रेश्मा राईकवार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचं वेगळेपण काय असावं? सुख-दु:खाच्या घटनांचे तपशील वेगळे असतील, त्या त्या वेळी आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींचा प्रतिसाद, त्यांच्या भावभावना वेगळ्या असतील. दुर्दैवी प्रसंग रडवेल, आनंदाच्या प्रसंगात मन भरून येईल, अन्यायाचा प्रसंग आपल्याही मनात चीड निर्माण करेल, बरं झालं जिरवली… असाही एखादा अनुभव असेल. या अनुभवांना, आपल्या गोष्टींना काय नाव द्यायचं? नसतंच नाव काही… असते ती फक्त अनुभूती. अशाच एका सर्वसामान्यपणे अनुभवाला येणाऱ्या गोष्टीची नितांतसुंदर दृश्यानुभूती म्हणजे संदीप सावंत दिग्दर्शित ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा चित्रपट.
संदीप सावंत यांचं नाव घेतलं की ‘श्वास’ चित्रपटाची आठवण हा चित्रपट पाहताना हटकून येते त्याचं एकमेव कारण म्हणजे दोन्हींत कथानायक ज्या परिस्थितीत अडकले आहेत ती थोडीफार मिळतीजुळती आहे. मात्र ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा चित्रपट त्याची दृश्यात्मक मांडणी, पार्श्वसंगीत, अभिनय अशा सगळ्याच स्तरांवर वेगळा आहे आणि प्रयोगशीलतेच्या बाबतीत दोन पावलं पुढं आहे असं म्हणता येईल. गावाकडून उच्च शिक्षणासाठी शहरात आलेल्या मुकेश या तरुणाची ही गोष्ट आहे. अभ्यासात अत्यंत हुशार, आर्थिक परिस्थिती बेताची… मुकेश शहरात आल्यानंतर थोडासा अवघडलेला आहे. वसतीगृहातील खोलीवर त्याची ओळख रोहनशी होते. रोहन आणि मुकेश दोघांचाही अभ्यासविषय वेगळा आहे, दोघांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीतही तफावत आहे. पण वसतिगृहाच्या त्या खोलीत आणि खोलीबाहेरच्या अवकाशात या कुठल्याच गोष्टी आड न येता त्यांच्यात मैत्र जुळतं. आजवर न पाहिलेलं एक वेगळंच जगणं अनुभवणारा मुकेश हळूहळू खुलायला लागतो. मित्रपरिवार वाढतो, अचानक अंगावर आलेल्या इंग्रजी शिक्षणाच्या वादळातूनही नेटाने अभ्यास करत तो गुणवत्ता यादीतलं स्थान टिकवून ठेवतो. या सगळ्या सुखद आठवणी घेऊन सुट्टीत गावी आल्यानंतर मात्र मुकेशची गोष्ट बदलते. त्याच्या गोष्टीत पुढे काय घडतं? हे पडद्यावरच पाहायला हवं. कथेपेक्षाही त्याची मांडणी आणि कलाकार दोन्हींतला ताजेपणा आणि दिग्दर्शकाचा या माध्यमाचा सखोल अनुभव यांचा प्रभाव या चित्रपटात दिसतो. चित्रपटातील मुकेशची मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जयदीप कोडोलीकर याच्यासह पडद्यावर दिसणारा प्रत्येक कलाकार नवीन आहे. पण या कलाकारांकडून सहजपणे काम करून घेण्याचं दिग्दर्शकाचं कौशल्य इथे जाणवतं. त्यामुळे कोणताही कलाकार नवखा वाटत नाही, किंबहुना त्या गोष्टीतली ती खरीखुरी पात्रं वाटतात. कोणत्याही चित्रपटात कथा पुढे नेण्याचा आपला एक वेग असतो. इथे दिग्दर्शकाला मुळातच गोष्ट पुढे नेण्याची घाई नाही. त्या त्या व्यक्तिरेखेबरोबर तो क्षण अनुभवत पाहणाराही पुढे जातो, क्वचित रेंगाळतो, कधी घाबरतो… वारेमाप संवाद नाहीत, महाविद्यालयाची पार्श्वभूमी कथेला असल्याने विद्यार्थ्यांचा घोळका समोर असला तरी त्यांचा गलका जाणवत नाही. एकाचवेळी वास्तववादी शैलीच्या जवळ जाणारं चित्रण यात आहे आणि तारुण्याच्या एका अनोळखी टप्प्यावरचं चित्रण असल्याने त्यातली तरलताही दिग्दर्शकाने जपली आहे.
ओघवत्या पद्धतीने गोष्ट पुढे सरकत असतानाही मुकेशचं बदलत चाललेलं भावविश्व दाखवताना अनेक ठिकाणी प्रतिकात्मक मांडणीही दिग्दर्शकाने खुबीने केली आहे. एरवी मित्रांमध्ये राहूनही सतत एकटाच असल्याचा भाव घेऊन वावरणाऱ्या मुकेशचं नाव जेव्हा त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या, त्याला कल्पनाही नसलेल्या मुलीशी जोडलं जातं तेव्हा तो किंचित वैतागतो. मात्र पहिल्यांदा तिला पाहिल्यानंतर मनोमन सुखावलेल्या मुकेशची बोटं टेबलावरही हार्मोनियम वाजवू लागतात. असे खूप छोटे छोटे प्रसंग पाहताना मजा येते. मुकेशचे मित्र, त्याचं कुटुंब हे आपल्या अवतीभवती असणाऱ्या लोकांसारखंच आहे. अवघड प्रसंगात खंबीरपणे उभा राहिलेला भाऊ, आतून अस्वस्थ असलेली पण मुलांवरच्या विश्वासाने पुढे जाणारी आई. विशेषत: मुकेशच्या बहिणीची व्यक्तिरेखा खूप सुंदर आहे, त्याची गोष्ट सांगण्याच्या ओघात तिच्या गोष्टीवर मात्र अन्याय झाल्यासारखा वाटतो. पण तिची भूमिका करणाऱ्या प्रतिक्षा खासनीसने तिच्या मुळातच लाघवी चेहऱ्याने मोजकेच प्रसंग गहिरे केले आहेत. कथेत नाट्य आहे, पण ओढूनताणून आणलेली नाट्यमयता नाही आणि म्हणूनच एक नितळ अनुभूती चित्रपट पाहताना येते. सतत वेगवान काहीतरी पाहण्याची सवय झालेल्या आपल्या मनाला आणि नजरेलाही आपलीच गोष्ट पडद्यावर एका सुंदर लयीत एकतानतेने पुढे जाताना अनुभवत राहावी अशी नितांतसुंदर अनुभूती नाव नसलेली ही गोष्ट देते.
ह्या गोष्टीला नावच नाही
दिग्दर्शक – संदीप सावंत
कलाकार – जयदीप कोडोलीकर, प्रथमेश अत्रे, प्रतीक्षा खासनीस, अवधूत पोतदार, अनुराधा धामणे.