समाजातील सद्य:स्थितीचे वास्तव दर्शविणारा चित्रपट
दररोज या ना त्या प्रकरणातील भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा लोकांच्या समोर येत असतो. प्रसार माध्यमातून त्याबाबतच्या बातम्या आल्यानंतर काही दिवस त्यावर चर्चा होते आणि नंतर प्रसार माध्यमे आणि लोकही तो विषय विसरून जातात कारण एखाद्या नवीन घोटाळ्याने त्याची जागा घेतलेली असते. समाजातील याच सद्य:स्थितीचे वास्तव ‘दुनिया गेली तेल लावत’ या आगामी चित्रपटात मांडण्यात आला आहे.
हेमनिल प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण कारळे यांनी केले असून त्याचे लेखन अनिल कालेलकर यांचे आहे. येत्या २७ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सद्य:स्थितीत समाजातील एकूण परिस्थिती पाहता प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ माणसाला जगणे आणि वावरणे कठीण झाले आहे. खोटेपणा, भ्रष्टाचार हा जणू शिष्टाचार झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत खरेपणाने वागणाऱ्या व्यक्तीवर काय प्रसंग ओढवतात, त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो ते या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटातील चार गाणी श्रीरंग आरस यांनी संगीतबद्ध केली असून ती वैशाली सामंत व ऊर्मिला धनगर यांनी गायली आहेत. चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मानसी देशमुख, डॉ. गिरीश ओक, सविता प्रभुणे, उदय सबनीस, जयवंत वाडकर आणि अन्य कलाकार आहेत. मुंबईत या चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते झाले. चित्रपटाची झलक (ट्रेलर) या वेळी सादर करण्यात आली. महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भोसले यांचा चित्रपटाचे निर्माते अनिल देव आणि दिग्दर्शक प्रवीण कारळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चित्रपटाशी संबंधित कलाकार व तंत्रज्ञ या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा