रेश्मा राईकवार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
खारी बिस्कीट
छोटय़ांच्या जगातले प्रेम, राग, लोभ सगळेच निरागस असते. त्यांची भांडणेही जितकी मोठी तितके च त्यांचे एकमेकाला जीव लावणेही लोभसवाणे असते. अशी घट्ट नाती मोठय़ांच्या जगात पाहायला मिळणे कठीण. लहानपणीच्या कल्पना- इच्छा- आकांक्षा खूप मोठय़ा आकाशाएवढय़ा असतात, मात्र त्याला जसजशी अनुभवाने येणारी वास्तवाच्या शहाणपणाची चौकट बसत जाते तसतसे ते आभाळ खिडकीतून लांब-लांब जात राहते. या आभाळात पुन्हा त्याच स्वच्छंदीपणे विहरायचे बळ हवे असेल तर छोटय़ांच्या या निरागस विश्वात शिरायला हवे. ते बळ संजय जाधव दिग्दर्शित ‘खारी बिस्कीट’च्या गोष्टीतून मिळते.
दोन लहान भावंडांची ही कथा आहे. यातली खारी (वेदश्री खाडिलकर) जन्मत:च अंध आहे. मात्र तिच्या डोळ्यातला अंधार तिच्या मनात साचू नये म्हणून तिला सुंदर सुंदर गोष्टी ऐकवत एका वेगळ्याच जगात परीसारखा वाढवणारी तिची आई आहे. आई ज्याप्रमाणे खारीला वाढवते त्याच मायेने खारीचा भाऊ बिस्कीटही (आदर्श कदम) तिच्या जगात कायम सुंदर रंग भरत राहतो. खारीचा एकही शब्द खाली पडू न देणाऱ्या बिस्कीटचे, त्याच्या आईचे आणि खुद्द त्यांच्या या मायेच्या रंगात न्हाऊन निघणाऱ्या खारीचे सुंदर असे छोटेखानी विश्व आहे. रस्त्यावरच खोपटी मांडून राहणाऱ्या खारी आणि बिस्कीटचे हे सुरेख, स्वप्निल विश्व मोडून पडते, जेव्हा त्यांच्या आईचा अपघात होतो. आई गेल्यावर खारीचे आई-बाप-भाऊ अशी तिहेरी भूमिका खांद्यावर घेऊन वावरणारा छोटा बिस्कीट तेही आव्हान स्वीकारून एक सुंदर आयुष्य खारीला देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, खारीच्या विश्वात इतरांच्या बोलण्यातून जसजशा वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांच्या गोष्टी दाखल होत राहतात आणि मग तिच्या या स्वप्निल विश्वातल्या वास्तव गोष्टी तिच्यासमोर उभ्या करताना बिस्कीटची दमछाक होत राहते. एकीकडे खारीचे निरागस सुंदर काल्पनिक जग त्याला मोडायचे नाही आणि दुसरीकडे कितीही अट्टहास केला तरी आपण हे वास्तव नेहमी तिच्यासमोर खोटे खोटे उभे करू शकत नाही याची एका क्षणी जाणीव झालेल्या बिस्कीटच्या प्रयत्नांची ही गोष्ट आहे. खारीच्या बंद डोळ्यांमागच्या सुंदर स्वप्नांची, तिच्या बिस्कीटवरच नव्हे तर आजूबाजूला असलेल्या सगळ्यांच्याच चांगुलपणावर असलेल्या विश्वासाची गोष्ट आहे. जिवाला जीव देणाऱ्या मित्रांची गोष्ट आहे. या चिमुरडय़ांच्या स्वप्नांना मायेचे पांघरूण घालून वाढवणाऱ्या, त्यांना अर्थार्जनाचे बळ देणाऱ्या माईची गोष्ट आहे.
‘खारी बिस्कीट’ या चित्रपटाच्या कथेचा जीव तसा छोटा आहे. मात्र हा चित्रपट खऱ्या अर्थाने उचलून धरला आहे तो या चित्रपटातील दोन्ही बालकलाकारांनी. वेदश्री खाडिलकरने यात खारीची भूमिका केली आहे. वेदश्री डोळस आहे आणि तिने अंध असल्याचा अभिनय केला आहे, अशी पुसटशीही शंका येणार नाही इतक्या सहजपणे तिने ही निरागस खारीची भूमिका साकारली आहे. तिच्या तोंडी तसे संवाद फार कमी आहेत, मात्र त्यातही तिचा अल्लडपणा, तिचे बोबडे उच्चार, तिचा भाबडेपणा या सगळ्याच गोष्टी तिच्या प्रेमात पाडणाऱ्या आहेत, तर बिस्कीटच्या भूमिकेत आदर्शने कुठलीही कसर सोडलेली नाही. खारीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारा, सतत वास्तव आणि आदर्शवाद या द्वंद्वात फसणारा, मित्रांना मदत करणारा, मोठे होण्याचे स्वप्न पाहणारा बिस्कीट आदर्शने सुंदर उभा केला आहे. या दोघांमुळे खरे म्हणजे ही बहीण-भावांची गोष्ट अधिक गोड झाली आहे. या दोघांना इतर बालकलाकारांनीही उत्तम साथ दिली आहे. अभिनेत्री नंदिता पाटकरने यात माईची भूमिका केली आहे. आजवर तिच्या वाटय़ाला आलेल्या भूमिका या सोशीक, खंबीर अशा स्त्रीच्या होत्या. इथेही ती खंबीर आहेच, पण अगदी खमकी, प्रसंगी ‘माई’गिरी करणारी अशी दिसते. त्यामुळे तिला छोटेखानी का होईना, पण वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी हा चित्रपट देतो. संजय नार्वेकर, सुशांत शेलारसह सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केले आहे.
मुळात, चित्रपटाची कथा छोटीच असली तरी अभिनयातून ती व्यक्त होईल, प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचेल, याची काळजी दिग्दर्शक म्हणून संजय जाधव यांनी घेतली आहे. कुठेही मेलोड्रामा न करता अत्यंत संयत-सुंदर मांडणी असल्याने हा चित्रपट जास्त भावतो. याला उत्तम संगीताचीही जोड मिळाली आहे. बाकी वस्ती आणि त्याअनुषंगाने आलेल्या गोष्टी फारशा नवीन नाहीत. मात्र स्वप्नं पाहणारी छोटी मने आणि त्यांच्या स्वप्नांचे पतंग वास्तवाच्या झोताने कितीही भरकटले तरी पुन्हा उडायचे स्वप्न पाहणारी त्यांची जिद्द, त्यातली सहजता या गोष्टी दुर्मीळ होत चालल्या आहेत. हा निरागस भाव आणि त्यातला गोडवा पुन्हा अनुभवण्याची संधी देणारी अशी ही ‘खारी बिस्कीट’ची जोडी आहे.
* दिग्दर्शक – संजय जाधव
* कलाकार – वेदश्री खाडिलकर, आदर्श कदम, सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते, नंदिता पाटकर, संजय नार्वेकर, सुशांत शेलार.