राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट फक्त समीक्षकांपुरतेच मर्यादित राहतात. त्याला सर्वसामान्य प्रेक्षकांचाही भरघोस प्रतिसाद मिळत नाही, हा समज गेल्या आठवडय़ात शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘किल्ला’ चित्रपटाने हाणून पाडला आहे. अभिनेत्री अमृता सुभाषवगळता एकही प्रसिद्ध चेहरा नसताना केवळ आशयाच्या बळावर अविनाश अरुण दिग्दर्शित ‘किल्ला’ या चित्रपटाने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने तीन कोटींचा पल्ला पार केला असून या चित्रपटाची बालचौकडी चिन्मय काळे ऊर्फ शिष्यवृत्ती, बंडय़ा, युवराज, उम्या आणि अंडय़ा ही मंडळी ‘स्टार’ ठरली आहेत.
पहिल्या आठवडय़ात ‘किल्ला’ चित्रपट संपूर्ण राज्यभरात २२५ चित्रपटगृहांमधून प्रदर्शित झाला. मात्र, मुंबई-पुण्यासह अनेक ठिकाणी या चित्रपटासाठी जास्तीत जास्त मागणी झाल्यामुळे शोज वाढवावे लागले. कुठलेही नावाजलेले कलाकार, तथाकथित मनोरंजनात्मक आशय नसतानाही या चित्रपटाला भरघोस यश मिळाले आहे. याचे श्रेय दिग्दर्शक अविनाश अरुणने चित्रपटाची ‘चित्र’ भाषा ज्या अप्रतिम पद्धतीने टिपली आहे, त्याला असल्याचे चित्रपटाचे निर्माते एस्सेल व्हिजनचे निखिल साने यांनी सांगितले. चित्रपटाची दृश्यात्मक मांडणी, त्याची चित्रभाषा खूप प्रभावी आहे. त्याचा वापर करून दिग्दर्शकाला जे सांगायचे होते ते बर्लिनमधील प्रेक्षकांपर्यंतही पोहोचले. इथे राष्ट्रीय पुरस्कारांसाठी चित्रपट पाहणाऱ्या दिग्गजांनाही ते पटले तितक्याच सहजतेने आज सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनालाही भिडले आहे. लोकांनी चित्रपट समजून घेतला आहे. केवळ पुण्या-मुंबईत नाही तर नागपूर, लातूर, नाशिक, औरंगाबाद सगळ्या सेंटर्सवर चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती निखिल साने यांनी दिली.

Story img Loader