कुठल्याही गोष्टीचा अतिरेक घातकच असतो. अशा अतिरेकी वागण्याने अनेकजणांचे संसार उदध्वस्त झालेले पाहायला मिळते. हाच धागा पकडून दिग्दर्शक आनंद बच्छाव सत्यघटनेवर आधारित ‘घुंगराच्या नादात’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. लावणी नृत्याला फार मोठी परंपरा लाभली आहे. घुंगराच्या तालावर बेफाम होऊन अनेकजण लावणीचा आस्वाद घेतात. पण या घुंगराच्या नादाचा अतिरेक झाल्यास सर्वस्व गमवायला फार वेळ लागत नाही. हे या चित्रपटात दाखविण्याचा आनंद बच्छाव यांनी प्रयत्न केला आहे.

घरातला कर्ता पुरुष व्यसनाधीनता आणि व्यभिचार यांच्या आहारी गेल्यानंतर त्याच्या संसाराची होणारी परवड या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. मनोरंजनाबरोबर सामाजिक प्रबोधन करणारा असा हा चित्रपट आहे. या चित्रपटात संजय खापरे प्रथमच एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत असून, चित्रपटात त्याने रावसाहेबांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर, नयना या लावणी नृत्यांगनेच्या भूमिकेत दिपाली सय्यदने रंग भरले आहेत. निशा परूळेकरने रावसाहेबांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. याशिवाय अनंत जोग, प्रेमा किरण, सुनील गोडबोले, अनिकेत केळकर, भोजपुरी अभिनेत्री सिमा सिंह यांच्यासुद्धा या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन आनंद बच्छाव यांचे, तर पटकथा-संवाद आणि गीते बाबासाहेब सौदागर आणि संगीत नंदू होनप यांचे आहे. ‘संचेती ग्रुप’ प्रस्तुत आणि ‘आर. एस. प्रॉडक्शन’ निर्मित घुंगराच्या नादात हा चित्रपट २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Story img Loader