चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव यांचा आगामी ‘लकी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये मोठी तगडीस्टार कास्ट झळकणार असल्यामुळे साऱ्यांनाच या चित्रपटाविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी चित्रपटातील कलाकारांसह बॉलिवूड अभिनेता जितेंद्र, तुषार कपूर आणि डिस्को किंग बप्पी लहरी यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे जितेंद्र यांनी लकीमधील एका गाण्यावर चक्क ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.
‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला ‘लकी’ ७ फेब्रुवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलर लॉन्चवेळी चित्रपटातील ‘कोपचा’ हे गाणंदेखील दाखविण्यात आलं. हे गाणं जितेंद्र यांना प्रचंड आवडलं असून त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये या गाण्यावर ठेका धरला. तर अभिनेता अभय महाजननेही त्यांना साथ दिली.
‘हा ट्रेलर पाहून चित्रपटाला नक्कीच बंपर ओपनिंग मिळेल, यात मला काही शंका नाही. चित्रपटाप्रमाणेच त्याच्यातील कलाकारही छान आहेत. चित्रपटाच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘तुफान’ कलाकारांची ही फिल्म आहे. या चित्रपटाला माझ्या मनापासून शुभेच्छा’, अशी प्रतिक्रिया जितेंद्र यांनी दिली.
दरम्यान, डिस्को किंग बप्पी लाहिरींना सिनेसृष्टीत यंदा ५० वर्ष पूर्ण होत असताना त्यांचा मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून कोपचा गाण्याव्दारे डेब्यू झाला आहे. त्यानिमित्ताने केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला. या चित्रपटामध्ये पहिल्यांदा उमेश कामत, सिध्दार्थ जाधव, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे, सोनाली खरे, अमेय वाघ अशी तगडीस्टार कास्ट मंडळी झळकणार आहेत.