दिग्दर्शकाच्या कथाकथनाचे कौशल्य त्याच्या चित्रपटांमधून कळते. व्यावसायिक तेच्या चौकटीतली कलात्मक मांडणी आणि काळजाला भिडणारी वास्तवाची मांडणी या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत, पचवल्या आहेत. ‘फँड्री’ पाहिल्यानंतर दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळेंनी समाजव्यवस्थेवर भिरकावलेला दगड लोकांच्या लक्षात असतो. पण ‘सैराट’ पाहताना प्रदर्शनाआधीच त्याच्या गाण्यांमुळे जे झिंगाट चढलं आहे ते पाहता हा दगड थोडा गुळगुळीत किंवा गुलाबी असावा असा जर कोणाचा समज असेल तर सावधान! ‘आटपाट’ नगरच्या नागराजची कथा सुरू होते, प्रेक्षक ‘सैराट’ होतात, मग ‘झिंगाट’ही होतात. पण तोवर एका कथेतून दुसऱ्या क थेत आपण घुसलेलो असतो आणि मग दिग्दर्शकाचा तोच अस्वस्थ करणारा दगड आपल्याला पुन्हा बसतो, अस्वस्थ करतो. ‘सैराट’ नागराज मंजुळेंनी एकाच दगडात (चित्रपटात) दोन पक्षी मारले आहेत.
बिट्टरगावची पाटलाची पोर आर्ची (रिंकू राजगुरू) आणि परश्या (आकाश ठोसर) यांचं भेटणं, त्यांचं प्रेमात पडणं प्रेक्षकांना नवीन नाही. मात्र तिला गावची पाश्र्वभूमी असली तरी ती आजच्या काळातील तरुणाईची प्रेमकथा आहे याचं भान दिग्दर्शकाने ठेवलं आहे. त्यामुळे परश्याला आपल्याकडे एकटक बघताना पाहून त्याला हटकणारी आर्ची ‘मी कुठे म्हटलं मला आवडत नाही’ म्हणून असं सहज सांगून टाक ते. चित्रपटात ज्या भव्य आणि देखणेपणाने या रांगडय़ा प्रेमाची मांडणी झाली आहे की प्रेक्षक सहज त्यात गुंतून जातो. मात्र अजून प्रेमात पडण्यापासून फुरसत नसलेल्या या दोघांचं प्रेम जेव्हा अनपेक्षितरीत्या पकडलं जातं, त्यावर हल्ला होतो त्यानंतर काय? इथे दिग्दर्शकाने ‘एक दुजे के लिए’, ‘हीर रांझा’सारखे तद्दन फॉम्र्युले वापरलेले नाहीत. एकमेकांचा हात पकडल्यानंतर एकत्र येणं साहजिक आहे, त्यातून मग वाट फुटेल तसं उराशी जपलेल्या या प्रेमाला वाचवण्याची धडपड करणारे दोन निरागस जीव आपल्याला दिसतात.
या एकाच चित्रपटात दोन कथा आणि त्याचे असंख्य भावनांचे रेशीमधागे दिग्दर्शकाने सहजरीत्या गुंफले आहेत. त्यातला एकेक धागा आपल्याला खुणावत राहतो आणि त्या नक्षीदार कथेत अडकवत राहतो. चित्रपटाचा पहिला भाग हा प्रेमकथेचा असला तरी त्यात फक्त परश्या आणि आर्ची नाही. तर त्याच्या प्रेमाचे साक्षीदार असलेले त्याचे मित्र सल्या (अरबाज शेख), प्रदीप (तानाजी गालगुंडे) आणि परश्याची मैत्री हाही या कथेतला मोहवणारा धागा आहे. परश्याच्या प्रेमात पडल्यावर त्याच्या घरच्यांना आपलंसं करण्याची आर्चीची घाई, आर्चीच्या मैत्रिणीची उडालेली तारांबळ जशी आपल्याला दिसते. तशीच आर्चीचा भाऊ म्हणून प्रिन्स (सूरज पवार) आणि गावचं मोठं प्रस्थ असलेले तिचे वडील तात्या (सुरेश विश्वकर्मा) यांच्या वागण्यातून आजच्या काळातही असलेल्या गावच्या समाजव्यवस्थेवर, त्याच्या उतरंडीवर दिग्दर्शक सहज प्रकाश टाकतो. चित्रपटाच्या पूर्वार्धातली प्रेमकथा नेहमीच्या चाकोरीपर्यंत येऊन पोहोचते जिथे एकतर पळून जाणं किंवा जीव देणं याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
इथपर्यंतची कथा आपल्याला परिचयाची असते. नागराजची खरी कथा उत्तरार्धात सुरू होते आणि हा चित्रपटाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रेमाच्या गुलाबीपणातून थेट वास्तवात आपटल्यानंतर डॅशिंग आर्चीचं बावचळणं, बिथरणं. श्रीमंतीत आणि मस्तीत जगलेल्या आर्चीची वास्तव स्वीकारताना होणारी घालमेल आहे. तसंच त्या दोघांचंही एकत्र असूनही एकमेकांपासून दूर जात राहणं, आर्चीला सांभाळायची जबाबदारी पुरुष म्हणून खांद्यावर घेतल्यानंतर स्वत:चं अस्तित्व विसरलेला परश्या, इथेही आर्चीने घेतलेला पुढाकार आणि एका क्षणाला या दोघांमधला दुरावा संपून त्यांचं नव्याने एकत्र येणं या गोष्टी पडद्यावर उतरवताना दिग्दर्शकाने पुरेसा वेळ घेतला आहे. त्यामुळे चित्रपट संथ झाला आहे, पसरट झाला आहे अशी प्रेक्षकांची भावना होऊ शकते. मात्र गुलाबी प्रेमामागचं हे वास्तव स्वीकारणं जमलं तरच ती प्रेमी जोडपी खऱ्या अर्थाने एकत्र येतात नाहीतर ते प्रेम वास्तवाच्या खडकावर आपटून विखुरतं याची जाणीव दिग्दर्शकाने प्रभावीपणे करून दिली आहे. त्याअर्थाने हा आजवरचा वेगळा प्रेमपट म्हणायला हवा.
या चित्रपटाला अजय-अतुलच्या संगीताची जादूई किनार आहे ती कायम परश्या आणि आर्चीला आपल्याशी जोडून ठेवते. त्यात रिंकू राजगुरूने ज्या तडफेने आर्ची साकारली आहे ती लोकांच्या मनात कायम घर करून राहील. आर्चीचा रोखठोक स्वभाव रिंकूने जितका सहज रंगवला आहे तितक्याच समजूतदारपणाने आकाशने थोडासा लाजरा-बुजरा, संयत आणि तरीही धाडसी परश्या आकाश ठोसरने रंगवला आहे. अरबाज, तानाजी, छाया कदम यांच्या भूमिकाही लक्षात राहतात. प्रेमातलं वास्तव आणि समाजातलं आपल्याला माहीत असलं तरी न अनुभवलेल्या वास्तवाचं भान या एकाच चित्रपटातून दिग्दर्शकाने करून दिलं आहे. त्यामुळे ‘सैराट’ पाहिल्यानंतरही तुम्ही अस्वस्थ होता, अस्वस्थ करणारी ती सत्याची लहानगी पावलं ज्या शांततेने आपल्याकडे येऊ पाहतात तेव्हा काय करायचं हे आपल्यालाही सुचत नाही. तुम्ही कितीही गुलाबी रंगात रंगवा, आपल्याला हवे तेच लोकांपर्यंत पोहोचवण्याची नागराज मंजुळे यांची दिग्दर्शन कला आपल्याला नक्कीच अचंबित करते.
सैराट
दिग्दर्शक – नागराज मंजुळे
निर्माता – नितीन केणी
निखिल साने
नागराज मंजुळे
कलाकार – रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, सूरज पवार, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गालगुंडे, छाया कदम
संगीत – अजय-अतुल