‘शाळा’ चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला बरंच काही देणारा ठरला.. आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटाचा नवा अध्याय लिहिताना या चित्रपटाने सुजय डहाकेंच्या रूपात दूरदृष्टी असलेला एक हुशार दिग्दर्शक सिनेसृष्टीला दिलाच, पण त्यासोबत केतकी माटेगावकरसारखी सुंदर आणि चाणाक्ष अभिनेत्रीही दिली. केवळ मराठी सिनेरसिकांच्या मनावर आपली मोहोर न उमटवता या चित्रपटाने देश-विदेशातील प्रेक्षकांनाही आपलंसं केलं. ‘शाळा’ आणि ‘आजोबा’ या दोन सिनेमांच्या यशानंतर दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळले असून ‘फुँतरू’ या आगामी मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनात सध्या ते व्यस्त आहेत. सुजय डहाकेंच्या सिनेमात पुन्हा एकदा अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकर प्रमुख भूमिकेत चमकणार ही या चित्रपटाची विशेष बाब आहे.
‘व्ही. पतके फिल्म्स’च्या बॅनरखाली ‘फुँतरू’ची निर्मिती होत असून, वंदना ठाकूर आणि अजय ठाकूर या चित्रपटाचे निर्माते आहेत. निर्मात्या वंदना ठाकूर आणि अजय ठाकूर यांचा ‘फुँतरू’ हा दुसरा मराठी चित्रपट आहे. यापूर्वी ठाकूर दाम्पत्याने एका धडाकेबाज-जिद्दी मुलीची कथा सांगणाऱ्या ‘तानी’ चित्रपटाची निर्मिती केली होती. रसिकांनी या चित्रपटाला उत्स्फूर्तपणे दाद दिलीच, पण ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’ सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावण्यातही या चित्रपटाने यश मिळवलं होतं. ‘तानी’मध्येही केतकी माटेगावकरने मुख्य भूमिका साकारली होती.
‘शाळा’नंतर ‘फुँतरू’च्या निमित्ताने सुजय आणि केतकी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. यामुळे प्रेक्षकांना पुनश्च सुजयचं उत्कृष्ट दिग्दर्शन आणि केतकीचा सहजसुंदर अभिनय पाहाण्याची संधी मिळणार आहे. ‘फुँतरू’ ही एक सायन्स फिक्शन लव्ह स्टोरी आहे. चित्रपटाच्या कथेबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात असून, वेळोवेळी कथेतील महत्त्वाचे पैलू उघड केले जाणार असल्याचे चित्रपटकर्त्यांचे म्हणणे आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी केतकी माटेगावकरची निवड झाली असली, तरी इतर कलाकारांची निवड होणे अद्याप बाकी आहे.
‘फुँतरू’ची कथा खूपच वेगळी आहे. मराठीत आजवर सायन्स फिक्शन लव्ह स्टोरी पडद्यावर सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘फुँतरू’च्या अनुषंगाने सायन्स फिक्शन लव्ह स्टोरी सादर करण्याची संकल्पना जेव्हा समोर आली, तेव्हा ‘तानी’नंतर रसिकांच्या वाढलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी हीच कथा योग्य असल्याचं जाणवलं आणि निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचं निर्माते वंदना ठाकूर आणि अजय ठाकूर यांनी सांगितले.
सायन्स फिक्शन लव्ह स्टोरी हा प्रकार मराठी रसिकांसाठी तसा नवखा आहे. त्यामुळेच हे नेमकं काय आहे ते सांगण्यापेक्षा पडद्यावर पाहण्यातच खरी गंमत असल्याचं सांगत दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाले की, भारतीय चित्रपटसृष्टीची आद्यजनक असलेल्या मराठी सिनेसृष्टीने नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘फुँतरू’ हा चित्रपटही त्याच वाटेवरील पुढचं पाऊल ठरेल. सायन्स फिक्शनची किनार लावून प्रेमकथा सादर करण्याचा प्रयत्न यापूर्वी मराठीत बहुधा झालेला नाही. त्यामुळे ही संधी सर्वप्रथम लाभल्याचा सार्थ अभिमान असून, त्यासोबतच जबाबदारीचं भानही आहे. आमची टीम ही कलाकृती पडद्यावर सजीव करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असल्याने रसिकराजाच्या मनालाही आमचा हा प्रयत्न नक्कीच भावेल, अशी आशा सुजय डहाके यांनी व्यक्त केली.
‘शाळा’, ‘आरोही’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाईमपास’ या चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यानंतर ‘फुँतरू’च्या माध्यमातून पुन्हा एकदा काहीतरी नवीन आव्हानात्मक करण्याची संधी चालून आल्याने अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकर खूप उत्साही आहे. ती म्हणाली, चित्रपटातील भूमिकेबाबत इतक्यात काही सांगणं उचित ठरणार नाही, परंतु पुन्हा एकदा काहीतरी थ्रीलिंग करण्याची संधी लाभलीय हे मात्र नक्की. सुजयसारख्या सुजाण दिग्दर्शक आणि अजय-वंदना यांच्यासारख्या कलेची जाण असणाऱ्या निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी ‘फुँतरू’मुळे पुन्हा मिळाल्याचा आनंद ही तिने व्यक्त केला.

Story img Loader