आजच्या काळाला अनुसरून आणि रोजच्या जगण्याशी निगडित गोष्टीचा संदर्भ घेत पूर्ण नवी कथा बांधून चित्रपटरूपात प्रेक्षकांसमोर ठेवली जाते तेव्हा त्यातला वेगळेपणा निश्चितच दखल घ्यायला लावतो. अभिषेक मेरूकर दिग्दर्शित ‘लाइक आणि सबस्क्राइब’ हा खरोखरच अशा ताज्या विषयाचा धागा घेऊन गुंफलेला चित्रपट आहे. हत्या आणि त्यामागचं रहस्य उलगडत नेणं हा बाज हिंदी चित्रपटांमुळे आपल्या अतिपरिचयाचा झाला असला तरी इथे त्याच्या मांडणीतून आजच्या तरुणाईचं एकाच वेळी भौतिक सुखाच्या मागे धावणारं उथळ वागणं आणि त्याचबरोबर टोकाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तंत्रज्ञानाचा अचूक वापर करण्याची हुशारी दोन्ही गोष्टींकडे दिग्दर्शकाने लक्ष वेधलं आहे.

‘लाइक आणि सबस्क्राइब’ची कथा लेखक – दिग्दर्शक अभिषेक मेरूकर यांना समाजमाध्यमांवरील एका बातमीतून सुचल्याचे म्हटले आहे. इन्स्टाग्राम, एक्स, फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांचा जितका चांगला उपयोग करता येऊ शकतो, तितकेच त्याचे दुरुपयोगही आहेत. आणि आपल्याकडे अनेकदा अशा कमकुवत बाजूंचा आधार घेत समोरच्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न बहुतांशी केला जातो.

इन्स्टा, फेसबुक, यूट्यूबवर कोणाचं तरी लक्ष वेधून घेण्यासाठी स्टोरी पोस्ट करण्यापासून ते निव्वळ वेळ घालवण्यासाठी अशा कैक कारणाने तरुण पिढी दिवसभर या समाजमाध्यमांशी जोडलेली असते. या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणारी तरुणाई पूर्णपणे निरागसही नाही आणि खूप सावधही नाही. या सगळ्या वास्तवाचा आधार घेत मेरूकर यांनी एक रंजक गोष्ट रचली आहे. अभिनेत्री बनायचं स्वप्न मनाशी बाळगून असलेली खुशी त्या क्षेत्रात जाण्याचा एक मार्ग म्हणून व्लॉगिंग सुरू करते. तिच्या चाहत्यांनी ‘खुशीयन्स’ असं संबोधत ती दिवसभरात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करते ते सगळं ती या व्लॉगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवते. आपल्या चाहत्यांसाठी नवं काही करण्याच्या नादात खुशी शहरातल्या एका चौपाटीवर जाऊन सूर्यास्त दाखवण्याचा प्रयत्न करते. या तिच्या गोष्टीचं लाइव्ह चित्रण सुरू असताना एकामागोमाग एक घटना घडत जातात आणि एका इमारतीतील खोलीत शिरलेली खुशी एका मृतदेहाला अडखळून पडल्याचं व्लॉगमध्ये कैद होतं. इथून पुढे हा मृतदेह कोणाचा? खुशी तिथे काय करत होती? या व्लॉगच्या भानगडीत ती नको त्या प्रकरणात अडकणार का? पोलिसांच्या आणि इतरांच्या म्हणण्याप्रमाणे व्लॉगर्स प्रेक्षकसंख्या मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. म्हणजे खुशीनेच हे कोणाच्या मदतीने घडवलं आहे का? या सगळ्या प्रश्नांबरोबर सुरू होणारा खेळ चढवत नेत लेखक – दिग्दर्शकाने ही कथा खुलवली आहे.

या कथेत आणखीही काही पात्रं आहेत. गावातून मुंबईत आलेल्या रोहिदास नामक तरुणाची कथा यात आहे. झटपट पैसा मिळवण्याची क्लृप्ती शोधणारा आणि त्यात पटाईत असलेला रोहिदास मुंबईत आल्यानंतर अशा पद्धतीने पैसा कमवण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतो. त्याला तसे साथीदार मिळत जातात. अर्धवट शिक्षण किंवा पूर्ण शिक्षण असलं तरी महागडं घर-गाड्या घेण्याचं स्वप्न मनाशी बाळगत त्यासाठी झटपट पैसे कसे मिळवता येतील? यामागे लागलेले रोहिदाससारखे अनेक तरुण-तरुणी गावखेड्यांतच कशाला मुंबईसारख्या महानगरांमध्येही खोऱ्याने सापडतील.

या चित्रपटातून तरुणाईची दिसणारी ही बाजू एकाअर्थी भविष्यातील भयंकर स्थितीची चुणूक दाखवणारी आहे. रहस्यमय मांडणी असलेल्या या चित्रपटातून वास्तवाचे धागे उलगडत असले तरी मुळात ती मुख्य गोष्ट नाही हे लक्षात घेऊन मेरूकर यांनी काहीशी हलकीफुलकी मांडणी ठेवत हे तपासनाट्य रंगवलं आहे. त्यामुळे पाहताना त्यातली उत्कंठाही हरवत नाही आणि खूप काहीतरी तणावपूर्ण पाहतो आहे असं दडपणही येत नाही. त्यातली रंजकता हरवणार नाही याची काळजी घेत केलेलं पटकथालेखन आणि खुसखुशीत दिग्दर्शकीय मांडणी यामुळे चित्रपट नेमकेपणाने पोहोचतो.

चित्रपटाची कथा पूर्ण तार्किकही म्हणता येणार नाही, त्यात काही कच्चे दुवे आहेत. पोलीस तपास हा यातला मुख्य भाग दिग्दर्शकाने आपल्या कथेच्या गरजेनुसार वळवून घेतला आहे. त्यात अमृता खानविलकरने साकारलेली दीपिका ही नेमकी कोण आहे? हेही चित्र पुरेसं स्पष्ट होत नाही. मात्र, कथेतल्या या उणिवा चित्रपटातली रंजकता कमी करत नाही. अभिनयाच्या बाबतीतही चित्रपट सरस आहे. अभिनेता अमेय वाघने साकारलेली व्यक्तिरेखा ही त्याच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. किंबहुना, आघाडीचा कलाकार असला की तो मुख्य किंवा प्रेमी नायकच असला पाहिजे असा कुठलाही सोस न बाळगता एक वेगळी व्यक्तिरेखा अमेयने त्याच्या सहजाभिनयाने जिवंत केली आहे. अमृतानेही नेहमीपेक्षा वेगळी भूमिका केली आहे. या दोघांच्या बरोबरीने जुई भागवत, राजसी भावे, शुभंकर तावडे, विराट मडके, विठ्ठल काळे, पु्ष्कराज चिरपुटकर या नेहमीपेक्षा वेगळ्या चेहऱ्यांमुळेही चित्रपटात एक ताजेपणा आहे. त्याच त्याच साचेबद्ध कथांपेक्षा एक वेगळी रंजक कथा साकारणाऱ्या या चित्रपटाला अधिकाधिक जणांनी लाइक म्हणत सबस्क्राइब करायला काहीच हरकत नाही.

लाईक आणि सबस्क्राईब

दिग्दर्शक – अभिषेक मेरूकर

कलाकार – अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, राजसी भावे, शुभंकर तावडे, विराट मडके, विठ्ठल काळे, पु्ष्कराज चिरपुट