आपले मराठीपण लोप पावत चालले आहे, असे वाटत होते. पण अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मराठी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे मोठे काम हांडे करत असून प्रत्येक मराठी माणसाने आपला ‘मराठी बाणा’ आणि मराठीपण जपावे, असे आवाहन आशा भोसले यांनी रविवारी विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात केले.
चौरंग निर्मित अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचा १६१६ वा प्रयोग दीनानाथमध्ये सादर झाला. या वेळी त्या बोलत होत्या. ‘बोइंग’ कंपनीचे उपाध्यक्ष दिनेश केसकर हेही या वेळी उपस्थित होते.
मी व्यावसायिक दृष्टय़ा हिंदूीत काम करत असले तरीही तेथे मी मराठीपण जपले असल्याचे सांगून आशा भोसले म्हणाल्या, मी जगात कोठेही असले तरी वरण भाताशिवाय माझे जेवण पूर्ण होऊ शकत नाही. मिरचीच्या ठेच्याशिवाय जेवणाला गोडी येत नाही. मराठी माणसांनी मराठी बोलले पाहिजे, वाचले पाहिजे आणि मराठी कलांना उत्तेजन दिले पाहिजे.
दिनेश केसकर म्हणाले, मी सतत जगभरात फिरत असतो. विमान प्रवासात माझ्याजवळ मराठी पुस्तके असतात. त्यामुळे मी हवेत असलो तरी माझे पाय नेहमीच मराठी मातीत असतात. केसकर यांच्या या वक्तव्यावर आशा भोसले यांनी उत्स्फूर्तपणे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’ हे गाणे सुरू केले आणि कार्यक्रमातील सर्व कलाकारांसह उपस्थित प्रेक्षकांनीही त्यांच्या सुरात आपला सूर मिसळला.