाद देण्याजोगे. अमिताभ बच्चननेही ‘शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा’च्या प्रकाशन सोहळ्यात उत्तमपणे मराठीत भाषण वाचले. ते आत्मविश्वासाने व्हावे म्हणून त्याने भरपूर रिहर्सल केली. आमिर खानने मराठी भाषा शिकण्यासाठी अतुल कुलकर्णीला सांगून लिमये मास्तरांची शिकवणी लावल्याची मोठीच बातमी झाली. सलमान खानची आई महाराष्ट्रीयन असल्याने तो मराठी छान बोलतो.
याबाबत एक वेगळाच किस्सा सांगायला हवाच. ‘दिल है तुम्हारा’साठी रेखासोबत भूमिका लाभल्याने सचिन खेडेकर विलक्षण सुखावला आणि शूटिंगच्या वेळेस लवकर तयार होऊन सेटवर आला. काही वेळातच रेखा आली व त्याला तिने शुद्ध मराठीत विचारले, “मी या साडीत कशी दिसतेय?” साक्षात रेखा आपल्याला हे मराठीत विचारतेय यावर त्याचा विश्वासच बसेना. सचिननेच एकदा आपला हा अनुभव मला सांगितला. ‘अर्जुन’चा अर्जुन मालवणकर (सनी देओल) याच्यापासून ‘इंग्लिश विंग्लीश’च्या शशी गोडबोले (श्रीदेवी) हिच्यापर्यंत मराठी व्यक्तिरेखा कितीतरी. अलिकडे तर त्यात बरीच वाढ झालीय. ‘सिंघम’ सिक्वेलचा वाटा त्यात खूपच मोठा. कैतरिना कैफ पडद्यावर अथवा प्रत्यक्षात मराठी बोलावी हे मात्र स्वप्न ठरु शकेल. माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, नम्रता शिरोडकर, सोनाली बेन्द्रे हिंदी चित्रपटाच्या सेटवर मराठी सिनेपत्रकाराला मराठीत मुलाखत देतात याचे कौतुक अशासाठी होई की हिंदी चित्रपटसृष्टीतील बेगडी वातावरणात त्या मराठी विसरल्या नाहीत हेच त्यातून सुचवायचे होते. हिंदीतील मराठीच्या या चौफेर व रंगतदार प्रवासावर ओझरता प्रकाशझोत टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न.