‘बीपी’, ‘दुनियादारी’ आणि ‘टाइमपास’ या चित्रपटांच्या विक्रमी कमाईने मराठी चित्रपटांना यशाचे नवे परिमाण मिळवून दिले. तरी आत्तार्पयंत वर्षांला एखाद-दुसरा चित्रपट कोटय़वधीचा आकडा पार करत होता. मात्र, आशयदृष्टय़ा संपन्न होत असलेल्या मराठी चित्रपटांनी व्यावसायिक यशातही कोटींचा उंबरठा ओलांडण्यात आघाडी घेतल्याचे आणि ती टिकवल्याचे चित्र ‘लय भारी’ आणि त्यापाठोपाठ प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांमुळे निर्माण झाले आहे.
रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला निशिकांत कामत दिग्दर्शित ‘लय भारी’ हा चित्रपट तद्दन व्यावसायिक असूनही त्याने ३३ कोटी रुपयांची कमाई करीत आधीचे सगळे विक्रम मोडीत काढले. त्यापाठोपाठ प्रदर्शित झालेल्या श्रेयस तळपदे निर्मित ‘पोश्टर बॉईज’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून तीन दिवसांत एक कोटी रुपयांचा आकडा पार केला होता. आतापर्यंत या चित्रपटाने साडेपाच कोटी रुपये एवढी कमाई केली आहे. तर रोहित शेट्टी-अजय देवगण जोडीच्या ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटाबरोबर प्रदर्शित होण्याचे धाडस दाखविण्याऱ्या ‘रेगे’ चित्रपटानेही अवघ्या चार दिवसांत एक कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या तीनही चित्रपटांचे वैशिष्टय़ म्हणजे महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांना पहिल्या दिवसापासूनच ९० ते ९५ टक्के प्रेक्षक होता. त्यामुळे, पहिल्या दिवसापासूनच या तीनही चित्रपटांनी जवळपास २५ ते ३० लाखांपर्यंत मजल मारली होती.
हिंदीत शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ते रविवापर्यंतचे तीन दिवस चित्रपटांनी तिकीटबारीवर किती कमाई केली आहे यावरून त्याचे यश निश्चित केले जाते. त्याच पध्दतीने ‘लय भारी’, ‘पोश्टर बॉईज’ आणि ‘रेगे’ या तीन चित्रपटांनी केलेला व्यवसाय पाहता त्यांना भरघोस अॅडव्हान्स बुकिंग मिळाले होते. ‘पोश्टर बॉईज’ अजूनही चित्रपटगृहात सुरू आहे. तर ‘सिंघम रिटर्न्स’ एकीकडे १०० कोटींच्या आसपास पोहोचत असतानाच ‘रेगे’ चित्रपटालाही अजून मोठी प्रेक्षकसंख्या मिळते आहे. त्यामुळे या आठवडय़ाभरात ‘रेगे’ची कमाईही लक्षणीय असेल, असा ट्रेड विश्लेषकांचा अंदाज आहे.
यातला प्रत्येक चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचा असूनही त्यांना तिकीटबारीवर कोटींची कमाई करण्यात यश आले आहे या चित्रपटांची वेगळ्या पद्धतीने केलेली प्रसिद्धी आणि वितरणाला याचे श्रेय जात असल्याचे मत ‘रेगे’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता रवि जाधव यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते तरूण प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना आपलेसे केल्याने चित्रपटांना मोठी प्रेक्षकसंख्या मिळते. मात्र, त्यासाठी तुमच्या चित्रपटाचा आशय चांगला असला तरी प्रेक्षकांपर्यंत तो विविध मार्गाने पोहोचवण्यासाठी त्याची प्रसिद्धीही तितकीच वैशिष्टय़पूर्ण असली पाहिजे. ‘फँ ड्री’ हा चांगला सामाजिक चित्रपट होता. पण, लोकांपर्यंत तो पोहोचवण्यासाठी अजय-अतुलने तयार केलेल्या खास प्रमोशनल गीताचा वापर केला गेला. ‘रेगे’साठीही प्रमोशनल गीताबरोबरच सोशल मीडियाचा आधार घेतला गेला. अशा प्रकारची प्रसिद्धी मराठी चित्रपटांना आज आवश्यक असल्याचे मत रवि जाधव यांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा