अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. नुकताच त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.
प्रशांत दामले नाट्यसृष्टीत जितके सक्रीय असतात तितकेच ते सोशल मीडियावरदेखील असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यावरून त्यांना चाहते अभिनंदन करत आहेत. पोस्टमध्ये ते असं म्हणालेत, “आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमामुळे व आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला.. असच प्रेम असूदे” या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
Photos : कॉमेडीचा बादशहा सिद्धिविनायकाच्या चरणी; कुटुंबियांबरोबर घेतलं दर्शन
संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा कलाक्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो. संगीत, नाट्य आणि नृत्य क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर यांसारख्या दिग्गज कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रशांत दामले यांनी त्यांच्या विनोदीबुद्धीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. नाटकांच्या बरोबरीने त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर ते पाककृतीशी निगडित असलेल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. प्रशांत दामले सध्या वर्ष उसगावकर यांच्याबरोबर ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकात दिसत आहेत. अनेक वर्षांनंतर ही जोडी रंगमंचावर दिसत आहे