सिनेमा, सौजन्य –
मराठीत सातत्याने वेगळी कथानके आणि वेगळी मांडणी करण्याबरोबरच अभिनय, दिग्दर्शन, संगीत व सिनेमाच्या वेगवेगळ्या विभागांचा कलात्मकदृष्टय़ा विचार करून वापर करणारे दिग्दर्शकद्वयी म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर. त्यांच्या विचित्र निर्मिती या संस्थेने या वेळी मुक्ता आर्ट्स लिमिटेड आणि अशोक मुव्हीज् यांच्या सहकार्याने ‘संहिता’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. ११ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
अलीकडे ‘पीरिएड फिल्म’ ही संकल्पना मोठय़ा प्रमाणावर हिंदूी-मराठी सिनेमांमध्ये वापरली जात आहे. बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर ‘लगान’, ‘जोधा अकबर’सारखे असे अनेक सिनेमा येऊन गेले आहेत. त्यांना यश मिळाले आहे. मराठीतही अलीकडेच ‘नारबाची वाडी’, ‘७२ मैल एक प्रवास’ हे सिनेमाही ‘पीरिएड फिल्म’ या प्रकारातील होते.
‘संहिता’ या सिनेमातही ‘पीरिएड फिल्म’ हा प्रकार आहे. त्याचबरोबर ‘सिनेमा इन सिनेमा’ हा प्रकारही वापरण्यात आला आहे. संस्थानिकांची राज्ये भारतात होती. अनेक संस्थानिक हे ब्रिटिशांचे निव्वळ मांडलिक बनून आपल्याच मस्तीत विलासी आयुष्य जगत होते हे सर्वाना ठाऊक आहे. ‘संहिता’मध्ये एका संस्थानिक राजाची गोष्ट, त्याचे पत्नी आणि त्याच्या दरबारात गाणे पेश करणारी स्त्री यांच्याशी असलेले नातेसंबंध हा विषय हाताळला आहे.
सिनेमाच्या प्रिव्हय़ू पाहिल्यानंतर राजा-राणी आणि गायिका यांचीच फक्त गोष्ट दाखवली आहे असे वाटले होते. परंतु, या संदर्भात प्रमुख भूमिकेतील अभिनेत्री देविका दप्तरदार यांनी या सिनेमाची अनेक वैशिष्टय़े सांगितली.
नातेसंबंध, विशेषत: प्रेमसंबंध म्हटले की सिनेमा गुंतागुंतीचा आहे असेल असे वाटते. परंतु, अशी गुंतागुंत सिनेमा पाहताना प्रेक्षकांना अजिबात जाणवणार नाही. रेवती नावाची दिग्दर्शिका आहे आणि तिला सिनेमा बनवायचा आहे. हेरवाड संस्थानच्या राजावर तिला सिनेमा बनविण्यासाठी ती संहिता म्हणजे कथा-पटकथा लिहिण्याची तयारी करतेय. संशोधन करताना, तसेच या संस्थानाविषयी, त्याच्या राजाविषयी जाणून घेण्यासाठी ती संस्थानाला भेट देते. त्या काळातील राजाशी संबंधित अनेक लोकांशी रेवती बोलते. त्यातून तिला राजा आणि त्याची पत्नी तसेच गायिका व राजा यांचे नातेसंबंध, त्यातले बारकावे उमगत जातात. एकीकडे तिचा सिनेमा तिच्या मनात उभा राहत असतानाच रेवती आपल्या स्वत:च्या आयुष्यातील नातेसंबंध आणि कथानकातील राजा-राणी, राजा-गायिका यांचे नातेसंबंध यांची तुलना करतेय, साम्य तिला जाणवते, असे थोडक्यात कथानक आहे, अशी माहिती अभिनेत्री देविका दप्तरदारने दिली. राजाची पत्नी आणि रेवती या दोन्ही भूमिका देविकाने साकारल्या आहेत.
मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण, देविका दप्तरदार, उत्तरा बावकर, राजेश्वरी सचदेव, ज्योती सुभाष असे कलावंत यात आहेत.
‘संहिता’ सिनेमाच्या संगीतासाठी शैलेंद्र बर्वे यांना तर यातील गाण्यांसाठी सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना यंदाचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
यातील गायिका जुन्या काळानुसार ठुमरी, ख्याल गाणारी आहे. ही भूमिका राजेश्वरी सचदेवने साकारली आहे. तर राजाची भूमिका मििलद सोमणने साकारली आहे. ‘सरदारी बेगम’ या श्याम बेनेगल दिग्दर्शित सिनेमातील संगीताची आठवण करून देणारे संगीत ‘संहिता’मध्ये ऐकायला मिळणार असून आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे जुन्या काळातील संगीत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रमेंट्स यात वापरलेली नाहीत.
या सिनेमातील आपल्या भूमिकेबाबत मिलिंद सोमण सांगतात, ‘संहिता’ हा चित्रपट म्हणजे चित्रपटात पुन्हा एक चित्रपट सुरू असतो, अशा स्वरूपाची ही कथा आहे. एक संस्थानिक ज्याचे आपल्या पत्नीशी असलेलं नातं फार चांगलं किंवा जिव्हाळ्याचं नाही. उलट, ज्या गायिकेकडे तो जातो तिच्यावर त्याचे जिवापाड प्रेम आहे. ही दोन परस्परविरोधी नाती एकीकडे आणि दुसरीकडे या राजावर चित्रपट करण्यासाठी आलेली एक तरुणी. राजावर संशोधन करता करता ती त्याच्या या दोन नात्यांचे संदर्भ आपल्या आयुष्यातील नात्यांशी जोडू पाहते आणि मग एकाच वेळी चित्रपटात दोन समांतर कथानकं  उलगडू लागतात. संस्थाने खालसा झाल्यानंतरचा काळ आणि त्या नावापुरती उरलेल्या संस्थानामध्ये जन्मलेल्या राजाची भूमिका मी करतो आहे. मी स्वत: अशा राजांना भेटलेलो आहे. त्यामुळे त्यांचा वावर, व्यक्तिमत्त्वातला रुबाब, बोलण्या-चालण्यातली अदब या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत. त्याचाच फायदा मला या भूमिकेसाठी झाला.
१ी२स्र्ल्ल२ी.’‘स्र्१ुंँं@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा