मराठीत गूढकथा हा प्रकार चित्रपटांतून फारसा पाहायला मिळत नाही. मात्र गूढकथेचा फॉर्म वापरत दोन कथालेखक एकत्र आल्यानंतर काय घटना घडू शकतील या कथाकल्पनेवर आधारित ‘सापळा’ हा थरारपट निखिल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची झलक नुकतीच एका सोहळयात प्रकाशित करण्यात आली. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘सापळा’ चित्रपटाच्या दादर येथील प्लाझा सिनेमागृहात झालेल्या या झलक प्रकाशन सोहळयाला चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.चित्रपटाच्या निर्मितीबाबत बोलताना दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले, ‘मला गूढकथा नेहमीच आवडत आल्या आहेत. अशाप्रकारच्या कथा या प्रेक्षकांना नेहमीच अत्यंत प्रभावीपणे भुरळ घालतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अभिमानास्पद! हॉलिवूड स्टार्ससाठी न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात येणार ‘सत्यशोधक’चा खास प्रीमियर

एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून उत्तम कथेच्या शोधात असताना प्रख्यात कथालेखक श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाटयसंहिता वाचनात आली. आपल्या मराठी साहित्याची भव्य कक्षा ही आश्चर्यचकित करणारी आहे. ही कथा आजच्या तंत्रज्ञानाची जोड देत मोठया पडद्यावर आणण्याचा मोह मी आवरू शकलो नाही.’ ‘सापळा’ या चित्रपटात मराठीतील उत्तम कलाकारांचा अभिनय पाहण्याची संधी मिळणार आहे. नवीन कथालेखक आणि अनुभवी लेखक अशी दोन डोकी एकत्र आल्यावर घडलेल्या भयानक घटनेचे चित्रण करणाऱ्या या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, नेहा जोशी, नक्षत्र मेढेकर, सुनील जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रद्योत प्रशांत पेंढारकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून महाराष्ट्रात २६ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie sapala release date announced zws
Show comments