सिनेमा, सौजन्य –
‘पिस्तुल्या’ या लघुपटासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’, या पहिल्याच मराठी चित्रपटाची ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिटय़ूट’ च्या ५७ व्या लंडन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरू झाली आहे. उपेक्षित समाजातल्या कुमार वयातील एका मुलाची एक तरल प्रेमकथा या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे, त्याविषयी…
‘जाता जात नाही ती जात’ असा एक विचार पूर्वीपासून आपल्याकडे प्रसिद्ध आहे. जातीवर आधारित आपण तयार केलेल्या समाजरचनेमध्ये एखाद्या माणसाची किंमत, प्रतिष्ठा आणि त्याचे मूल्य तो कुठल्या जातीचा आहे यावरून ठरविली जाते. देशाला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे उलटून गेली तरीही दुर्दैवाने आजही जातीपातीची समस्या ही आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग बनून राहिलेली आहे. जगणेच नाकारल्या गेलेल्या उपेक्षित भारतीय समाजातील लोकांच्या स्वप्नांची जी राखरांगोळी झाली, त्याची जबाबदारी ना कधी समाजाने स्वीकारली ना कधी सरकारने. स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्र राज्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अनेक घटना सातत्याने आजूबाजूला घडत असतानाच, अशाच एका उपेक्षित समाजातील कुमार वयातील मुलाची एक तरल आणि संघर्षपूर्ण प्रेमकथा लवकरच ‘फँड्री’ या चित्रपटाद्वारे पाहायला मिळणार आहे.
नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे नागराज मंजुळे यांनी. ‘पिस्तुल्या’ या लघुपटासाठी ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा चित्रपट-दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. कुमार वयातील मुलांची आपली स्वत:ची काही स्वप्ने असतात आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काहीही करायची त्यांची इच्छा असते. परंतु जेव्हा अशा स्वप्नाच्या आड आपल्या समाजातील जातीव्यवस्था येते तेव्हा उत्तुंग भरारी घेणारे मन क्षणार्धात जमिनीवर येते, जातीचा न्यूनगंड सदैव आपल्या उरात बाळगणाऱ्या त्या कोवळ्या वयातील जिवाची घालमेल सुरू होते. आजूबाजूचे जग नेमके कसे आहे याची अजून पुरेशी जाणीवही विकसित न झालेल्या या मुलाचे हळवे भावविश्व एका प्रेमकथेच्या माध्यमातून मांडण्याचा कलात्मक प्रयत्न या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी केला आहे. त्यामुळे एका अर्थाने हा चित्रपट म्हणजे, त्या मुलाचे स्वप्न आणि त्याच्या मनात असलेले अनेक न्यूनगंड यांच्यातील संघर्षांची कहाणी आहे.
या चित्रपटाचे ‘फँड्री’ हे टायटल या चित्रपटाबद्दल आणि त्यातील आशयाबद्दल उत्सुकता निर्माण करते. ‘फँड्री’ या शब्दाचा अर्थ जरी सोपा असला तरीही सामान्य प्रेक्षकांनी आधी हा चित्रपट पाहावा आणि चित्रपट पाहिल्यानंतर मग त्याचा अर्थ आपापल्या परीने लावावा. कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील संदर्भ बघून याचे स्वत:पुरते अनेक अर्थ प्रेक्षकांना काढता येतील असे नागराज मंजुळे यांना वाटते. अशा संवेदनशील कथेचा चित्रपट बनवताना दिग्दर्शकाचे संवेदनशील मन सतत जागृत असणे फार गरजेचे असते. चित्रपटातील आशयाशी प्रामाणिक राहून स्वत:चा अनुभव प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न एक चांगला दिग्दर्शक करत असतो. या चित्रपटाच्या कथेशी स्वत:ला तू कसे काय जोडू शकलास या बाबतीत विचारले असता नागराज म्हणतो, ‘‘आपल्या प्रत्येक कथेमध्ये चित्रपट दिग्दर्शक स्वत:ला शोधत असतो, म्हणजे त्याची अभिव्यक्ती ही कुठे ना कुठे तरी त्याची स्वत:चीच एक कथा असते. लहानपणीपासूनची त्याची जडणघडण, त्याचे भावविश्व, त्याला आलेले जगण्याचे वेगवेगळे अनुभव, त्याच्या संपर्कात आलेले लोक आणि त्यांचे नातेसंबंध हे सर्व कुठे ना कुठेतरी त्याच्या कथेत नकळतपणे येत असतात. दिग्दर्शक फक्त त्या कथेला एका कलात्मक दृष्टीने आणि त्या कलेच्या प्रचलित नियमाच्या चौकटीत मांडण्याच्या प्रयत्न करतो एवढेच. ‘फँड्री’ही त्या अर्थाने प्रातिनिधिक स्वरूपाची कथा असली तरीही ती कुठल्याही समाजातील नाकारलेल्या प्रत्येक दुर्लक्षित व्यक्तीची कथा आहे. या कथेत मी कधी स्वत:ला, कधी माझ्या घरच्यांना तर कधी माझ्या अवतीभवतीच्या लोकांना शोधत असतो. या चित्रपटाद्वारे मी कथेशी प्रामाणिक राहून मनापासून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनतही घेतली आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा