यावर्षी मराठीत दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकची एकच लाट आली आहे. जोजी रेचल जॉब दिग्दर्शित ‘पैसा पैसा’ हा या रिमेकच्या लाटेतील नवा चित्रपट. हव्या त्या वेळी आपल्याला पैसे न मिळणं, अगदी मदत म्हणूनही न मिळणं ही परिस्थिती आपण कित्येकदा अनुभवलेली असते. आपल्याला जी रक्कम हवी ती समोरच्याकडे असते, मात्र ती मागूनही मिळत नाही आणि हिसकावून घेणं तत्त्वात बसत नाही. अशा वेळी आपण हवालदिल होतो. ही भावना खरं म्हणजे ‘पैसा पैसा’च्या केंद्रस्थानी आहे, मात्र दिग्दर्शक त्यातच अडकून पडल्याने कथा आणि पर्यायाने चित्रपट तिथेच घुटमळत राहतो.
२०१३ साली आलेल्या ‘पैसा पैसा’ या मल्याळम चित्रपटाचा हा रिमेक आहे. नावासहित उचललेल्या या चित्रपटाचे संवाद आणि कलाकार मराठीत आहेत एवढंच. नागपुरात नोकरीकरिता मुलाखत देण्यासाठी गेलेल्या तरुणाचे अपहरण होते. अपहरणकर्त्यांला फक्त १० हजार रुपये हवे आहेत, मात्र या तरुणाक डे ते नसल्याने मुंबईत असलेली त्याची प्रेयसी आणि मित्र कथेत दाखल होतात. प्रेयसीकडे रक्कम मागितल्यानंतर ती फोन बंद करून बसते. १० हजार काही मोठी रक्कम नाही. होतील कुठून तरी उभे म्हणत त्याच्या मदतीला सरसावलेला त्याचा मित्र (सचित पाटील) सतत प्रत्येकाला भेटत राहतो, पैसे मागत राहतो, पण मित्राच्या अपहरणाची तक्रार तो पोलिसांत करत नाही. पैशाची मदत उभी करणाऱ्या मित्राचीही कथा त्याला जोडलेली आहे. त्याची पत्नी (स्पृहा जोशी) नव्याने नवरा-बायकोचे बिघडलेले संबंध सुरळीत क रू पाहते आहे. पत्नीकडेही तो मित्राच्या अपहरणाबद्दल काहीच सांगत नाही हे आणखी एक विशेष.
संपूर्ण चित्रपटभर प्रेक्षक नायकाबरोबर त्याच्या प्रत्येक मित्राकडे, नातेवाईकाक डे कधी ५ हजार, कधी २ हजार रुपये मागत फिरून दमतात आणि मग १० हजारांचे लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर जो शेवट वाटय़ाला येतो त्याने हसावं की रडावं कळत नाही. अपहरणकर्ता (मिलिंद शिंदे), अपहृत तरुण आणि त्याचा मित्र या तिघांचे फक्त १० हजार रुपयांच्या रकमेशी जोडलं जाणं ही कल्पना आणखी वेगळ्या तऱ्हेने विकसित करता आली असती. मात्र पटकथेवर काम करण्यापेक्षा आहे तशी कथा उचलण्याच्या अट्टहासाने चित्रपट पुरता फसला आहे. मिलिंद शिंदे यांनी एवढी वाईट भूमिका स्वीकारण्यामागचे कारण कळत नाही. स्पृहालाही या चित्रपटात काहीच काम नाही. आत्तापर्यंत फसलेल्या रिमेकपटात याही चित्रपटाचे नाव सामील झाले आहे.
पैसा पैसा
दिग्दर्शक – जॉजी रेचल जॉब
कलाकार – सचित पाटील, मिलिंद शिंदे, स्पृहा जोशी, पंकज विष्णू
रेश्मा राईकवार