रेश्मा राईकवार

साधू-संतांचे चरित्र रूपेरी पडद्यावर मांडताना त्यांची शिकवण, त्यांचे विचार यावर भर देणं गरजेचं असतंच, पण आपल्याकडे अशा थोर व्यक्तींना देवरूपात पूजणं वा त्या दृष्टीने विचार करणं हा सहजस्वभाव आहे. त्यामुळे कोणत्याही संतांचे चरित्र पोहोचवताना त्यातून अंधश्रद्धेचा प्रसार होणार नाही, याचं भान ठेवावं लागतं. नीलेश अरुण कुंजीर दिग्दर्शित ‘रघुवीर’ या चित्रपटातून समर्थ रामदास स्वामींचा चरित्रपट करताना हे भान जपलं गेलं आहे.

Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
eknath shinde Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Rajkot Fort Malvan Sindhudurg
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे पडला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
PM Narendra Modi Italy Visit
Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!

समर्थ रामदास स्वामी या नावाबरोबर जय जय रघुवीर समर्थ या जयघोषापासून ‘मनाचे श्लोक’, ‘करुणाष्टक, ‘दासबोध’ यासारखे ग्रंथ, शिवाजी महाराजांबरोबरचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध अशा कित्येक गोष्टी आपल्या मनात रुंजी घालतात. मात्र, यापलीकडे समर्थ रामदासांचं अवघं आयुष्य, त्यांनी स्वीकारलेली अध्यात्माची वाट आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर ‘जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन’ ही भूमिका घेत त्यांनी उभारलेले कार्य हे सगळंच प्रेरणादायी आहे. त्यांचा जीवनप्रवास पहिल्यांदाच ‘रघुवीर’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर उतरला आहे.

या चित्रपटाची पटकथा, दिग्दर्शक नीलेश अरुण कुंजीर आणि लेखक अभिराम भडकमकर यांनी लिहिली आहे. तर संवादलेखन अभिराम भडकमकर यांचं आहे. हे दोन्ही उल्लेख इथे महत्त्वाचे ठरतात याचं कारण वर म्हटल्याप्रमाणे संतांचं चरित्रलेखन वा त्या अनुषंगाने मांडणी करताना त्यांचे विचार – कृती यांतून चमत्कार, सिद्धी यासंबंधीच्या भावनांना खतपाणी मिळणार नाही याचं भान ठेवावं लागतं. इथे समर्थ म्हणजे कोणी अवतारी पुरुष आहेत असा विचार वा तशापद्धतीची दृष्टी लेखकद्वयींनी पटकथा लेखनातच ठेवलेली नाही. त्यामुळे जांब गावात जन्माला आलेला हुशार, चटपटीत, चुणचुणीत नारायण नामक लहान मुलगा, त्याच्या मनात जागलेला रामनामाचा ध्यास, त्याच्या शोधात तपसाधना, ग्रंथअभ्यास करत करत ज्ञान आणि साधनेच्या बळावर अलौकिक अशा समर्थ रामदास स्वामींपर्यंत त्यांचा झालेला प्रेरक प्रवास हा चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. नारायणाला लहानपणापासूनच रामनामाचा ध्यास लागला होता. सवंगड्यांसोबतचा खेळ, ते करत असतानाच गावातील अडल्या-नडण्याला मदत करण्यापासून ते चुकीच्या व्यक्तीला अद्दल घडवण्यापर्यंतच्या त्याच्या हरएक करामती या कुठल्याही आईच्या जिवाला घोर लावणाऱ्याच… नारायणाच्या आईलाही आपल्या मुलाची चिंता वाटते. लग्न केल्यावर त्यात सुधारणा होईल या विचाराने नारायणाची आई त्याच्याकडून बोहल्यावर चढायचं वचन घेते, आईबरोबरच्या वादात उत्तर न सापडल्याने नारायण बोहल्यावर चढतोही… मात्र मंगलाष्टकातील ‘सावधान’ हा शब्द त्याच्या कानावर पडतो आणि आपण या संसारात बांधून राहू शकणार नाही याचं भान नारायणाच्या मनात जागं होतं. तो तिथून पळ काढतो, ही कथा आपण ऐकली आहे, पण ‘रघुवीर’ चित्रपटात हा प्रसंग खूप सुंदर पद्धतीने रंगवण्यात आला आहे.

हेही वाचा >>> “सर्व पुरुष वर्गाला शिव्या घालण्यापेक्षा…”, उर्मिला निंबाळकरच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

लग्नमंडपातून पळून गेलेल्या नारायणाचा पुढचा प्रवास हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे. तो मांडताना काही महत्वाचे टप्पे लेखक – दिग्दर्शकाने निवडले आहेत. नाशिकमध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली घेतलेलं ग्रंथांचं शिक्षण, वनस्पती औषधांची माहिती, त्याला तपसाधनेची दिलेली जोड यातून त्यांना प्रारंभिक दिशा मिळाली. पुढे टाकळीत केलेली तपसाधना, हिमालयापर्यंत केलेली भ्रमंती ते पुढे चाफळात उभारलेले राममंदिर, बलोपासना करण्यासाठी गावातील तरुणांना प्रेरणा देत स्थापन केलेले आखाडे, उद्धव, कल्याणसारख्या शिष्यांना घडवणं असे त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे महत्त्वाचे टप्पे या चित्रपटात पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांशी असलेले त्यांचे नाते आणि स्वराज्याच्या कार्यात त्यांचे महाराजांना मिळालेले मार्गदर्शन याचाही उल्लेखवजा प्रसंग चित्रपटात आहे. एकूणच या घटनाक्रमामध्ये समर्थ रामदास स्वामींनी त्याकाळी वैधव्यामुळे स्वत:स कमजोर समजणाऱ्या वेणाबाईंना दिलेली दीक्षा आणि पुढे आखाड्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवत स्त्रीही कोणापेक्षाही कमजोर नाही, उलट ती अधिक सक्षम आहे याची जाणीव करून देणारा प्रसंग विशेष महत्त्वाचा वाटतो.

अर्थात, समर्थांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे अधोरेखित करण्याबरोबरच वेणाबाईंच्या प्रसंगासारखे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनाही चित्रपटात येतात. मात्र मुळात समर्थांचा अवघा आयुष्यपटच भव्यदिव्य आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे विचारांची बैठक आहे. त्यातला प्रत्येक प्रसंग तितक्या सविस्तरपणे मांडण्याला असलेल्या मर्यादांमुळे काही महत्त्वाच्या घटना उल्लेखापुरत्या येतात. शिवाय, चित्रपटाची मांडणी ही काहीशी माहितीपटाच्या अंगाने जाणारी आहे, त्यामुळे त्या घटना पडद्यावर अनेकदा तितक्या प्रभावीपणे उतरत नाहीत. चित्रपटातील अभिनयाची बाजू ही खऱ्या अर्थाने रामदासांच्या भूमिकेतील अभिनेता विक्रम गायकवाड यांनी पेलून धरली आहे. समर्थांच्या भूमिकेसाठी त्यांची निवड अचूक ठरली आहे. बाकी लहानपणीचा नारायण, वेणाबाई, मधुकर हा त्यांचा शिष्य अशा काही मोजक्या व्यक्तिरेखा आणि त्या साकारणारे कलाकार लक्ष वेधून घेतात. या चित्रपटातील गाणी फारशी लक्षात राहात नाहीत, मात्र चित्रपटात आलेली ‘तू सुखकर्ता तू दु:खहर्ता’ ही आरती आणि शेवटीही वेगळ्या स्वरूपात ऐकायला मिळणारी तीच आरती श्रवणीय वाटते. रामदास स्वामींचे अलौकिक कार्य, त्यांचे विचार आजच्या काळातही तितकेच चपखलपणे लागू पडतात. त्याअर्थाने, समर्थ रामदासांचे चरित्र मुळातून समजून घेण्याची प्रेरणा हा चित्रपट निश्चितच मनात जागवतो.

रघुवीर

दिग्दर्शक – निलेश अरुण कुंजीर

कलाकार – विक्रम गायकवाड, ऋजुता देशमुख, शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी.