या वर्षी मराठी चित्रपटांनी प्रदर्शनात आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यात सातत्य दाखवले आहे. एकीकडे मोठे हिंदी चित्रपट अपयशी ठरले असताना मराठी चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे निर्मात्यांचा हुरूप वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून नवनव्या चित्रपटांच्या घोषणा होत असून नुकतीच एका वेळी सात मराठी चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे.
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांचे आणि नामवंत कलाकारांच्या भूमिका असलेले सात मराठी चित्रपटांची घोषणा एकाच व्यासपीठावर करण्यात आली. ‘निरवधी’, ‘सुटका’, ‘एप्रिल फुल’, ‘फक्त महिलांसाठी’, ‘थ्री चिअर्स’, ‘एकदा येऊन तर बघा’ आणि ‘ती मी नव्हेच’ अशा सात मराठी चित्रपटांची ‘कॅलिडोस्कोप सिनेमा अॅण्ड पिक्चर्स प्रॉडक्शन्स’ आणि ‘एस. आर. एन्टरप्रायझेस’च्या संयुक्त विद्यमाने निर्मिती करण्यात येणार आहे. मनोज अवाना या चित्रपटांचे सहनिर्माते असून सेजल पेंटर आणि मंगेश रामचंद्र जगताप हे ऑनलाइन निर्माते आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक निर्माते स्वतंत्रपणे एकटय़ाने काम करतात. मी स्वत: एका चित्रपटाची निर्मिती केली असल्याने एकटय़ा निर्मात्याला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते याची मला कल्पना आहे. याच कारणामुळे निर्मितीतील ही आव्हाने एकत्रितपणे सोडवण्याच्या दृष्टीने स्टुडिओ स्वरूपात चित्रपटांची निर्मिती करण्याचा विचार केला, असे ‘कॅलिडोस्कोप सिनेमा अॅण्ड पिक्चर्स प्रॉडक्शन्स’चे प्रमुख परितोष पेंटर यांनी सांगितले.
या सात मराठी चित्रपटांमध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘निरवधी’ हा चित्रपट असून त्यात सुबोध भावे, उपेंद्र लिमये आणि गौरी इंगवले यांच्या भूमिका आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुटका’ या चित्रपटात स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहेरे आणि ओंकार राऊत प्रमुख भूमिकेत आहेत. तर ‘एप्रिल फुल’ या प्रियदर्शन जाधवचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, अंकित मोहन, रसिका सुनील आणि रिंकू राजगुरू अशी मोठी फौज आहे. मृणाल कुलकर्णीच्या ‘फक्त महिलांसाठी’ या चित्रपटात सई ताम्हणकर, शिवानी रांगोळे, प्रसाद ओक आणि वंदना गुप्ते हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. खुद्द परितोष पेंटर यांनी ‘थ्री चिअर्स’ हा चित्रपट दिग्दर्शित केला असून यात सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, जयेश ठक्कर, भरत दाभोळकर, तेजस्विनी लोणारी, रेशम टिपणीस, विजय पाटकर आणि जॉनी लिव्हर हे कलाकार आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम प्रसाद खांडेकरचे दिग्दर्शनात पदार्पण असलेला ‘एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणारच नाही’ या चित्रपटातही कलाकारांची मोठी फौज आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव हे कलाकार यात आहेत. तर परितोष पेंटर लिखित ‘ती मी नव्हेच’ या चित्रपटात श्रेयस तळपदे, निनाद कामत आणि उर्मिला मातोंडकर हे हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे कलाकार पहिल्यांदाच मराठी चित्रपटांत एकत्र काम करणार आहेत.