प्रतिकूल परिस्थितीशी झगडत वर येणाऱ्या अनेकांच्या कथा मराठी काय किंवा हिंदी काय, प्रत्येक चित्रपटसृष्टीने मांडल्या आहेत. अशा प्रकारचे चित्रपट अगदी इराणसारख्या देशांमध्येही बनले आहेत. पण इराणमध्ये अत्यंत वास्तववादी चित्रण होणारे विषय मराठीत किंवा हिंदीत मांडताना त्यात बराचसा मसाला टाकण्याची खासियत फक्त आपल्याकडेच आहे. या मसालेदार चित्रपटाचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे ‘आयना का बायना’ हा चित्रपट!
यशवंत बालसुधार गृह नावाच्या एका बालसुधार गृहातील नऊ मुलांची ही कथा आहे. हर्षवर्धन साठे (सचिन खेडेकर) हा त्या बालसुधार गृहाचा वॉर्डन अत्यंत कडक शिस्तीचा आणि त्या सुधारगृहाला आपल्या संस्थानासारखं ठेवणारा! गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या या मुलांना केवळ छडीनेच शिस्त लागू शकेल आणि त्यांना त्याच मार्गाने वळणावर आणता येईल, या मताने तो त्याचे सुधारगृह चालवत असतो. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्यातल्या दबलेल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी शिवानी साठे (अमृता खानविलकर) डान्स थेरपीचा वापर करून त्यांना नाच शिकवत असते. या सगळ्या प्रक्रियेत तिला नऊ मुलांमध्ये प्रचंड प्रतिभा असल्याचे लक्षात येते. ती त्यांच्यावर विशेष मेहेनत घेते. यात तिला मदत करतो तिचा मित्र सागर (राकेश वसिष्ट). नाच शिकवताना ती त्यांना मोकळ्या जगाची, प्रसिद्धीची, एका डान्स स्पर्धेची स्वप्न दाखवते. मात्र आपल्या वडिलांच्या कडक शिस्तीपायी आणि त्यांनी बनवलेल्या काही नियमांमुळे या मुलांना स्पर्धेत सहभाग घेणे शक्य नाही, हे तिला कळून चुकते. मात्र मुलांच्या मनात काहीतरी वेगळेच असते.
या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठीच ही नऊ मुले सुधारगृहातून पळ काढतात. त्या मुलांच्या मागावर पोलीस निरीक्षक किशोर कदम (गणेश यादव) आणि त्याचे पथक असते. हा माग काढताना त्या मुलांपैकी काहींच्या आयुष्याच्या कथा समोर येतात. या मुलांना परिस्थितीने कसे गुन्हा करायला भाग पाडले, हे या सर्व कथांमधून समोर येते. ही मुले स्पर्धेला पोहोचतात का, तिथे काय होते, वगैरे प्रश्न आजच्या प्रेक्षकाला पडणे गैर आहे. हा चित्रपट आहे आणि त्यात अखेर मस्त डान्स स्पर्धा होणार आणि ती मुले त्या स्पर्धेत जिंकणार, हे शंभर टक्के नक्की, हे त्यांना सांगायला लागत नाही.
या चित्रपटाची हाताळणी आतापर्यंतच्या कोणत्याही मराठी चित्रपटापेक्षा काहीशी वेगळी आहे. कॅमेराची हाताळणीही अत्यंत बोल्ड म्हणावी अशी केली आहे. चित्रपट समोर येताना जिगसॉ पझलसारखा समोर येतो. त्यानंतर त्यातला प्रत्येक तुकडा प्रेक्षकांना त्यांच्या पद्धतीने जोडावा लागतो. शिवानी ही हर्षवर्धन साठे यांची मुलगी आहे, हे प्रेक्षकांना चित्रपटाच्या शेवटी समजते. त्याचप्रमाणे प्रत्येक मुलाची पाश्र्वभूमीही अशाच तुकडय़ा तुकडय़ात कळते. चित्रपट नृत्यावर असला आणि शिवानी व सागर हे दोघे या मुलांचे नृत्य प्रशिक्षक असले, तरी ते त्यांना नृत्य शिकवत आहेत, अशी दृष्ये खूपच कमी आहेत. त्यामुळे प्रत्येक मुलगा स्वयंभू नर्तक असल्यासारखे वाटते. तसेच बालसुधारगृहातील या मुलांच्या आयुष्यावरही थोडा प्रकाश पडायला हवा होता.
चित्रपटात प्रकाशयोजनेला खूप दाद द्यायला हवी. यशवंत बालसुधारगृहातील जुनाट वातावरण दाखवण्यासाठी केलेली प्रकाशयोजना, स्पर्धेच्या ठिकाणची प्रकाशयोजना आणि काही मुलांचे पूर्वायुष्य दाखवताना केलेली प्रकाशयोजना अत्यंत परिणामकारक वाटते. त्याचप्रमाणे डान्स स्पर्धा हा या चित्रपटाचा गाभा असल्यामुळे संगीतही खूप चांगले आहे. क्वचित ठिकाणी ते लाऊड वाटण्याची शक्यता आहे, मात्र ते चित्रपटाच्या एकंदरीत प्रकृतीला साजेसे आहे.
चित्रपटात काही जागा अत्यंत चांगल्या आहेत. शिवानी या मुलांना नृत्य शिकवत असते त्या वेळी एक मुलगा अचानक तिच्यासह अत्यंत लयबद्ध आणि अत्यंत पॅशनेट नृत्य सादर करतो. त्या वेळी नृत्य त्या मुलासाठी व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे, हा दिग्दर्शकाचा विचार प्रेक्षकांपर्यंत चटकन पोहोचतो. हे नृत्यही अमृता आणि त्या मुलाने उत्तमरित्या सादर केले आहे. त्याशिवाय या मुलांपैकी एकाला धावत्या रेल्वेच्या डब्यावर दगड फेकल्याबद्दल अटक झाली असते. ही मुले पळतात त्या वेळी तो मुलगा रेल्वेलाइनजवळ पोहोचतो आणि त्याला त्याच्या पूर्वायुष्यातील तोच प्रसंग आठवतो. त्याच वेळी त्याला एक लहान मुलगा हातात दगड घेऊन उभा असलेला दिसतो. तो धावत त्या मुलाजवळ जाऊन त्याला थांबवतो. अशी काही अत्यंत मनाला स्पर्श करून जाणारी दृष्ये खिळवून ठेवतात.
या सर्व चित्रपटात सर्वात महत्त्वाची आणि देखणी गोष्ट म्हणजे चित्रपटातील सर्वच मुलांनी केलेला डान्स. हिप हॉप, बी बॉइंग अशा विविध डान्स स्टाइलचा समावेश असलेले हे डान्स तरुणांमध्ये नक्कीच लोकप्रिय होतील. विशेष म्हणजे चित्रपटाचे नायक असलेली नऊच्या नऊ मुले स्वत डान्सर असल्याने त्यांच्या नृत्यात प्रचंड सहजता आहे. ही नृत्ये आणि संगीत प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडते.
चित्रपटात सचिन खेडेकर असूनही त्याचा प्रभाव कुठेच दिसत नाही. त्या दृष्टीने ही कथा फक्त आणि फक्त त्या मुलांभोवती फिरते. आपण खूपच दुष्टपणे वागतो, अशी उपरती हर्षवर्धन साठे याला होते आणि अचानक तो नाचायला लागतो. या नाचातून दिग्दर्शकाला त्या पात्राचे मोकळेपण दाखवायचे आहे का, असा प्रश्न चाटून जातो. पण तसे वाटत नाही. तसेच अचानक झालेले त्याचे मतपरिवर्तनही खटकते. एक शिस्तप्रिय कठोर वॉर्डन म्हणून तो चांगला दिसलाय. त्याचप्रमाणे अमृता खानविलकर हिनेही फार विशेष अभिनय वगैरे केला नसला, तरी ती खूप छान वाटते. राकेश वसिष्टलाही फार विशेष काम नाही. गणेश यादव यांनी पोलीस निरीक्षकाची भूमिका चोख बजावली आहे. त्या नऊ मुलांसह इतर मुलांचीही कामे ठिकठाकच झाली आहेत.
हा चित्रपट मुळात डान्सवर आधारित आहे आणि डान्स हाच या चित्रपटाचा गाभा आहे, ही गोष्ट लक्षात घेतल्यावर मग चित्रपट पाहणे सुसह्य होते. चित्रपट प्रेक्षणीय आहे, यात वादच नाही. त्यामुळे तो प्रेक्षकांना ‘घेतल्याशिवाय जायना’ हे नक्की!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा