कलाकार हा कलाकार असतो मग त्याचं व्यक्त होण्याचं माध्यम कोणतंही असो. आजवर छोट्या पडद्यावर किंवा मोठ्या पडद्यावर झळकलेले असंख्य कलाकार आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे पूर्वा गोखले. छोट्या पडद्यावर वावर असलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीने निरागस हास्य आणि अभिनयामुळे अनेकांची मन जिंकून घेतली. केवळ मराठीच नाही तर हिंदी प्रेक्षकांवरही तिने अभिनयाने भुरळ घातली. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता पूर्वा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

‘भयभीत’ या आगामी चित्रपटातून पूर्वा रुपेरी पडद्यावर झळकणार असून या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावेदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.

‘कुलवधू’ या मालिकेमध्ये पूर्वा आणि सुबोधने एकत्र काम केलं होतं.त्यावेळी ही मालिका प्रचंड गाजली होती. मात्र या मालिकेनंतर ही जोडी एकत्र झळकली नाही. त्यामुळे त्यांनी एकत्र काम करावं अशी चाहत्यांची इच्छा होती. ‘भयभीत’ या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. बऱ्याच वर्षानंतर ही जोडी एकत्र झळकणार आहे.

रहस्यमय घटना आणि मानवी नातेसंबंध याद्वारे कथानकात निर्माण करण्यात आलेली या चित्रपटातील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. ‘भयभीत’ या चित्रपटाचे कथानक भावल्यामुळेच इतकी वर्षे मालिकांमध्ये रमल्यानंतर चित्रपटाकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचं पूर्वाने सांगितलं. दिपक नायडू दिग्दर्शित हा चित्रपट२८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, पूर्वाने ‘कुलवधू’ ,’कहानी घर घर की’, ‘कोई दिल में है’ या मालिकांद्वारे रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या तिची ‘तुझसे है राबता’ ही हिंदी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे.

Story img Loader