बॉलिवूडसाठी आयटम साँग हे काही नवीन राहिलेलं नाही. आतापर्यंत अनेक चित्रपटामंध्ये आपण अभिनेत्रींना आयटम साँग करताना पाहिलं आहे. मात्र मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळूहळू ही संकल्पना रुजू लागली आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या आम्ही बेफिकर या चित्रपटामध्येही अशा एका आयटम साँगचा समावेश करण्यात आला असून हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
बॉलिवूडमधील शीला, मुन्नी आणि जलेबीबाई या आयटम साँगची निर्मिती झाली असून ‘आम्ही बेफिकर’ या मराठी चित्रपटात ‘रसगुल्लाबाई’ या आयटम साँगची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आता शीला, मुन्नीनंतर आता रसगुल्लाबाई तिच्या नृत्याचा जलवा दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या लोकप्रिय ठरत असलेल्या या गाण्यामध्ये प्रियांका झेमसेनं झळकली आहे. प्रियांका झेमसेनं आतापर्यंत अनेक चॅनेल्सवर व्हीजे म्हणून काम केलं आहे. तसंच वेब सीरिजही केल्या आहेत.
‘”नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत या गाण्याचं आम्ही चित्रिकरण केलं आहे. त्यामुळे हे गाणं कायम माझ्या लक्षात राहण्यासारखं आहे. चित्रिकरणावेळी जवळपास दहा सेल्सियसपेक्षाही कमी तापमान होतं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिकतेचा कस लागत होता. मात्र, संपूर्ण टीमनं सहकार्य केल्यामुळे धमाल पद्धतीनं हे गाणं शूट झालं. धमाकेदार शब्द असलेलं हे गाणं प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल,”असं प्रियांका म्हणाली.
या चित्रपटातील गाण्यांना प्रणय अढांगळे यांनी संगीत दिलं असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, किर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या सुमधूर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.
दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती हरिहर फिल्म्सने केली असून कविश्वर मराठे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटांतून आपल्यापुढे आले आहेत. मात्र, ‘आम्ही बेफिकर’ हा त्यांचा एकत्रित पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्यासह राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्तरंजन ढल यांनी कॅमेरामन म्हणून तर श्राधेय केदार, पंकज सळमुठे यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.