यशस्वी सिनेमाची पार्टी म्हणजे भरपूर गर्दी, भरपूर भेटीगाठी बरेच निरीक्षण आणि तसाच भरपूर उशिरदेखिल. ‘दुनियादारी’च्या पन्नासाव्या दिवसाच्या यशानिमित्ताची पार्टी अक्षरश: जंगी झाली, त्यातले काय काय सांगू नि किती सांगू असे झाले आहे बघा. दिग्दर्शक संजय जाधव सांगत होता, ‘दुनियादारी’च्या यशाची चव चाखत असलो तरी पुढच्या चित्रपटाबाबतही मी विचार करतो आहे दोन-तीन विषय आहेतदेखिल. पण आता याक्षणी काही सांगता येत नाही.
यावेळच्या छोट्याश्या सोहळ्यात विविध चांगल्या कारणास्तव महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी, सचिन आणि केदार शिंदे यांचा प्रतिनिधिक भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला, पण त्यात जब्बार पटेल यांचा विसर पडला नसता तर बर झाले असते.
मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे पूर्वीच्याच हौसेने आले आणि त्याना अनेकांकडून पूर्वीसारखाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसले. अजिंक्य देवने भेटताक्षणीच सांगितले, अरे, सध्या चार मराठी चित्रपटातून मी भूमिका करतो आहेच. पण आणखी दोन नवीन मराठी चित्रपट स्वीकारले आहेत. दोन्हीचे निर्माता-दिग्दर्शक विशेष आहेत. त्याबाबत आताच काही सांगणे योग्य नाही.
झी मराठीची पार्टी म्हणजे त्यात केवढे तरी तारांगण अवतरायला हवेच. त्यात सर्वाधिक लक्षवेधी कोण बरे ठरले? ब-यापैकी लवकर आलेली सई ताम्हणकर की जास्त उशीर नको असा विचार करून निघालेली उर्मिला कानेटकर, साध्या वस्त्रातही ग्लॅमरस वाटलेली मानसी नाईक की तिच्यासोबतची रेशम? पार्टी ऐन रंगात असताना अलेली पल्लवी सुभाष की त्याच पार्टीत धमाल मूडमध्ये थिरकलेली मीता सावरकर? या मोहक वातावरणात कांचन अधिकारी, मृण्मयी देशपांडे, मृणाल कुलकर्णी याना दुर्लक्षून कसे चालेल? आपण सर्वानाच थोडं थोडं भेटलेले अधिकच चांगले ना? या प्रत्येकीला देखिल अनेकाना थोडं थोडं भेटायचे असतेच.
सचिन पिळगावकर आणि महेश मांजरेकर आल्यावर छोटासा सोहळा सुरू होईल अशी कुजबूज झाली तेव्हा उशीराचे कारण समजले. त्यानी अकरा वाजता येणे, म्हणजे ‘बदलत्या मुंबईत’ फारसे उशीरा नाही हो आणि यशस्वी चित्रपटाची पार्टी म्हणले की सगळं लवकर आटपा असे म्हणणे अव्यवसायिक ठरते हो.
रात्रौ बाराच्या आसपास पार्टी मस्त रंगात आली, मग डान्स फ्लोअरवर ‘देह’भान विसरून नाचकाम, ‘बार-बार’ गर्दी, उंची मद्य असे सगळे उंचावर जाता जाता अडिच-तीन वाजले तर त्यात बिघडले काय. गल्ला पेटीवर तब्बल बावीस कोटीचा छनछनाट करणा-या चित्रपटाची ओली पार्टी शानदार-जोरदार व्हायलाच हवी. तेच तर झाले, नाचो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा