आपल्या मातीतली गोष्ट सांगताना ती वैश्विक स्तरावरील प्रेक्षकाला म्हणण्यापेक्षा कुठल्याही स्तरातील माणसाला आपलीशी वाटली पाहिजे, मनाला भिडली पाहिजे तर ती यशस्वी ठरते. खेडोपाड्यांमध्ये पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आपल्याला माहिती आहे. खरंतर मुंबई – दिल्लीसारख्या महानगरांमध्येही एका वेगळ्या अर्थाने पाण्यासाठी संघर्ष करावाचा लागतो. एकीकडे पैसे मोजावे लागतात, तर दुसरीकडे पैसाही नसल्याने स्वत: उन्हातान्हात वणवण करावी लागते. ‘पाणी’ या आपल्या पहिल्याच दिग्दर्शकीय चित्रपटात गावात पाणी आणून किमान पाण्याच्या बाबतीत गावाला स्वावलंबी करणाऱ्या हनुमंत केंद्रे यांची वास्तव कथा रंगवताना आदिनाथ कोठारेने पाण्यासाठीचा हा भयाण संघर्ष आणि एकजुटीने प्रयत्न केले तर वैराण, ओसाड जागेतही पाण्याचा ओलावा निर्माण होऊ शकतो हे आशादायी वास्तव दोन्ही गोष्टी समोर ठेवल्या आहेत.

‘पाणी’ ही कुठल्याही प्रकारे परीकथा नाही, त्यामुळे त्यातला संघर्षही कपोलकल्पित नाही. किंबहुना, सरकारी स्तरावर नसले तरी आपल्या आजूबाजूला पाणी, शेती, उद्याोग याबाबतीतल्या समस्या दूर करून स्वयंपूर्ण बनण्यासाठी काम करणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था कार्यरत असतात. पण त्या सगळ्याच आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. नांदेडमधल्या नागदेरवाडी गावातील हनुमंत केंद्रे हा तरुणही कदाचित या भानगडीत फारसा पडला नसता, जर त्याच्या नियोजित वधूच्या वडिलांनी पाणी नसलेल्या गावात आपली मुलगी देणार नाही हा पवित्रा घेतला नसता. ‘पाणी’ या चित्रपटाची कथाही बाबू म्हणजेच हनुमंताच्या मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाने सुरू होते. हनुमंतचा भाऊ बालाजी गावखेड्यांना पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणाऱ्या खासगी संस्थेबरोबर काम करतो आहे. त्यांना अनेक गावांमध्ये पाणी आणण्यात यशही मिळालं आहे, मात्र खुद्द त्याच्या गावात पाणी आणणं त्याला शक्य झालेलं नाही. त्याच्या गावाला पाण्यासाठीच्या या योजनेत सहभागी करणं शक्य आहे, फक्त त्यासाठी गावाला एकत्र आणणारी व्यक्ती शोध, असा सल्ला बालाजीला त्याच्या वरिष्ठांकडून मिळतो. ही गोष्ट कोणाचीही विनाकारण मुजोरी खपवून न घेता प्रसंगी चार हात करणारा बाबूच करू शकतो हा विश्वास असल्याने बालाजी त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवतो. एकीकडे बालाजीने दाखवलेला विश्वास आणि दुसरीकडे गावात पाणी नाही म्हणून आपल्याला आवडलेल्या मुलीशी ठरलेलं लग्न मोडण्याची भीती या दोन्हीपायी बाबू हे आव्हान स्वीकारतो. तो कशा पद्धतीने गावाला एकत्र आणतो? गावातील राजकीय धेंडं त्यात कशा अडचणी आणतात? याचबरोबरीने निसर्गाशी लढा देत पाण्याचा हा प्रश्न बाबू आणि त्याचे गावकरी कायमचा कसा निकालात काढतात? याचं चित्रण म्हणजे ‘पाणी’ हा चित्रपट आहे.

हेही वाचा >>> गुप्तहेराच्या भूमिकेत वरुण धवन; ‘सिटाडेल’च्या भारतीय आवृत्तीची झलक प्रेक्षकांसमोर

या चित्रपटाच्या पटकथेचे लेखन नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांचे आहे. कुठलाही अन्य फापटपसारा न वाढवता पाण्यासाठी हनुमंत यांना कराव्या लागलेल्या संघर्षावर लक्ष केंद्रित करत पटकथा लेखन करण्यात आले आहे. मात्र हे करत असताना अशा पद्धतीच्या योजना नव्याने गावात आणताना गावकऱ्यांना कसं एकत्र करायचं? गावातील पुरुषांपेक्षाही स्त्रियांना भजनी गट, बचतगटाच्या माध्यमातून एकत्र आणत मोठ्या कामासाठी उद्याुक्त करणं अशा वरवर छोट्या वाटणाऱ्या गोष्टींचे मोठे सकारात्मक परिणाम लक्षात आणून देण्यावरही लेखक-दिग्दर्शकाने भर दिला आहे. त्यामुळे एकीकडे हनुमंतची वैयक्तिक प्रेमाची गोष्ट आणि त्याचा गावात पाणी आणण्यासाठीचा संघर्ष महत्त्वाचा असला तरी सगळ्या गावकऱ्यांचं त्याच्यावर विश्वास ठेवून एकत्र येणं आणि एका कुटुंबागत हे आव्हान पूर्ण करण्यासाठी झटणं हा चित्रपटातला भाग अधिक रंजक आणि अर्थपूर्ण झाला आहे. किंबहुना त्यामुळेच अशा पद्धतीचा वास्तव आशय मांडणारा चित्रपट एकतर रूक्ष किंवा अतिनाट्यमय होण्याची जी भीती असते ती इथे दूर झाली आहे. त्यासाठी गावकऱ्यांच्या भूमिकेसाठी फारसे परिचयाचे नसलेले, पण उत्तम अभियनगुण असलेल्या कलाकारांची निवडही चित्रपटाच्या एकंदरीत मांडणीत महत्त्वाची ठरली आहे.

हेही वाचा >>> ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’चे देशभर प्रदर्शन; ‘कान’ महोत्सवात स्पर्धेतील विजेता चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत

आदिनाथने पहिल्यांदाच दिग्दर्शन केले आहे, मात्र निर्मिती क्षेत्राबरोबरच अभिनयातील त्याचा अनुभव इथे कामी आला आहे. त्याच्या दिग्दर्शकीय मांडणीत तंत्रसफाई आहेच, मात्र वास्तवकथा किंवा चरित्रात्मक शैलीतील कथा सांगतानाही ती निव्वळ माहितीपट वाटू नये म्हणून त्यासाठी त्याने केलेल्या रंजक मांडणीमुळेही चित्रपट कंटाळवाणा होत नाही. चित्रपटात बाबू म्हणजेच हनुमंत केंद्रे यांची मुख्य भूमिकाही आदिनाथनेच केली आहे. त्यांच्या भूमिकेत आदिनाथ चपखल बसला आहे. मुळात वर उल्लेख केला त्याप्रमाणे देशभरातील गावांची विशेषत: कोरडा दुष्काळ जिथे पडतो अशा गावांची समस्या लक्षात घेत पाणी, शिक्षण, रोजगार, शेती, उद्याोगधंदे अशा अनेक समस्या आहेत आणि त्या नाही म्हटलं तरी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे पूर्णत: सरकारवर विसंबून न राहता गावाने एकत्र येत एकेक समस्यापूर्तीसाठी प्रयत्न केले तर काही बदल निश्चित होतील, ही आशा पल्लवित करण्याचं काम या चित्रपटातून झालेलं आहे. उत्तम कथा, उत्तम कलाकार असलेल्या अशा चित्रपटाच्या निर्मितीसाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा, राजश्री एन्टरटेन्मेंटसारख्या हिंदीतील नामांकित कलाकार, निर्मिती संस्थांची साथ लाभली तर चित्रपट निर्मितीमूल्यातही कुठेच कमी पडत नाही, याची प्रचीती ‘पाणी’ पाहताना येते. एक उत्तम कलाकृती आणि संघर्ष कुठल्याही गोष्टीसाठी असो… अचूक आणि सातत्याने प्रयत्न केले तर यश निश्चितच मिळते अशी प्रेरणा ‘पाणी’ पाहताना मिळते, त्यामुळे कलाकृती म्हणूनही तो एक वेगळा दर्जेदार चित्रपट ठरला आहे.

पाणी

दिग्दर्शक – आदिनाथ कोठारे

कलाकार – आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, रजित कपूर, गिरीश जोशी, किशोर कदम, रुचा वैद्या, विकास पांडुरंग पाटील.